हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टारची आई हे वलय रिमाला लाभले, पण तो तोरा तिच्या वावरण्यात कधी दिसला नाही. हा तिचा साधेपणा खरा होता; मुखवटा किंवा अभिनय नव्हता. नवीन कलाकारांना आणि प्रेक्षकांनाही ती मध्यमवर्गीय घरातील बाई आहे असेच तिचे वावरणे असायचे. ती ‘मूडी’ होती. कधी रुसायची. कधी चिडायची. पण रिमा ही पारदर्शी होती. लपवणं-छपवणं किंवा कावेबाजपणा नव्हता.

रिमा म्हणजे एक संवेदनशील आणि मनस्वी कलाकार. नव्या कलाकारांच्या कलाकृती ती आवर्जून बघायची. त्यामागे तिचा साऱ्या गोष्टी जाणून घेण्याचा दृष्टिकोन होता. त्या नव्या कलाकारांना उत्तेजन मिळायचे आणि हे अगदी सहजपणे आणि सकारात्मक भावनेने रिमा करायची. संबंधित कलाकृती जाणून घेण्याची तिची अनावर उत्सुकता, कुतूहल हे जसे होते तसे त्यातील काय आवडले, काय कळले नाही, कोठे सुधारणेला वाव आहे, हे ती नव्या कलाकारांना अगदी प्रांजळपणे सांगत असे. मित्रमंडळी आणि नाटकवाल्यांमध्ये ती रमायची, खुलायची तितकीच ती पटकन स्वत:च्या जगामध्ये- कोशात जायची. एकांतामध्ये विचारांनीही एकटेपणा अनुभवायची. तिची भाची अंजली हा आम्हा दोघांना जोडणारा दुवा. अंजली ही अनंत वेलणकर या माझ्या मित्राची मुलगी. अनंतने माझ्याबरोबर ‘टिपरे’मध्ये काम केले होते. मी आणि रिमा कधी भेटलो, की अंजलीचे कौतुक, तिची ख्याली-खुशाली हाच आमच्या संवादाचा विषय असायचा. रिमा निरागस होती. एखादी भूमिका उत्तम साकारण्यासाठी तिच्यामध्ये अस्वस्थता असायची, तर दुसऱ्या बाजूला भूमिका साकारल्यानंतर ती समाधानी असायची. अनेकांमध्ये असूनही ती खासगीपण जपणारी होती.

रिमाला मी पहिल्यांदा पाहिले ते अभिनेत्री म्हणूनच. जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष’ नाटकामध्ये ती अत्याचार झालेल्या तरुणीची भूमिका करीत असे. नाना पाटेकर, चंद्रकांत गोखले आणि उषा नाडकर्णी अशा ताकदीच्या कलाकारांसमोरही रिमाचा अभिनय उठून दिसत असे. हे नाटक मी पुण्यातच पाहिले होते. मध्यंतरामध्ये भेटून रिमाला शुभेच्छा दिल्या होत्या. रिमा आणि मी ‘घर तिघांचं हवं’ या रत्नाकर मतकरी यांच्या नाटकामध्ये पहिल्यांदा एकत्र आलो. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेविका ताराबाई मोडक यांच्या वैयक्तिक जीवनातील शोकांतिकेवर असलेले हे नाटक मतकरी यांनीच दिग्दर्शित केले होते. या नाटकामध्ये रिमाने प्रमिला ही व्यक्तिरेखा साकारली होती. तर मी तिचा हुशार आणि र्दुव्‍यसनी नवरा म्हणजेच डी.एन. ही भूमिका साकारली होती. ‘माऊली प्रॉडक्शन’च्या उदय धुरत यांनी या नाटकाची निर्मिती केलेली. या नाटकाचा त्या वेळी गवगवा झाला होता. डी.एन. या हुशार वकिलाची १९४०च्या दशकात दररोज ४०० रुपयांची प्रॅक्टिस होती. आमच्या मुलीची भूमिका सुप्रिया विनोद हिने साकारली होती. या वकिलाला दारूचे व्यसन होते. त्याने एक बाईदेखील ठेवलेली होती. ती बाई मरताना आपली संपत्ती वकिलाच्या नावावर करते. मग हा ती संपत्ती प्रमिला हिच्या सामाजिक कामासाठी दान देतो. फाटक्या कपडय़ातील आपल्या नवऱ्याला पाहून प्रमिला आधी घाबरते. पण त्याने दिलेले हे दान पाहून ती थक्क होते. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देहदान करण्यासाठी अर्ज केला असल्याचे तो पत्नीला सांगतो. शेवटी विपन्नावस्थेतील वकील कुत्र्याला बरोबर घेऊन एका खोलीत कोंडून घेतो. भुकेने कासावीस कुत्रा मालकालाच फाडून खातो. नवऱ्याच्या मृत्यूची वार्ता ऐकून प्रमिला कोसळते. रंगमंचावर कण्र्याचा ग्रामोफोन असतो. रिमा त्या कण्र्याकडे जायची. सैगलच्या आवाजातील ‘बाबूल मोरा’ ऐकायची. रिमाचा गोठवून टाकणारा अभिनय आणि या नाटकाचा हा परिणामकारक शेवट प्रेक्षकांच्या अंगावर येत असे. खरं तर, हा वकील मरतो तेव्हा नाटकातील माझे काम संपायचे. पण केवळ रिमाचा अभिनय पाहण्यासाठी मी विंगेत थांबायचो. एक सहकलाकार म्हणून रिमाचा अभिनय पाहणे माझ्यासाठी चांगला अनुभव होता.

त्यानंतर ‘सुयोग’ निर्मित जयवंत दळवी यांच्या ‘नातीगोती’ नाटकामध्ये ती माझ्या पत्नीच्या भूमिकेत होती. ही भूमिका आधी स्वाती चिटणीस हिने केली होती. मात्र अमेरिका दौऱ्याआधी आणि या दौऱ्यानंतरही जवळपास पन्नासेक प्रयोगात रिमा माझ्याबरोबर काम करीत होती. ‘आपली माणसं’ या संजय सूरकर याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामध्ये रिमा माझी सून होती. मी तऱ्हेवाईक, चक्रम आणि निष्क्रिय म्हातारा होतो आणि अशोक सराफ माझ्या मुलाच्या भूमिकेत होता. नवऱ्याच्या तुटपुंज्या पगारामध्ये संसाराचा गाडा रेटणारी जानकी ही व्यक्तिरेखा रिमाने साकारली होती. अपघातामध्ये मृत झालेला नवरा अचानक घरी येतो, त्याच्या निधनामुळे मिळालेले विम्याचे पैसे आणि मुलाला लागलेली नोकरी हे लाभ हातून जाऊ नयेत यासाठी स्वत:च्याच घरात लपविल्यानंतर सुवासिनी असूनही विधवेचे जीवन जगणारी जानकी ही भूमिका रिमाने समर्थपणे साकारली होती. ‘न कळता असे उन मागून येते, सुखाची पुन्हा दु:ख चाहूल देते’ हे सौमित्र म्हणजे किशोर कदम याचे गीत, अशोक पत्की यांचे संगीत, आशा भोसले यांचा स्वर आणि रिमावर चित्रित झालेले हे गीत या चित्रपटाचे वेगळे वैशिष्टय़ ठरले. हे गीत प्रत्यक्ष रिमाच्या तोंडी नाही. ती चालत असताना पाश्र्वभूमी म्हणून वापरले असले तरी त्या गीताचे शब्द, संगीत, गायन आणि रिमाच्या भावभावना चित्रित करणारे आणि तिचा परिपूर्ण अभिनय हे सारेच परिणामकारक ठरले. या गीतासाठी अशोक पत्की यांना सवरेत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.

प्रमोद प्रभुलकर याच्या ‘गोड गुपित’ या चित्रपटामध्ये मी आणि रिमा एकत्र होतो. घरामध्ये एकटे असलेल्या आजोबांना योग्य ती बायको शोधणारी नातवंडे असे चित्रपटाचे कथानक होते. या नातवंडांचा हा शोध रिमा हिच्यापाशी येऊन थांबतो आणि नातवंडे माझे आणि रिमाचे लग्न लावून देतात. हा चित्रपट आमच्या एकत्र भूमिकेबरोबरच मुलांच्या अभिनयामुळेही गाजला.

मी आणि रिमा, आम्ही दोन नाटके आणि दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. यापैकी ‘घर तिघांचं हवं’, ‘नातीगोती’ नाटकांसह ‘गोड गुपित’ या चित्रपटामध्ये आम्ही नवरा-बायको होतो. तर, ‘आपली माणसं’ चित्रपटामध्ये रिमा माझी सून होती.

नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका या तीनही क्षेत्रांत तिने ठसा उमटविला असला तरी तिचा रंगमंचावरचा वावर सहज होता. ‘पुरुष’, ‘घर तिघांचं हवं’ आणि ‘सविता दामोदर परांजपे’ या तीन तिला मिळालेल्या सर्वात आव्हानात्मक भूमिका होत्या, असे रिमा तिच्या मुलाखतीमध्ये आवर्जून सांगत असे. तिच्यासमवेत मला काम करायला मिळाले यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांच्या गरजा काय, त्या त्या माध्यमातील अभिनयाची पूर्तता करताना स्वत:मध्ये चटकन बदल करून घेण्याचे तिचे सामथ्र्य अफाट होते. प्रत्येक कलाकाराची भूमिकेचीतयारी करण्याची एक पद्धत असते. मात्र रिमा ही तयारी कशी करते हे मला कधी समजलेच नाही. पण तिचा विचार सतत सुरू असायचा. कधी दिग्दर्शकाला प्रश्न विचारून भंडावून सोडायची, तर कधी दिग्दर्शकाने सांगितलेल्या गोष्टीमध्ये स्वत:ची भर घालायची. पण ते सारे अभिनयाच्या परिपूर्णतेसाठीच असायचे.

हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टारची आई हे वलय तिला लाभले, पण तो तोरा तिच्या वावरण्यात कधी दिसला नाही. हा तिचा साधेपणा खरा होता; मुखवटा किंवा अभिनय नव्हता. नवीन कलाकारांना आणि प्रेक्षकांनाही ती मध्यमवर्गीय घरातील बाई आहे, असे वाटावे असेच तिचे वावरणे असायचे. ती ‘मूडी’ होती. कधी रुसायची, कधी चिडायची. पण रिमा ही पारदर्शी होती. लपवणं-छपवणं किंवा कावेबाजपणा नव्हता.

नागपूर येथे गेल्या वर्षी ११ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माझा आणि रिमाचा सत्कार झाला होता. तेव्हा आम्ही तेथे मुक्काम केला होता. प्रशांत दामले, सोनाली कुलकर्णी आणि अरुण नलावडे यांच्यासमवेत गप्पांची मैफल जमली होती. ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या मालिकेची निर्माती आणि अभिनेत्री मनवा नाईक हिच्या लग्नाला १९ मार्च रोजी आम्ही भेटलो होतो. ही भेट अखेरची ठरेल असे वाटलेच नाही. आता अवघ्या दोन महिन्यांच्या आतच रिमा आपल्यात नाही हे पचविणे अवघड जात आहे.

दिलीप प्रभावळकर

शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी