प्रत्येकाला सहजीवनात थोडासा वेगळा वेळ हवा असतो. दैनंदिन जगण्यापेक्षा वेगळं काही तरी करावंसं वाटतं, पण अलीकडे जोडप्यांच्या सहजीवनात तसं घडताना दिसत नाही. वीकेंडला कुठेतरी हॉटेलिंग, शॉपिंग होतं, फार फार तर एखादा सिनेमा, नाटक किंवा हॉटेलच्या बंदरूममध्ये वीकेंड. या पलीकडे सहजीवनाचा वेगळा अर्थ शोधता येईल का? रोजच्या दैनंदिन जगण्यात बदल करता येईल का? उद्याच्या व्हॅलेन्टाइन डेनिमित्त खास लेख.

लग्न होतं. पती-पत्नीचं सहजीवन सुरू होतं. सहजीवन म्हणजे नेमकं काय? सहजीवनात एकमेकांकडून काय काय अपेक्षा असतात. अपेक्षित सहजीवनात फक्त दोघेच असावेत की कुटुंब म्हणजे सहजीवन? सहजीवन म्हणजे मुलांना, सासू-सासऱ्यांना धरून असावं की नाही? ते कसं असायला हवं? अनेक जोडप्यांना हे माहीत असतं तर कित्येकांना नाही. कित्येकांना तर असा विचार करायचा असतो हेही माहीत नसतं. अपवाद सोडला तर बहुतांशी जोडप्यांचे सहजीवन हे मुलं, मुलांचे शिक्षण, रोजचा स्वयंपाक, नोकरी, सासर नि माहेर या भोवतीच फिरताना दिसतं.
आता तुम्ही म्हणाल, की मग दुसरं काय असायला हवं? यालाच तर लौकिक अर्थाने सांसारिक पती-पत्नींचं सहजीवन म्हणतात. सोबत जगतो खरं, पण मग तरीही ओरड असतेच की हा/ही मला वेळ देत नाही. पाहुण्यांसारखे भेटतो. घराचा वापर फक्त रात्री झोपण्यासाठीच होतो. इत्यादी इत्यादी इत्यादी. प्रत्येकाला सहजीवनात थोडासा वेगळा वेळ हवा असतो. दैनंदिन जगण्यापेक्षा वेगळं काही तरी करावंसं वाटतं, पण रोज तसं घडत नाही. वीकेंडला कुठेतरी हॉटेिलग, शॉिपग होतं, फार फार तर एखादा सिनेमा, नाटक किंवा हॉटेलच्या बंदरूममध्ये वीकेंड. अनेक कुटुंबांमध्ये याव्यतिरिक्त फारसं वेगळं चित्र दिसत नाही.
लक्ष्मीबाई टिळकांचे हे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मवर्ष आहे. या निमित्ताने ‘स्मृतिचित्रे’ या त्यांच्या आत्मचरित्राचं अभिवाचन करताना पती-पत्नी म्हणून उभयतांच्या नात्यातील सहजीवनाचे अनेक प्रसंग असे आहेत की जे आताच्या काळात लावून पाहिले तर असं सहजीवन घडताना आता फारसे दिसत नाहीत. लक्ष्मीबाईंनी सहजीवनात स्वतला बाजूला वा अलिप्त ठेवलं नाही, त्यांनी सहजीवनात स्वत:चाही विकास केला नि सहजीवनही सुफळ संपूर्ण केलं, ते केवळ सांसारिक जबाबदाऱ्या व फक्त कर्तव्य पार पाडून नाही. परस्परपूरक असणारं हे सहजीवन आगळं ठरतं, पण अलीकडच्या काळात असं घडताना फारसं दिसत नाही. का ते कळत नाही. सहजीवन हे स्थलकालसापेक्ष असते का?
रेव्हरंड टिळकांचं कवीमन आणि लक्ष्मीबाईंची विकसित होत जाणारी साहित्यिक जाणीव हा त्यांच्या सहजीवनाचा प्रवास आहे. लक्ष्मीबाई आणि टिळकांच्या काळात पती-पत्नीचंच सहजीवन असा काही प्रघात नव्हता, अर्थात तेवढा संकुचित अर्थ आताही नाही, पण त्या काळातही या टिळक पतीपत्नींच्या जीवनात अनेक गोष्टी फुंकर घालणाऱ्या, जगायला शिकवणाऱ्या, गोड छळणाऱ्या, मत्र भाव जपणाऱ्या घडत होत्या. त्या तुलनेत आताच्या काळात स्वातंत्र्याचा महापूर आहे, तरीही आयुष्ये लौकिकार्थानेच समृद्ध करण्याकडे कल आहे. सोंगटय़ा खेळणं, लक्ष्मीबाईंना पाणी भरण्यास मदत करणं, मासिकपाळीच्या काळात पत्नीला स्वयंपाक करून जेवू घालणं, घरच्या घरी लक्ष्मीबाईंना शिकवून टिळकांनी तर सहजीवनाचा आदर्श पाया घातला आहे. सहजीवनाच्या विविध पलूंवर
दोघांचंही पूर्ण आयुष्य बेतलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.
या बाबतीत काही जोडप्यांचे सहजीवनातील अनुभव जाणण्यासाठी काही प्रश्न त्यांना विचारले, सांसारिक जबाबदाऱ्या सोडून सहजीवनातील तुमचा वेळ कसा घालवता, तर यावर सुरुवातीचे उत्तर ‘वेळ नाही’ असंच आलं. सांसारिक व वैवाहिक जबाबदाऱ्या व कर्तव्ये सोडून तुम्ही तुमच्या सहजीवनात इतर कोणत्या गोष्टी करता असं विचारलं की मग विचार प्रक्रिया सुरू होते. अर्थात विचारांती फारसं काही सापडत नाही, ही गोष्ट वेगळी. मग उदाहरण देवून स्पष्ट केले की, लक्ष्मीबाई आणि टिळक संसार सांभाळून, सहजीवनात सोंगटय़ा खेळायचे, एकमेकांना हरवायचे, चिडवायचे, एकमेकांवर हसायचे. टिळकांनी लक्ष्मीबाईंना अक्षर ओळख दिली, लक्ष्मीबाईनी टिळकांचे धर्मातराचे व्याप सांभाळले यापकी तुम्ही मत्रीपूर्ण असा भाव काही जपला आहे का?
कविता म्हणाली, ‘‘छे! नवऱ्याला चिडवायचे, त्यांची गंमत म्हणून फजिती करायची, म्हणजे भलते दुखणे! कोण ओढवून घेईल? शक्य तेवढे त्याचा इगो कसा जपता येईल, पोसता येईल हे बघायचे. बाकी त्यांच्या वाटेला जायचे नाही.’’ प्रवीण आणि माधुरी म्हणतात, ‘‘पूर्वी आम्ही बॅडिमटन खेळायचो, पण लग्नानंतर अगदी सुरुवातीला हं, आता रोजच्या रामरगाडय़ात वेळ मिळत नाही. गप्पाही फारशा वेगळ्या विषयांवर होत नाहीत.’’ सध्याच्या आयुष्यातील जोडप्याचा विचार केला तर मूल, सासर, नोकरी, स्वयंपाक आणि रविवार या पाच जबाबदाऱ्यांना धरून सहजीवनातील दैनंदिन सुरू आहे, असं प्रथमदर्शनी दिसतं. यापेक्षा काही वेगळं आहे हे का जाणण्याचा प्रयत्न केला असता काही जोडप्यांनी सांगितले. आम्ही दोघे एकत्र चहा घेतो, भाजीला जातो, गप्पा मारतो, अगदी पुढे जाऊन बेडरुममध्ये एकत्र असतो.(?) या चारपाच गोष्टींवर बहुतांशी जोडप्यांच्या सहजीवनातील कृती संपतात!
मग जरा वेगळं विचारलं, सहजीवनात रुटीनपेक्षा कोणती वेगळी गोष्ट करता? तुमचं नातं तुम्हाला
कोणती मोकळीक देतं? वृंदा आणि अभिजीत म्हणतात की, ‘‘आम्ही लाँग ड्राइव्हला जातो. एकमेकांच्या सोबत बसून राहतो किंवा सोबत ड्रिंक्स घेतो. मला हवं ते काम करता येतं. हवं तसं राहता येतं. ही माझ्या नात्यानं मला मिळालेली मोकळीक आहे.’’
एकदा का मित्र-मैत्रिणीचे पत्नी-पत्नी झाले की ईष्र्या (चांगल्या अर्थाने), मैत्र, भाव संपतो का?
त्यामुळे होणारे, उद्भवणारे धोके जोडीदाराने गृहीत धरले आहेत. आम्ही त्यावर पूर्ण विचारांती निर्णय घेतला आहे.’’
( एकदा का मित्र- मैत्रिणीचे पती-पत्नी झाले की ईष्र्या, (चांगल्या अर्थाने) मैत्र, भाव संपतो का? की पतीपत्नीच्या नात्यात तो नसलाच पाहिजे, तो फक्त काळजी, जबाबदारी आणि कर्तव्याचा असला पाहिजे, मिश्कील नसावा?
टिळक दिवस दिवस लक्ष्मीबाईंना न सांगता त्यांच्या छंदापायी कुठेही निघून जात हे मैत्र म्हणून म्हणा किं वा नवरा म्हणून. पण अशी मोकळीक सहजीवनात, नात्यात दिसत नाही.)
प्रत्येकाचं सहजीवन हे स्वतंत्र असतं. तुमच्या सहजीवनातील नातं तुम्हाला लिबर्टी वा स्पेस देतं की त्याचा सांसारिक चौकटीतच विचार करायला हवा, असा फतवा आहे?
टिळकांनी मित्रत्वाच्या नात्याने एखादी गोष्ट केली की, टिळक लक्ष्मीबाईंना म्हणायचे की तुला कौतुक करता येत नाही आणि कळतही नाही. असे काही मैत्र भाव जपणारे सहजीवनात घडते का, जोडीदाराकडून प्रशंसा होते का? की त्यातही लगेचच संसार डोकावतो.
बाल कवी ठोंबरे हे लक्ष्मीबाईं व टिळकांच्या सहजीवनातील बाहेरील पुरुष. टिळकांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे लक्ष्मीबाईंवर टाकली. टिळकांच्या संसाराबाहेरच्या ध्येयाला लक्ष्मीबाईंनी न कुरकुरता साथ दिली. आजच्या सहजीवनात अशी संसाराबाहेरची एकमेकांवर टाकलेली जबाबदारी ही फारच दूरची गोष्ट ठरते. सांसारिक कर्तव्ये पार पाडणे हेच बहुतांशी जोडप्यांचं सहजीवन होऊन बसलंय.
वैवाहिक संसार म्हणजेच सहजीवन (का)? कुटुंबाच्या ध्येयासाठी असणारे सहजीवन हल्ली सगळीकडे पाहायला मिळते. अर्थात ते असायला हरकत नाही, परंतु त्यामुळे वैयक्तिक वृत्ती सुखावण्यासाठी हव्या असणाऱ्या गोष्टी मात्र इतरत्र वीकेंडला, मित्रमैत्रिणींबरोबर, वेळ मिळेल तेव्हा किंवा अगदी सेवानिवृत्त झाल्यावर केल्या जातात वा करण्याचे ठरवले जाते, असं चित्र दिसतं. माहितीतल्या एका काकूंनी सेवानिवृत्त झाल्यावर पहिलं काम काय केलं असेल तर सर्व काही अलबेल असतानाही, नवऱ्यापासून घटस्फोट घेतला. सांसारिक जबाबदाऱ्यातून मुक्त व्हायला साठीची वाट पाहिली आणि मग स्वतंत्र झाल्या. दुसऱ्या एका काकूंनी यजमानांच्या निधनानंतर स्वत:ला हवा तसा हेअर कट केला आणि ठामपणे मुलांना सांगितले की आता मी मला हवे तसे राहणार आहे.
सहजीवनात संधी/ अवकाश का मिळत नाहीत? सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडतानाही (दोघांच्या) वैयक्तिकतेसाठी, एकत्र असण्यासाठीचे अवकाश आणि त्यात विविधता असायला हवी ना! शाल्मली आणि प्रसाद हल्ली दोघेच फिरायला जातात. त्यांना दोन शाळकरी मुलं आहेत, पण तरीही मुलांना सोडून जाताना, कुठल्याही प्रकारे अपराधी न वाटता ते फिरायला जातात व सहजीवनातले मूल्ये जपतात. अनुराधा काकू म्हणाल्या, मी आणि हे सोबत बागकाम करतो, आणि हो छोटछोटय़ा कविता करतो, आणि त्यावरून कधी कधी भांडतोही. पण एन्जॉय करतो. आयुष्य रुटीन न होता फुलायला हवं. आणि ते ठरवूनच करायला हवं.
सहजीवन स्वीकारूनही फक्त सांसारिक जबाबदारीसाठी एकत्र यायचं? वैयक्तिक सर्व गोष्टी बाजूला ठेवून, दोघांच्या एकत्रित काही गोष्टींना दोघांनी सांभाळायचे नाही, फुलवायचे नाही? सहजीवनाचा एवढा संकुचित अर्थ असू नये. सध्या तरी तो अनेक जोडप्यात दिसतोय खरा. वेळ नाही हे खरं आहे का? आणि सहजीवन फुलवण्यासाठी नेमकं काय करायचं? याचा शोध घेऊन नात्यात थोडं वेगळेपण आणलं तर सहजीवनाला खरा रंग चढेल. उद्याच्या व्हॅलेन्टाइन डेला तसा नक्की प्रयत्न करायला हवा.

Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
loksatta chatura Relationships Are You an Alpha Woman
नातेसंबंध: तुम्ही आहात का ‘अल्फा वूमन’ ?
Framework That Stunts Progress
जिंकावे नि जगावेही : प्रगतीला खीळ घालणारी चौकट
Parenting Mistakes That Spoil Children
आई-वडीलांच्या ‘या’ चुकामुळे मुलांवर होतात चुकीचे संस्कार! मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवताना पालकांनी काय काळजी घ्यावी?