Untitled-9महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे साहित्य समीक्षक रा. भा. पाटणकर यांचा गौरव करण्यात आला, त्याप्रसंगी त्यांनी केलेले हे भाषण! त्यात मराठी माणसांच्या नाहीशा झालेल्या ज्ञानेच्छेचे आणि विचारेच्छेचे त्यांनी जे विश्लेषण केले आहे, ते आजही महत्त्वाचे आहे.

मला पुरस्कार देऊन माझा गौरव केल्याबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशन आणि केशव गोरे स्मारक ट्रस्टचा मी आभारी आहे. १९६२ पासून १९६९ पर्यंत मी फक्त इंग्रजीत लेखन करीत असे. श्री. पु. भागवतांसारख्या स्नेह्य़ांच्या आग्रहामुळे मी मराठीत लिहू लागलो. मराठी वाचकाला सौंदर्यशास्त्रीय लिखाणाबद्दल फार आस्था आहे. त्यातील नव्या-जुन्या भूमिका जाणून घेण्यासाठी तो फार उत्सुक आहे, या भावनेने २५ वर्षांपूर्वी माझ्या लेखनाने एक महत्त्वाचे वळण घेतले. ‘सौंदर्यमीमांसा’ या माझ्या पहिल्याच पुस्तकाला साहित्य अकादमीचा १९७४ चा पुरस्कार मिळाला.
सौंदर्यशास्त्र व साहित्यसमीक्षा यांच्याबद्दलची माझी भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. सौंदर्यशास्त्र निर्वात पोकळीत निर्माण होत नाही, त्याला कोठल्या तरी कलासमीक्षेच्या अस्तित्वाची गरज असते. मला सर्वात जवळची कलासमीक्षा म्हणजे साहित्यसमीक्षा. मी १९५२ पासून इंग्रजी साहित्याचे अध्यापन करीत होतो. ते करीत असताना मला १४ व्या शतकापासून २० व्या शतकापर्यंतच्या विविध प्रकारच्या साहित्यकृती शिकविण्याचा योग आला. हे काम करत असताना माझ्यापुढे काही बिकट तात्त्विक प्रश्न उभे राहिले. हे प्रश्न कोणाही साहित्यशिक्षकाला तसेच साहित्य समीक्षकाला पडू शकतील असे आहेत. याचे एक उदाहरण घेऊ. समजा, आपण ‘‘किंग लिअर’ ही एक महान शोकात्मिका आहे’ असे समीक्षाविधान केले. या विधानात दोन संकल्पना वापरलेल्या आहेत- शोकात्मिका व महान. यापैकी दुसरी सरळसरळ मूल्यात्मक आहे आणि पहिली काही प्रमाणात वर्णनपर असली तरी तिला मूल्यात्मकतेचे अंगही आहे. म्हणून आपण जसे लॉरेल-हार्डीच्या चित्रपटाला ती संकल्पना लावत नाही, तसे वाटेल त्या दु:खांत साहित्यकृतीलाही ती लावत नाही. उदा. मेलोड्रामा. वर उल्लेखिलेल्या संकल्पना भिन्न स्वरूपाच्या आहेत. त्यांच्यातील तार्किक संबंध तपासणे अगत्याचे आहे. तसेच शोकात्मिका ही वर्गसंकल्पना व आपल्यासमोरची साहित्यकृती यांतील संबंध तपासणे हेही आवश्यक आहे. शोकात्मिका व व्याघ्रत्व या वेगळ्या जातींच्या संपल्पना आहेत.
व्याघ्रत्वाची सर्वमान्य व्याख्या असू शकते. तिच्यात निर्देशिलेले गुणधर्म ज्या जनावरात आढळतात त्याला आपण वाघ म्हणतो. शोकात्मिका या संकल्पनेने कोणते गुण घ्यायचे, हाच मुळी वादाचा विषय आहे. हडेलहप्पी केली तर गोष्ट वेगळी; पण एरवी हा वाद संपण्यासारखाही दिसत नाही. या व अशा संकल्पनांच्या तार्किक वैशिष्टय़ांचा नीट विचार केला नाही तर समीक्षाव्यवहार नीटपणे चालणार नाही.
मी लिहीत होतो त्या काळात केवल-कलावादाचा बराच प्रभाव होता. पण त्या वादाच्या तात्त्विक मुळापर्यंत जाण्याचा कोणी प्रयत्न करीत नव्हते. त्यामुळे वैचारिक गोंधळ होत होता. पण इंग्रजीत मुळापर्यंत नेणारी पुस्तके उपलब्ध होती. ती मराठी वाचकांपर्यंत पोचविणे आवश्यक होते. त्याचा एक मार्ग म्हणजे या पुस्तकांचा सुलभीकृत परिचय करून देणे किंवा त्यांचा अनुवाद करणे. या मार्गाने जाऊन काहीच साधणार नव्हते, कारण मराठी वाचकाची अडचण भाषेची नव्हती. मुळातल्या सिद्धांतांतील संकल्पना माहीत नसणे, ही ती अडचण होती. त्यामुळे मी भाष्य-लेखनाकडे वळलो. त्यासाठी मी इमान्युअल कांटचे ‘क्रिटिक इस्थेटिक जजमेंट’, बेनेदेत्तो क्रोचेचे ‘इस्थेटिक’ व आर. जी. कॉलिंगवूडचे ‘द प्रिन्सिपल्स ऑफ आर्ट’ ही पुस्तके निवडली. कांट हा समजायला कठीण असल्याचे सर्वजण मान्य करतात. हे पुस्तक लिहिताना कांटने आपल्या आधीच्या दोन क्रिटिक्समधील विवेचन गृहीत धरले असल्याने ही बिकटता वाढली आहे. ही अडचण दूर व्हावी व कांटवरील प्रस्तुत भाष्य स्वयंपूर्ण व्हावे म्हणून मे. पुं. रेगे यांनी कांटच्या विचारव्यूहावर या पुस्तकासाठी खास एक विस्तृत परिशिष्ट लिहिले आहे. प्रस्तुत पुस्तकात त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. क्रोचे व कॉलिंगवूड यांची पुस्तके सोपी वाटतात, पण हा सोपेपणा फसवा आहे. त्यामुळे वाचकाची फसगत होते. कॉलिंगवूडच्या बाबतीत असे व्हावे हे आश्चर्य आहे, कारण त्या काळातील २०-२५ वर्षे त्याचा मराठी समीक्षकांवर बराच प्रभाव होता. पण त्याच्या तत्त्वज्ञानात्मक बैठकीपर्यंत मराठीतील समीक्षक गेले नव्हते. क्रोचेच्या बाबतीत बरोबर हेच घडले होते. या पुस्तकांवर भाष्ये लिहिणे मराठी वाचकांच्या दृष्टीने आवश्यक होते. माझ्या भाष्यांमध्ये नुसती ओळख नाही, चिकित्साही आहे.
सौंदर्यशास्त्राला कलासमीक्षेचा पाया असावाच लागतो, हे याआधी आलेले आहे. त्या काळातील व कदाचित आजच्याही मराठीतील समीक्षेत काही त्रुटी आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची त्रुटी ही की, हे समीक्षक तार्किकदृष्टय़ा अप्रस्तुत अशा गोष्टींवर भर देतात. उदा. ‘ही कादंबरी फार चांगली आहे, कारण तिच्यात व्यापक समाजदर्शन घडते.’ हे प्रस्तुत अशा गोष्टीवर भर देणारे वैध समीक्षाविधान आहे, कारण त्यात कादंबरी कशामुळे फार चांगली ठरते, याचा निकष अनुस्यूत आहे. हे जीवनदर्शन व्यापक आहे की नाही, हे ठरविण्यासाठी वेगळे निकष उपलब्ध आहेत. परंतु व्यापकतेचा शोध घेताना लेखकाच्या लौकिक जीवनाकडे जाणे हे प्रस्तुत नाही. एक तर त्यातून निकष मिळत नाहीत आणि तसे करणेही घातक आहे, कारण बहुतेक वेळा लेखकाचे लौकिक जीवन इतके मनोरंजक असते, की समीक्षक व वाचक त्यातच गुंतून जातात. दुसरी त्रुटी म्हणजे समीक्षकाने स्वत:च्या भावनिक प्रतिक्रियांचा आविष्कार करणे. हेही वैध समीक्षाविधान नव्हे. वाचकाच्या आणि समीक्षकाच्या खासगी जीवनातील भावनात्मकतेचा संबंध येण्याचे कारण नाही. त्यामुळे प्रस्तुत कादंबरी चांगली आहे की नाही, यावर प्रकाश पडत नाही. आणखी एक त्रुटी म्हणजे लेखनांतर्गत पुरावा न देता केवळ चमकदार शेरबाजी करणे. मनोरंजनात्मक समीक्षापद्धतीचे वरील तिन्ही प्रकार बाजूला सारून मी तीन साहित्यिकांवर पुस्तके लिहिली आहेत. ‘कमल देसाई यांचे कथाविश्व’ या पुस्तकात लेखिकेच्या कथा व लघुकादंबऱ्या यांचे विश्लेषण केले आहे. त्यांच्या जीवनदर्शनातील सूक्ष्मता व तीव्रता यावर भर दिला आहे. तसेच त्यांच्या लेखनातील अस्मिता-शोधांवरून त्या स्त्रीवादी असल्या तरी त्यांच्या साहित्याचे अस्तित्ववादाशी जास्त जवळचे नाते कसे आहे, हे दाखविणे आवश्यक होते. एका प्रकारच्या साहित्यकृतींत सार्वत्रिक ठरतील अशी संघटनतत्त्वे आपण शोधतो. (उदा. ए. सी. ब्रॅडलीचे ‘शेक्सपिअरन ट्रॅजेडी’) असे करणे वैधही आहे. पण त्या प्रकारातील विशिष्ट साहित्यकृतीतच सापडू शकेल असे संघटनतत्त्व असू शकते का, याचाही शोध मी प्रस्तुत पुस्तकात घेतला आहे. ‘मुक्तिबोधांचे साहित्य’ या पुस्तकात लेखकाच्या कवितांपेक्षा त्याच्या कादंबऱ्या जास्त महत्त्वाच्या आहेत, हे दाखवून कादंबऱ्यांचे विस्तृत विश्लेषण केले आहे. मुक्तिबोध मार्क्‍सवादी होते हे खरे; पण त्यांनी रेखाटलेल्या जीवनचित्रणाचा शोध घेण्यासाठी केवळ मार्क्‍सवादी संकल्पनाव्यूह पुरत नाही, हेही दाखविले आहे. त्यांची भूमिका स्थिर व एकसंध नाही; तर मार्क्‍सवाद, नवमानवतावाद व धार्मिकता या तिन्हींचे घटक तिच्यात आहेत. यादृष्टीने त्यांच्या कवितांचे व सौंदर्यशास्त्रीय लेखनाचे विश्लेषण पुस्तकात आहे. ‘कथाकार शांताराम’मध्ये दाखविल्याप्रमाणे शांतारामांचे सर्व लेखन कथा या एकमेव साहित्यप्रकारात झाले आहे. तरीसुद्धा त्यात कथा-शृंखला या साहित्यप्रकाराची बीजे सापडतात. त्यांचे दुसरे वैशिष्टय़ असे सांगता येईल : मराठीतील जीवनदर्शन सामान्यपणे एकाच जातीय-सांस्कृतिक कक्षेपुरते मर्यादित केलेले सापडते. हे जसे सदाशिव-पेठी साहित्याविषयी खरे आहे, तसे ते बहुतेक दलित साहित्याविषयीही खरे आहे. शांतारामांच्या कथांमध्ये अशा मर्यादा दिसत नाहीत. त्यात गोंड तरुणी बैजा, पुरुषांचा साधन म्हणून उपयोग करणारी रती खन्ना, विचित्र योगायोगाने निर्माण झालेल्या नैतिक प्रश्नाचे उत्तर शोधू पाहणारी व शेवटी आत्महत्या करणारी अंजनी, ‘चंद्र माझा सखा’मधील निवेदक-नायिका या वेगवेगळ्या सांस्कृतिक गटांतील व्यक्तिरेखा या विधानाला पुष्टी देतात. शांतारामांची भूमिका उदार मानवतावादी आहे.
मी सध्या माझ्या लेखनाच्या एका वेगळ्या वळणावर उभा आहे. तत्त्वचर्चा करणारे मराठी साहित्य वाचले जाते हे खरे; पण ते कोठपर्यंत पोचते, हे पाहायला हवे. कांटच्या क्रिटिक ऑफ इस्थेटिक जजमेंटवरील भाष्यातील ‘the beautiful is that which, apart from a concept pleases universally’ या विधानावरील माझ्या विवेचनावर तत्त्वज्ञानाच्या एका भूतपूर्व प्राध्यापकाने वृत्तपत्रात आक्रस्ताळी टीका केली. कांटच्या पहिल्या दोन क्रिटिक्सच्या पलीकडे न जाणाऱ्या वाचकांना कांटचे वरील विधान अनाकलनीय वाटले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रिटिकमध्ये कांटने आधीच्या दोन क्रिटिक्समधल्या भूमिकांसारखीच भूमिका घेतली असणार असे गृहीत धरून माझ्यावर वरील टीका केलेली होती हे उघड आहे. त्यावर मी असे उत्तर दिले की, मी म्हणतो तशी भूमिका कांटने घेतली आहे की नाही, ते मूळ पुस्तकाच्या अमुक अमुक पृष्ठांवर पाहावे व स्वत: निर्णय घ्यावा. पण काहींच्या मते, मराठीतील वाद शेवटपर्यंत नेले जात नाहीत. हे वाईट आहे. कुस्तीप्रमाणे हे वाद निकाली व्हायलाच पाहिजेत. हा आग्रह धरणाऱ्या लोकांत शिक्षण क्षेत्रातील काही उच्चपदस्थही होते. परिणामी कांटच्या सिद्धांताची मांडणी मे. पुं. रेगे यांनी ‘नवभारत’ मासिकात लेख लिहून पुन्हा केली. त्याला मूळ आक्षेपकाचे उत्तर असे की, त्याने रेग्यांचे प्रस्तुत लेखन वाचले नाही, दखल घेण्यासारखे त्यात काही नाही. तो कागद घरातील लहान मुलांच्या प्रातर्विधीसाठी वापरावा, इतकीच त्याची किंमत. ‘झालीच पाहिजे’ असला आग्रह धरणाऱ्या उच्चपदस्थाने ‘हा आक्षेपकाचा दिवस मानला तर त्याची रात्र काय असेल!’ असा मूळ विषयाशी काहीही संबंध नसलेला शेरा दिला. तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील वादाची कशी विल्हेवाट लागते हे आपण पाहिले. हा वाद एका अर्थाने निकाली झाला असे म्हणता येईल. कारण आक्षेपक, उच्चपदस्थ मार्गदर्शक किंवा इतर कोणीही वाचक कांटच्या वरील सिद्धांताकडे गेल्या २० वर्षांत वळले नाहीत.
यावरून असे लक्षात येईल की, परिस्थिती गंभीर आहे. पण प्रश्न मराठीचे काय होणार, इतका मर्यादित नसून आम्हा सर्वाचे ज्ञानाच्या व विचाराच्या क्षेत्रात काय होणार, असा सार्वत्रिक आहे. ‘मराठी ज्ञानप्रसारक’च्या १८५२ मधील एका अंकात शिक्षणाच्या माध्यमावरील लेखात म्हटल्याप्रमाणे, परकीय भाषा बोलणारे पाच-सात हजार लोक येथे आले तरी ते काही कोटी बोलणाऱ्यांच्या भाषेला नष्ट करू शकत नाहीत. विल्यम द काँकररला इंग्लंडमध्ये जो अनुभव आला, तो सार्वत्रिक आहे. फ्रेंचच्या वर्चस्वाखालून इंग्रजी भाषा निघाली; इतकेच नाही, तर हूकरच्या (१५५४-१६००) काळात ती विचारोत्पादक झाली. रॉयल सोसायटीच्या स्थापनेनंतर (१६६०) ज्ञानोत्पादकही झाली. मराठीबद्दल हे सर्व घडू शकते.
आपली खरी अडचण आपली ज्ञानेच्छा व विचारेच्छा कमी झाली, ही आहे. आपण १५० वर्षे इंग्रजांच्या वर्चस्वाखाली होतो म्हणून असे झाले असेल का, याचा शोध नि:पक्षपातीपणे घ्यायला हवा. त्यासाठी पहिले पथ्य हे, की एकसत्त्वीकरण कटाक्षाने टाळायला हवे. सर्व इंग्रज सारखे, सर्व भारतीय सारखे मानणे, ही एक तत्त्वज्ञानात्मक घोडचूक आहे. केवळ अनुभवाधिष्ठित ज्ञानावर विसंबायचे ठरविले तर असे लक्षात येते की, आपल्याला इंग्रज-भारतीय संबंधांच्या आर्थिक बाजूकडे विशेष लक्ष द्यायला हवे; म्हणून फुको किंवा सैद यांच्यापेक्षा मार्क्‍स हा जास्त चांगला मार्गदर्शक ठरण्याची शक्यता आहे. इंग्रज साम्राज्यशहा येथे आले ते आर्थिक शोषणासाठी. त्यासाठी त्यांनी खंडणी, राष्ट्रीय कर्ज या कोणालाही दिसू शकतील अशा मार्गाचा उपयोग केला. इंग्रजपूर्व भारत हे सरंजामशाहीच्या जोखडात अडकलेले उपखंड होते. तेथे भरपूर आर्थिक शोषण होत होते. त्यामुळे एका बाजूला अतिश्रीमंत सरंजामदारांचा लहान वर्ग व दुसऱ्या बाजूला खूप मोठा असा प्राथमिक उत्पादकांचा शेतकरी व कारागीर यांचा वर्ग असे विभाजन झाले होते. एकूण उत्पादनाचा २/५ किंवा १/२ इतका भाग सारा म्हणून सरकारला देणाऱ्या या उत्पादकांजवळ भांडवल संचय होऊ शकत नव्हता. सरंजामदारांकडे भरपूर पैसा होता, पण तो व्यापार व उद्योगधंद्याकडे वळविण्यात आला नाही. या वर्गाची दृष्टी सारावसुलीच्या आणि खंडणी-वसुलीच्या पलीकडे जात नसते. येथील तंत्रज्ञान चीनसारख्या आशियाई देशापेक्षाही मागासलेले होते. येथील निसर्गदत्त संपत्तीची वाढ करून मिळणाऱ्या एकूण साऱ्याच्या वाढत्या ओघाकडे इंग्रजांचे लक्ष होतेच; पण आणखीही एक हेतू होता. येथे राज्य प्रस्थापित करण्याच्या काळात इंग्लंड हे एक प्रगत औद्योगिक व वित्तीय भांडवलशाही राष्ट्र झाले होते. या स्थितीतील आर्थिक शक्तीच्या स्वत:च्या खास अशा गरजा असतात : कच्चा माल देणाऱ्या व पक्का माल विकत घेणाऱ्या बाजारपेठा या त्या गरजा होत. भारत या वर्गात मोडत होता. अशा देशाचा प्रगत भांडवलदारी देशांशी संबंध आला तर त्यात ‘वसाहती अर्थव्यवस्था’ निर्माण होते. मूल्यवाढ ही कच्च्यातून पक्का माल होण्याच्या प्रक्रियेत होते. परिणामी साम्राज्यशाही देश क्रमश: जास्त श्रीमंत होतो व मांडलिक देश होता तेथेच राहतो. आणि कृषी व्यवसायावर लोकसंख्येचा वाढता भार पडला तर तो क्रमश: दरिद्री होतो. यातून बाहेर पडायचा एकमेव मार्ग म्हणजे मांडलिक राज्यातच कच्च्या मालाबरोबर पक्का माल निर्माण होईल याची व्यवस्था करायची. याची जाणीव भारतीयांना १८४३ पासून होऊ लागली, हे रामकृष्ण विश्वनाथ यांच्या लेखनावरून दिसते. त्याचे परिपक्व फळ महादेव गोविंद रानडे व गणेश व्यंकटेश जोशी यांच्या अर्थशास्त्रीय लेखनात मिळते. पैसाअडका दरोडेखोरांनी नेला तर ते आर्थिक नुकसान कोणालाही कळते. ‘वसाहती अर्थव्यवस्थे’मुळेही असे नुकसान होते, हे कळण्यासाठी सरंजामशाहीतील एक उत्तम पुस्तक व आज्ञापत्र पुरेसे ठरत नाही. त्यासाठी अ‍ॅडॅम स्मिथ व फ्रेडरिक लिस्ट या नव्या भांडवलदारी जगातील अर्थशास्त्रज्ञांच्या लेखनाचीच गरज असते. ज्या औपचारिक व अनौपचारिक शिक्षणामुळे भारताला वसाहती अर्थव्यवस्थेतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला, त्याला केवळ कारकून निर्माण करणारे शिक्षण असे म्हणणे पूर्णपणे चूक आहे. या शिक्षणाचे आम्ही काय केले व करत आहोत, यावर सर्व अवलंबून आहे. या शिक्षणामार्फत येथे आलेल्या पाश्चात्त्य साहित्याबद्दलही हे खरे आहे. साम्राज्यशहांना हवे असलेले आर्थिक शोषण सुलभ व्हावे यासाठी राजकीय व वैधानिक अधिरचनेचा उपयोग त्यांना झाला. उदाहरणार्थ, शिक्षण व साहित्य हे शोषणव्यवस्थेशी संबंधित होते असे मानायला कसलाही पुरावा नाही. या दोहोंचा आपण आजही उपयोग करतो. नजीकच्या भविष्यकाळात ते उपयुक्तसुद्धा ठरेल. त्यांचा उपयोग करण्यात वाईट असे काही नाही. पण आपली भूमिका मात्र बदलायला हवी.
आजच्या परिस्थितीत संरक्षक देशीवादापेक्षा वि. का. राजवाडय़ांच्या युयुत्सू देशीवादाची आम्हाला गरज आहे. १९०२ मध्ये राजवाडय़ांनी तत्कालीन साहित्यिकांना सांगितले होते की, आम्ही अशी निर्मिती केली पाहिजे, की जिच्यामुळे येथील सर्वाना अभिमान वाटेल. बाहेरचे जगही आदराने मान तुकवील. हे करणे शक्य आहे हे केवळ सचिन तेंडुलकर व विश्वनाथन आनंद यांच्या व्यक्तिगत कामगिरीवरून दिसते असे नाही; संगणकाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक भारतीयांच्या परदेशी कामगिरीवरूनही दिसते.
(लोकरंग, ३१ जानेवारी १९९९ )