माझे गुरुजी म्हणजे

readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव

केलुचरण महापात्र..केवढं दिलंय मला या माणसाने.. मी नृत्यवेडी होतेच, पण त्या नृत्याला एक वळण, त्या नृत्याबद्दल मनात एक निष्ठा, आणि त्या नृत्यासाठी सर्वस्व वाहून देणं.. हे शिकवलं मला त्यांनी. कुठल्याही गोष्टीची नैतिक परिपूर्णता शक्य आहे, यावर त्यांचा गाढ विश्वास होता. आणि हे सारं मी अधाशासारखं गुरुजींकडून घेतलं.. तसे माझेदेखील काही शिष्य आहेत, जे अधाशासारखे घेतात आणि मी त्यांना भरभरून देते..  प्रत्येकाला माहीत आहे की आपण चांगलं नृत्य करतो कारण आपण निष्ठेने शिकतो, झेलमताईला अपेक्षित आहे ती नैतिक ‘परिपूर्णता’ गाठायचा प्रयत्न करतो.. त्यातूनच जाणवतं, गुरुजींनी मला जे आयुष्यं दिलं – नृत्यातून, तेच आयुष्यं माझे शिष्य एकसिद्धीला नेत आहेत, माझ्या आयुष्याला परिपूर्तीचा स्पर्श देत आहेत.. गुरू-शिष्य नात्याचा शोध घेणारा खास लेख १९ जुलैच्या गुरुपौर्णिमेनिमित्त..

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरू-शिष्य नात्यावरचा लेख लिहायचा होता. मला नृत्य करणं सोपं वाटतं, पण लिहिणं जरा कठीण. गुरू म्हणजे नेमकं काय, आणि शिष्य म्हणजे तरी नेमकं काय? गुरू म्हणजे जो शिकवतो आणि शिष्य म्हणजे जो शिकतो..? एवढंच का? मी म्हणेन, जो शिकवतो तो शिक्षक, पण गुरू हा शिकवण्यापेक्षा बरंच काही जास्त देऊन जातो, देतो. जे शब्दांत मांडणं खूपच मुश्कील.   एक विचार मनाला स्पर्श करून गेला, मला केलुचरण महापात्र गुरू म्हणून लाभले नसते, तर मी आज जे काही केलं आहे ते करू शकले असते का? आणि हो, केलुचरण यांच्या आधी शंकर बेहेरा भेटले नसते तरी आणि ओडिसीच्या आधी राष्ट्र सेवा दल कलापथकात असताना रमेश पुरव भेटले नसते तरी..

गुरुजींची (म्हणजे केलुचरण महापात्र) व्यापक कलादृष्टी, मास्टरजींची (शंकर बेहेरा) शरीरातली लवचीकता, आणि पुरव मास्तर यांचा स्टेजचा म्हणजे स्पेसचा वापर, या सर्व गोष्टी इतक्या सहज मी आत्मसात केल्या आहेत की कुठलीही नवी कलाकृती करताना या गोष्टी आपसूकच आणि सहजपणे त्या कलाकृतीत शिरतात. म्हणजे, मला विचार करावा लागत नाही असं नाही, विचार केला की इतक्या सुंदर कल्पना डोळ्यांसमोर चित्रित होतात ते गुरुजींमुळे, त्या कल्पना शरीरातून बाहेर पडतात मास्टरजींमुळे, एकलनृत्य नसून समूह असेल, तर तीच सुंदर कल्पना अनेक शरीरांतून, वेगवेगळ्या फॉर्मेशनमधून येतात ती मास्तरांमुळे.

जरी ही तीन माणसं माझ्या सध्याच्या नृत्याला कारणीभूत आहेत, तरी मी लिहिणार आहे ते गुरुजींवर, केलुचरण महापात्र. आज शिकवताना खूपदा माझ्या तोंडून गुरुजींचा उल्लेख होत होता. केवढं या माणसाने दिलंय मला.. आयुष्यच म्हणा ना.. कारण नृत्य हे माझं आयुष्य बनलंय. मी नृत्यवेडी होतेच, पण त्या नृत्याला एक वळण, त्या नृत्याबद्दल मनात एक निष्ठा, आणि त्या नृत्यासाठी सर्वस्व वाहून देणं.. हे शिकवलं मला माझ्या म्हाताऱ्याने!

शिकवलं असं नाही म्हणणार मी.  गुरुजी स्वत: तसं जीवन जगत होते. त्यांची या कलेवरची निष्ठा, त्यांचं या कलेत वाहून जाणं, पैसा नगण्य, कला सर्वस्व- हे  आमच्या डोळ्यांसमोर दिसत होतं, घडत होतं. मग सांगा पाहू, आम्ही का बरे तसेच घडणार नाही..? (हाच मला फरक वाटतो गुरू आणि शिक्षकामध्ये).. आणि हं, या वाक्यावरून मलाच माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. खरा शिष्य म्हणजे जो फक्त शिकवलेलं शिकून घेतो, तो नाही, तर तो, ज्याच्यात ती क्षमता आहे, शिकून घेताना शिकवण्याची पद्धत आत्मसात करणं, शिकवण्यामागचा विचार आत्मसात करणं आणि आपण शिकतोय त्यावर प्रेम करणं.

शिकतोय त्यावर प्रेम करणं फार महत्त्वाचं. गुरुजी स्वत: नृत्य करताना आणि शिकवताना, ते प्रेम त्यांच्या नसानसांतून ओसंडून आमच्यापर्यंत पोहोचायचं, आम्ही ते अधाशासारखं घ्यायचो. सर्वच नाही, पण आम्ही काही जणी तरी अधाशी होतो. मी तर नक्कीच आणि म्हणूनच आता मला माझ्या मुलांना ते देता येतंय. कटकला गुरुजींच्या घरी राहून आम्ही नृत्य शिकत होतो. शिल्पकार जसं शिल्पं घडवतो, तसं गुरुजी आम्हाला घडवत असत. चक्क आमचं शरीर ते त्यांना हवं तसं वळवायचे. पाठीत बुक्का घालून असो की कोपरावर टिचकी मारून असो की चेहरा हातात घेऊन फिरवणं असो, गुरुजी आमचं शरीर त्या देवळातल्या शिल्पासारखं दिसेपर्यंत थांबायचे नाहीत.(ओडिसी नृत्य शैली बरीचशी देवळातल्या शिल्पांवर आधारित आहे.) सकाळी नाश्ता आटोपून जो क्लास सुरू व्हायचा, त्याला अंतच नसे. गुरुजींना भूक-तहान याची कधी जाणीवच होत नसे. बरेच वाजले आणि तरी क्लास चालू बघून शेवटी गुरू माँ हाका मारून क्लास बंद करून जेवायला द्यायची. तीच तेव्हाची आमची तारणहार होती.

गुरुजींची कलादृष्टी, कल्पनाशक्ती अफलातून होती. जयदेवाच्या एक अष्टपदीतली एक ओळ – जिचा अर्थ असा – राधा, कृष्णाची वाट बघते आहे, आणि तिला भास होतो आहे की तो आला आहे. हे विस्तारित करण्यासाठी गुरुजींची कल्पनाशक्ती त्या ओळीला कुठल्या कुठे घेऊन गेली.. राधा कृष्णासाठी हार गुंफते आहे. ती जमिनीवरचं फूल घ्यायला वळते, तोच तिला कृष्णाची कमळासारखी पावलं दिसतात..धुंद होऊन थोडी वर बघते तर पितांबर दिसतं, प्रेम भावात बुडालेली राधा आणखी वर बघते तर कौस्तुभ माळा, मुकुट, मोरपीस आणि बासरी दिसते.. स्वप्नात असलेली राधा त्याला थांब म्हणते आणि त्याच्या गळ्यात हार घालते. शेवटी आलिंगन द्यायला जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की अरे.. हा भास होता, कृष्णा इथे नाहीच. ओळीत फक्त भास होतो असं आहे, पण गुरुजींनी त्या भासातून जिवंत कृष्णा उभा केला. जयदेवाच्या मनात जे अभिप्रेत होतं ते गुरुजींनी शरीरातून, भावमुद्रेतून सामोरं आणलं. कित्येक थिएटर आणि सिनेमावाले लोक गुरुजींचा अभिनय बघण्याकरता यायचे.

हीच गुरुजींची कल्पनाशक्ती मी आत्मसात केली. एक उदाहरण देते. नेहरू सेंटरसाठी ‘अष्टनायिका’ या विषयावर अनेक नृत्यशैलीतून कार्यक्रम बसवला होता. त्या त्या शैलीची एक एक नर्तिका. प्रत्येकीला एक हिंदी काव्य दिलं होतं, जे आपल्या शैलीतून मांडायचं. माझ्या काव्यात, प्रियकराने माझ्यासाठी अनेक दागिने बनवले असं होतं. मी त्या दागिन्यांचं वर्णन खूप वेगळ्या पद्धतीने केलं. माझ्या कमरेभोवती त्याने हात धरले तर तो माझा कंबरपट्टा.. गळ्याला आलिंगन केले तर तो माझा मोत्यांचा हार..  मनगटाला धरून जवळ खेचले तर ती झाली माझी बांगडी आणि बोटाचे चुंबन घेतले तर ती झाली माझी अंगठी.. माझा प्रियकर जर माझ्या संगतीत आहे तर तोच माझा दागिना आहे ना.. दुसरे दागिने कशाला पाहिजेत..? तेव्हा माझ्या बरोबरीच्या अवाक झाल्या.. ‘‘ए झेलम, तुला हे कसं गं सुचलं?’’ मी म्हणाले, ‘‘ माझे गुरुजी.. आहे की नाही.. केवढी देणगी दिली आहे मला?’’

हे झालं गुरुजींच्या कलेबद्दल आणि कलेच्या प्रेमाबद्दल, श्रद्धेबद्दल. आता वळते गुरुजी माणूस म्हणून कसा होता त्याकडे. अतिशय गोड आणि खुलं व्यक्तिमत्त्व होतं त्यांचं. माणसं जोडणं आणि शिस्तीत वागणं, राहणं, हे मी राष्ट्र सेवा दलात शिकले होतेच, आणि आमच्या घराचादेखील तो स्थायीभाव होता असं मला वाटतं. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात माझी २० र्वष तरी गेली असतील. सक्रिय, अनेक कार्यक्रम करत भारतभर फिरणं होत असे. (अशाच एका दौऱ्यात, ओडिसामध्ये मला गुरुजींचं आणि ओडिसीचं दर्शन झालं). मध्यवर्ती कलापथक बंद होण्याआधीच मी ओडिसीकडे वळले होते. आधी शंकर बेहेरा आणि मग केलुचरण महापात्र. पण केलुचरण महापात्र ही व्यक्ती अगदी तशीच होती. माणसं जोडणं हा तर त्यांचा स्थायीभाव होता असं मी मानेन. अतिशय प्रेमळ आणि लाघवी. इतका मोठा माणूस, पण कधीही समोरच्या व्यक्तीला अस्वस्थ वाटू दिलं नाही. कितीही वयाने अथवा कर्तृत्वाने समोरची व्यक्ती लहान असेल, गुरुजी तितक्याच आपुलकीने सर्वाशी बोलायचे, चौकशी करायचे. सगळ्यांना आपलंसं करून घ्यायचे.

त्यांचं जितकं आपल्या कलेवर प्रेम आणि श्रद्धा होती, तितकंच प्रेम आणि श्रद्धा ते हाती घेतलेल्या कुठल्याही कामावर करीत. मग ते एखाद्या कार्यक्रमाच्या कपडेपटासाठी असो, मेकअपसाठी असो, प्रकाशयोजनेसाठी असो, सेटची रंगसंगतीसाठी असो.. सर्व तितकंच जीव ओतून करायचे. त्यांचा प्रत्येक कलाकार, नर्तक, नर्तिका सुंदर दिसल्या पाहिजेत, यासाठी ते मेकअप आणि कॉस्च्युमवर खूप विचार करायचे. कुठलाही कार्यक्रम सादर होण्याआधी, गुरुजी त्या सादरीकरणाची प्रत्येक बाजू निरखून बघायचे, तपासायचे, आणि हीच सवय मलादेखील लागली आहे. साधी गोष्ट घ्या – कार्यक्रम चालू असताना एन्ट्री घेणारे बरेच जण आधीच विंगेत येऊन उभे राहतात. इतके विंगेजवळ, की प्रेक्षकाला कळतं त्या व्यक्तीची एन्ट्री आहे ते, आणि ते झालं, की एकूणच स्टेजवर जे चालू आहे, जी वातावरणनिर्मिती झाली आहे, त्यात खंड पडू शकतो. मी अनेक चांगले कार्यक्रम पाहिले आहेत, परंतु इतक्या साध्या गोष्टीची कोणी खबरदारी घेत नाही. या गोष्टींचं लोकांना महत्त्वच समजत नाही. इतक्या छोटय़ा गोष्टीनेही रसभंग होऊ  शकतो हे जाणवत नाही. ही एकच बाब झाली, अशा अनेक आहेत, ज्यामुळे आपलं सादरीकरण उत्कृष्ट होतं.

मी म्हटलं तसं, हाती घेतलेलं कुठलंही काम ते तितक्याच श्रद्धेने, प्रेमाने आणि जीव ओतून करायचे. आणि कुठल्याही कामाला ते कमी लेखायचे नाहीत. त्यांची जी दृष्टी नृत्याकडे आणि सादरीकरणाकडे होती, तीच दृष्टी घरातला संडास अथवा बाथरूम स्वच्छ करायची असेल किंवा स्टोव्ह दुरुस्त करायचा असेल किंवा झाडांना पाणी घालायचं असेल, त्या कामांकडेही होती. ही वॉज परफेक्शनिस्ट. कुठल्याही गोष्टीची नैतिक परिपूर्णता शक्य आहे, यावर त्यांचा गाढ  विश्वास होता. आणि म्हणूनच एखाद्या शिष्येवर ते जितका वेळ दवडतील, तिचा नृत्यबांधा ठीक करण्यात, तितकाच आणि तसाच वेळ ते देतील संडासचा कोपराकोपरा स्वच्छ करण्यात.

कदाचित हे सर्वाना समजणार नाही, पण या छोटय़ा वाटणाऱ्या मोठय़ा गोष्टींतून गुरुजींनी मला आयुष्यातले अनेक पैलू दाखवले. अनेक धडे शिकवले, शिकवायचे म्हणून नाही शिकवले, पण वागणुकीतून माझ्यापर्यंत पोहोचवले आणि मी ते स्वीकारले. मी म्हटलंच आहे की गुरुजी सर्वाना आपलंसं करून घ्यायचे, ते काही वरवर किंवा तोंडदेखलं नसायचं. शिष्यांबरोबर तर फारच घट्ट नातं होतं. प्रत्येक शिष्य त्यांच्या मनाच्या आणि हृदयाच्या कुठल्या तरी कप्प्यात असायचा. सुरुवातीला, म्हणजे शिष्य नवीन असेल तेव्हा नावात गोंधळ करायचे, पण शिष्याचा आगापिछा लक्षात असायचा! जसं सुरुवातीला मला झेला म्हणायचे, कारण झेलम लक्षात राहायचं नाही. पण एकदा का नाव डोक्यात फिट्ट बसलं की कधी विसरायचे नाहीत. माझं गरोदरपण, बाळंतपण, मुलगा मोठा होणं, हे सर्व गुरुजींनी बघितलंय.. बघितलंय म्हणणार नाही मी, अनुभवलंय म्हणीन. कारण क्लास चालू असताना (मुलगा तान्हा होता तेव्हाची गोष्ट), एकदम मला म्हणायचे, ‘‘ए पोरी, नमस्कार करून जा, पोराला दूध पाज, काही तरी खा आणि मग परत ये क्लासला..’’ मला जेव्हा पाठीचा त्रास सुरू झाला तेव्हाचं आठवलं.. गुरुजींबरोबर आम्ही रशियाला गेलो होतो. मोठा संच होता. एकदा घाईघाईने सर्व सामान बसमध्ये भरायची वेळ आली होती. मला त्यांनी काही बॅगा उचलताना पाहिल्यावर म्हणाले, ‘‘तू का करतेस? बाकी बरेच जण आहेत, तुझ्या पाठीला सांभाळ.. नाचायचं आहे..’’

मी खरंच माझं भाग्य समजते की केलुचरण महापात्र यांच्यासारखा मला गुरू लाभला.. शब्दमर्यादेमुळे आवरतं घेतेय अन्यथा मी गुरुजींबद्दल अखंड लिहीतच राहू शकले असते.. पण गुरू आहे म्हणजे शिष्य येतोच.. त्याविषयीही बोलायला हवंच. आज ‘स्मितालय’मध्ये अनेक जण नृत्य शिकायला येतात. पण सर्वप्रथम मला सांगायचंय ते हे, की मी स्वत:ला गुरू समजत नाही. मी स्वत:ला शिक्षक समजते. अर्थात माझे शिष्य तसं समजत नाहीत. त्यांना वाटतंच की मी त्यांना नृत्याहून बरंच काही जास्त दिलं आहे. त्यांच्या दृष्टीने त्यांचं बरोबरच आहे, पण मला माझ्या डोळ्यांसमोर आणि अंतरात गुरुजींसारखा माणूस गुरू म्हणून असताना मला स्वत:ला गुरू म्हणवत नाही. एक नक्की म्हणेन.. मी खूप गुरुजींसारखी आहे. नकळत गुरुजी माझ्या नसानसांत भिनले आहेत, जसं ओडिसी नृत्यदेखील माझ्या नसानसांत भिनलं आहे. माझी शिकवण्याची पद्धत, शिकवताना वर्गात वागण्याची पद्धत, शिष्यांशी प्रेमादराने वागण्याची पद्धत, शिष्यांची पोरं क्लासमध्ये गोंधळ घालत असतील तर त्यांना सांभाळण्याची पद्धत.. सर्व गुरुजींसारखंच. आणि अर्थात, प्रत्येक काम नीटनेटकं असावं, मेकअप अथवा प्रकाशयोजना अथवा घरातला संडास अथवा अन्य कित्येक गोष्टी, नीटनेटक्याच होतात..!!

मी शिकले ती गुरुगृही राहून, गुरू-शिष्य परंपरेप्रमाणे. शिकत असताना घरातली बरीच कामं करत. पण मुंबईत तसं होणं शक्य नाही. तरी माझ्या परीने मी मुलांना ती शिकवण दिली. एक उदाहरण सांगते. एकदा क्लासची जमीन स्वच्छ नव्हती. मी एक झाडू उचलला आणि केर काढू लागले व तिथे असलेल्या शिष्याला सांगितलं, ‘तू पण एक झाडू घे आणि मदत कर मला.’ प्रतिक्रिया मिळाली, ‘‘आम्ही फी भरतो, आम्ही का हे करावं?’’ त्यावर मी समजावलं, ‘‘आज झाडूवाल्याची तब्येत खराब असेल, म्हणून का आपण अस्वच्छ जागेत नाचावं?’’ पुढच्या क्लासच्या वेळेस मला तोच शिष्य झाडू मारताना दिसला.. ‘‘मी विचारलं, काय रे झाडूवाला आला नाही का?’’ ओशाळून मला म्हणाला, ‘‘आलाय. पण मला वाटलं आपला क्लास आपणच स्वच्छ करायला काय हरकत आहे..’’

मी जशी अधाशासारखं गुरुजींकडून घ्यायचे, तसे माझेदेखील काही शिष्य आहेत, जे अधाशासारखे घेतात, आणि मी त्यांना भरभरून देते.. आमच्या ‘स्मितालय’मध्ये सर्व समान आहेत. ‘स्मितालय’ म्हणजे आमचं एक कुटुंबच आहे. घरी एक कुटुंब, तसं हे नृत्याचं कुटुंब. प्रत्येकाला माहीत आहे की आपण चांगलं नृत्य करतो कारण आपण निष्ठेने शिकतो, झेलमताईला अपेक्षित आहे ती नैतिक ‘परिपूर्णता’ गाठायचा प्रयत्न करतो, आणि जरी आपण कोणापेक्षा तरी चांगले असलो, तरी दुसऱ्या कोणापेक्षा कमीदेखील आहोत.. म्हणूनच ‘स्मितालय’मध्ये एक निकोप स्पर्धा दिसून येते. शिकवता शिकवता मी माझ्या शिष्यांकडून बरंच काही शिकलेदेखील. काही बाबतीत एखादा शिष्य माझ्यापेक्षा निष्णात आहे हे जाणवल्यावर, त्याला त्या दिशेने वाढण्याची मुभा देणे; काही गोष्टी एखाद्या शिष्याला उमगल्या नसल्यामुळे तो वाद घालत असेल तर त्याला समजेपर्यंत वाद घालू देणे; माझ्याकडे ओडिसी शिकत असताना, दुसरी एखादी शैली शिकावीशी वाटली तर त्याला शिकू देणे; मी स्वत: ओडिसी शिकवत असताना दुसऱ्या एखाद्या ओडिसी शिक्षकाला माझ्या विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यास बोलावणे.. अशा अनेक चिजा, ज्या मी शिष्य म्हणून गुरुजींबरोबर असताना घडूच शकल्या नसत्या..

सरतेशेवटी मी असं म्हणेन की गुरुजींनी मला जे आयुष्यं दिलं – नृत्यातून, तेच आयुष्यं माझे शिष्य एकसिद्धीला नेत आहेत, माझ्या आयुष्याला परिपूर्तीचा स्पर्श देत आहेत.

-झेलम परांजपे