ईर्षां, स्पर्धा ही मनाच्या आणि समाजाच्या आरोग्यासाठीही घातक असते. ती स्वत:चे आणि इतरांचे नुकसान करते. मनात अशी ईर्षां असली, स्पर्धा निरोगी नसली, की आपलं मन योग्य कृतींपासून, कामापासून आणि प्रयत्नांपासून विचलित होतं. अहंकार, गर्व, दुरभिमान वाढतो. याउलट दुसऱ्यांच्या आनंदात आनंद असला तर आपण मोकळ्या, निर्मळ मनाने शुभेच्छा देऊ शकतो, अभिनंदन करू शकतो. त्यामागे ‘माझं असं कसं’ हा उसासा नसतो..

‘‘अहो, सततच्या मागण्यांनी मी आता हैराण झालोय. मोठय़ा कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर असलो तरी पगाराचा आकडा ठरलेला आहे. वडिलेपार्जित किंवा इतर मार्गानी कमावलेले पैसे नाहीत माझ्याकडे! किती वेळा मी निलिमाला समजावलं हे; पण तेवढय़ापुरतं समजून घेते. एखाद्या मैत्रिणीने नवीन काही खरेदी केली, की झाली हिची पुन्हा माझ्यामागे भुणभुण सुरू! विद्याने अमुक कंपनीचा इतके डोअरवाला फ्रिज घेतला! आपला फ्रिज जुना झालाय. आपण विद्यासारखा नवा फ्रिज घेऊ! वर्षांच्या नवऱ्याला गाडय़ांचा शौक आहे. सारखा गाडी बदलतो. त्यांची नवी गडी आली, की हिला आमची गाडी जुनाट वाटू लागते. एखाद्या मैत्रिणीने फर्निचर बदलले, की हिलाही सारखं तेच तेच फर्निचर बघून कंटाळा येतो. मग हिलाही नवं फर्निचर करायचं असतं. अमक्याची मुलं ज्या शाळेत जातात तिथेच आमच्या मुलांना प्रवेश हवा असतो. नव्या साडय़ा, ड्रेस, दागिने, पर्सेस- त्या शॉपिंगबद्दल न बोललेलंच बरं! मी आता या सगळ्याला इतका कंटाळलो आहे, की खरोखर जीव द्यावासा वाटतोय!’’ पस्तिशीतील उच्चशिक्षित सुस्थितीतला अमित डोळ्यांत पाणी आणून सांगत होता. त्याची पत्नी नीलिमा हिच्याविषयी तक्रार होती.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

नीलिमाशी बोलताना लक्षात आलं- नीलिमाला इतरांविषयी ईर्षां वाटते. इतरांना जे मिळतं ते मलाही मिळालं पाहिजे, इतरांना ज्या सोयीसुविधा मिळतात त्या मलाही मिळायला हव्यात, इतरांना जे यश मिळतं ते मलाही मिळायला हवं, असा तिचा अट्टहास होता. असं वाटण्यात आपलं काही चुकतंय किंवा अशा तऱ्हेने इतरांशी स्पर्धा करणं अयोग्य आहे हेही तिला समजत नव्हतं; पण अशा ईर्षेने आणि सततच्या अवाजवी स्पर्धा करण्याने ती स्वत:ला आणि कुटुंबीयांना, विशेषत: नवऱ्याला ताण निर्माण करत होती. इतका की त्याला जीव नकोसा झाला होता.

एकदा एक नववीतली मुलगी परीक्षेत नापास होते म्हणून आली होती. तिच्याशी बोलताना लक्षात आलं की, ती चांगली हुशार आहे. अभ्यासही नीट करते; पण परीक्षेला जाताना मनावर प्रचंड ताण असतो. ती म्हणाली, ‘‘पेपरला जाताना मला सारखं वाटतं की, माझा काहीच अभ्यास झालेला नाही. माझ्या सगळ्या मैत्रिणींचा मात्र खूप छान अभ्यास झालाय. त्यांना सगळं येतंय आणि मला मात्र काहीच येत नाही. त्यांना नक्कीच चांगले  गुण मिळतील. फक्त मीच नापास होईन. मग सगळी जणं मला हसतील, चिडवतील. माझ्या आईबाबांची मान खाली जाईल. या विचारांमुळे मला इतका अस्वस्थपणा येतो, की प्रश्नावरसुद्धा फोकस करू शकत नाही. उत्तरं खरं तर येत असतात, पण नीट आठवतच नाही. कधी कधी तर उत्तरं लिहिताच येत नाही. निकाल  वाईट लागतो. माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या पुढे जातील. त्यांचं सगळं वेळच्या वेळी व्यवस्थित होईल. मी मात्र मागे पडेन, असं वाटतं रहातं. नकोच असं जगणं. एवढय़ा मानहानीने जगण्यापेक्षा मेलेलं काय वाईट?’’

सुरेश घरी आला तो रागातच. नंदाने दार उघडताच, ‘‘किती वेळ लावतेस दार उघडायला?’’ म्हणून तो तिच्यावर जोरात खेकसला. बूट काढून फेकले. लाडाने जवळ आलेल्या छोटय़ाला एक चापटी मारून दूर केले. कपडे बदलून काही न खाता तो खोलीत आढय़ाकडे बघत बसून राहिला. तोंडातल्या तोंडात बॉसला, सहकाऱ्यांना शिव्या देत होता. त्याला बढती मिळाली नाही हे उघडच होते. याचबरोबर त्याच्या दोघा सहकाऱ्यांना मिळाली हेही नंदाला कळले होते. आता पुढचे काही दिवस सुरेश धुमसत, संतापत, शिव्या देत घरातल्या सगळ्यांना त्रास देणार होता. आपण बढतीसाठी लायक आहोत, पण आपल्याला त्रास देण्यासाठीच आपला बॉस आपण सोडून आपल्या नालायक सहकाऱ्यांना ती देतो, अशी सुरेशची खात्री पटली होती. नंदाला फार भीती वाटत होती. पुन्हा सुरेश नोकरी सोडून देतो की काय! आतापर्यंत त्याने याच कारणाने सहा नोकऱ्या सोडल्या होत्या. शैक्षणिक पात्रतेच्या जोरावर त्याला नोकऱ्या मिळत होत्या; पण वेळेवर न जाणे, सतत इतरांशी स्पर्धा करणे, सारखी बरोबरच्या सहकाऱ्याशी तुलना करणे आणि आळशी स्वभाव यामुळे प्रत्येक ठिकाणी हळूहळू तो आवडेनासा होत असे आणि त्याची बढती हुकत असे.

ही अशी माणसं आपल्याला अनेकदा आजूबाजूला, ओळखीत दिसतात. कधी कधी आपणही असे असतो. निर्मळ मनामध्ये चोरपावलांनी शिरलेली अवास्तव स्पर्धा आणि ईर्षां मनामध्ये वादळं निर्माण करतात. कधी तरी आपण अशी ईर्षां करतोय हेही लक्षात येत नाही. आपल्याला जे आहे, जे मिळतंय त्याचा उपभोग घेण्याचा आनंद ही ईर्षां, ही स्पर्धा हिरावून घेते. इतकी की, मिळालेलं यशसुद्धा कवडी मोलाचे वाटू शकते. या अवाजवी, अवास्तव स्पर्धेमागे, ईर्षेमागे ‘माझ्यावर नेहमीच अन्याय होतो’, ‘माझ्या इतकी लायकी आहे, दुसऱ्यांची नाही तरी त्यांना यश मिळते, हा माझ्यावर अन्याय आहे’, ‘मी सगळ्यांमध्ये प्रथम/श्रेष्ठ/उत्कृष्ट आहे आणि ते सर्वानी मान्यच केले पाहिजे’, ‘सर्वात उत्कृष्ट असण्याचा सर्वोच्च ते मला मिळण्याचा माझा हक्कच आहे’, अशा प्रकारचे काल्पनिक अयोग्य न्यायाचे, अहंकाराचे विचार असतात. कधी कधी स्वत:ची कमी असणारी लायकी, कमी पडणाऱ्या क्षमता आणि उमजलेले न्यून झाकण्यासाठीही नकळत ईर्षां आणि स्पर्धा केली जाते.

अशी ईर्षां, अशी स्पर्धा ही मनाच्या आणि समाजाच्या आरोग्यासाठीही घातक असते. ती स्वत:चे आणि इतरांचे नुकसान करते. मनात अशी ईर्षां असावी, निरोगी स्पर्धा असली की योग्य कृतींपासून, कामापासून आणि प्रयत्नांपासून लक्ष विचलित होतं. मन याच विचारांनी भरल्याने कामाच्या वा प्रयत्नांच्या विचारांना दुय्यम स्थान मिळते. सारासार विवेक कमी होतो. अहंकार, गर्व वाढतो. चुकीच्या दिशेने चुकीचे विचार आणि त्यामुळे चुकीचे नुकसान करणारे वागणे घडते.

यापेक्षा स्पर्धा करावी ती स्वत:शीच. एक तर स्वत:शीच स्पर्धा असल्याने त्यातली काळजी, भीती, चिंता अशी राहात नाही. ‘मी कसा होतो – कसा आहे आणि कसा (आदर्श) मी बनणार आहे’ हाच विचार करायचा. क्षणाक्षणाने, कणाकणाने, विचाराने, कृतीने स्वत:मध्ये योग्य चांगला बदल घडवत जायचे. स्वत:ला सुधारत न्यायचे, आणखी चांगले जगण्याच्या सर्व स्तरांवर घडवत न्यायचे. इतरांशी स्पर्धा आणि ईर्षां करण्यापेक्षा ‘सगळ्यांचे चांगले होवो’ असा उदार भाव मनात ठेवायचा. इतरांबद्दल मनात शुभ इच्छा ठेवल्या, की आपण आत्मपरीक्षण करत स्वत:ला उत्तम करण्याच्या प्रयत्नासाठी मोकळे होतो. यश मिळाले की मस्त मोकळा आनंद होतो. अपयश आले तरी आत्मपरीक्षणाने आपल्या चुका समजतात. त्या कृतिशीलतेने सुधारता येतात. आपण मनापासून प्रयत्न करतो आहोत, काम करतो आहोत याची सात्त्विक खात्री आपला आत्मविश्वास जागृत करते, वाढवते. योग्य विचाराने योग्य दिशेने आवश्यक ते सारे प्रयत्न करून आपण आपल्या जगण्याचा स्तर उंचावतो. ‘याच्याकडे काय, तिच्याकडे काय, याला काय मिळाले’ – असल्या गोष्टींकडे आपले लक्षच नसते. कुणी काही नवे घेतले, कुणाला भरपूर यश मिळाले, कुणाला बढती मिळाली, कुणी परदेशी जाऊन आले, कुणाच्या मुलाला छान बायको मिळाली, कुणी नवी कार घेतली – आपल्याला छान वाटतं, आनंद होतो आणि मोकळ्या, निर्मळ मनाने शुभेच्छा आपण देऊ शकतो, अभिनंदन करू शकतो. मात्र त्यामागे ‘माझं असं कसं’ हा उसासा नसतो. दुसऱ्यांचं भलं झालं म्हणजे माझं वाईट झालं अशी विकृत समज नसते. जीव हवासा वाटतो आणि जगणं मस्त मजेत चालतं.

अंजली पेंडसे

manobal_institute@yahoo.co.in