समकालीन मराठी कादंबरीत विविधस्वरूपी जीवनक्षेत्राची चित्रणे येऊ लागली आहेत. या अनुभवांतील बारकाव्याने, सूक्ष्मदर्शी समाजचित्रणामुळे त्यास अनेक परिमाणे प्राप्त होऊ लागली आहेत. या पाश्र्वभूमीवर प्रसाद कुमठेकर यांची ‘बगळा’ ही लक्षणीय अशी कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. उदगीरसारख्या बहुभाषिक आणि बहुसामाजिक गावातल्या एका शाळकरी मुलाची तीसेक वर्षांपूर्वीची कथा या कादंबरीमध्ये सांगितली आहे. व्यवस्थेच्या धाकाखाली दडपल्या गेलेल्या मुलाच्या सहा महिन्यांच्या कालावधीचे चित्र या कादंबरीत आहे. भूतकाळातील घशात आणि श्वासात काही तरी अडकलेलं आहे. भूतकाळातील या रुतलेल्या निरगाठी उलगडविण्याचा प्रयत्न या कादंबरीतून केला गेला आहे. तरीही ‘आमच्याकडं बोलण्यासारखं खूपाय बरं का’ या जाणिवेतून हे लेखन घडलेले आहे. मराठी कथात्म साहित्यात बाल व किशोरवयीन मुलांच्या जीवनाची चित्रणे बऱ्याच वेळेला हळव्या भावसंबंधांची किंवा पौगंडावस्थेतील प्रेमकथेच्या बाजूने झालेली दिसतात. या पाश्र्वभूमीवर ‘बगळा’ कादंबरीला विविध परिमाणे प्राप्त झाली आहेत.

चिंतामणी पुरुषोत्तम सरदेशमुख ऊर्फ चिंत्या या शाळकरी मुलाची गोष्ट कादंबरीमध्ये आहे. शाळेतील मुलं क्रिकेट खेळत असताना अकरा रुपयांचा ‘न्यू कॅट टेनिस बॉल’ चिंत्याकडून झुडपात हरवतो. या बॉलची किंमत भरून देण्यासाठी त्याला एक कल्पना सुचते. सायकलच्या कॅरेजला बगळे लटकावून जाताना त्याला काही पारधी दिसतात. आपण बगळे पकडून व ते विकून बॉलची नुकसानभरपाई द्यावी, असे त्याला वाटते आणि सबंध कादंबरीभर बगळा पकडण्याच्या त्याच्या धडपडीचे आणि संघर्षांचे चित्र आहे. बऱ्याच वेळेला शाळा बुडवून व घराच्या बाहेर राहून तो सतत तळ्याकडे जात राहतो. शाळा, ज्ञानव्यवहार, शिक्षक, घर, समाज, गाव हा चौकटीचा काच चिंत्याच्या त्या काळातील जगण्यावर आहे. या चौकटीत बालपण कोलमडून पडते. लहान मुलांच्या मनामध्ये जगाबद्दलची एक अपरंपार जिज्ञासा असते आणि हा जिज्ञासाशोध चिंत्याच्या वर्तनातून व्यक्त झाला आहे. चिंत्याला चार-साडेचार हजार प्रश्न पडले आहेत. त्याच्या या प्रश्नांची उत्तरे रूढ व्यवस्थेकडून त्याला मिळत नाहीत. एका अर्थाने चिंत्याच्या रूपाने बालमनातील ‘प्रश्नोपनिषद’ या कादंबरीमध्ये मांडलेले आहे. मुख्य म्हणजे, हरवलेल्या निरागस बालपणाचा शोध या कादंबरीमध्ये केंद्रवर्ती आहे.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Controversy on Ramayana
सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

लहान मुलांची स्वाभाविक अशी वाढ खुंटत चालली आहे. आसुरी महत्त्वाकांक्षेचे जग समाजजीवनात आकारास येत आहे. या साऱ्या व्यवस्थाकाचाच्या घुसमटीतून चिंत्या सतत बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे. तो तळ्यावर जातो, तेथील कोळ्याची माणसं पाहण्यात त्याला आनंद वाटतो. भुरका मारून गारेगार खाण्यातला अपूर्व आनंद शोधतो. लहान मुलांचा मुक्तिदायी जगाकडे निरंतर जाण्याचा ओढा कादंबरीतून व्यक्त झाला आहे. मात्र या जगाची वाट समाजाने बंद केली आहे. चार भिंतींतल्या शाळेचं जग आणि त्याच्याबाहेरचं एक जग यांच्यात ताणतणाव आहेत. त्यांच्यातील परस्परविरोधी ताण सतत कादंबरीत आहेत. आतलं आणि बाहेरचं जग, चिंत्याचं जग आणि वर्गातल्या मुलांचे जग, बाहेरचे अतिशय मोकळं, खुलं विस्तारलेलं जग. यातील विरोधपूर्ण ताणांनी कादंबरी आकाराला आलेली आहे. विविध जाती-धर्मातील मुलं, किराणा दुकानं, जातींची घरं, गल्ल्या, लिंगायत समाजाची घरं, आइस फॅक्टरी, शाळा, वर्ग, तळी असा उदगीरचा भूगोल या कादंबरीमध्ये फार चांगल्या पद्धतीने आला आहे. तसेच उदगीरसारख्या निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय ब्राह्मणी कुटुंबव्यवस्थेचे व त्यांच्या जीवनरहाटीचे फार बारकाईने केलेले चित्रण या कादंबरीत आहे. परस्परविरोधी अशा व्यक्तिचित्रणातून कादंबरीत विविध सूत्रांचे प्रकटीकरण झाले आहे. ज्ञानव्यवहारातली चिन्हं ही चाकोरीबद्ध आणि गुळगुळीत झाली आहेत, त्याच्या पलीकडचं जिवंत अशा प्रकारचं जग चिंत्याला खुणावत असते. हा पेच सतत कादंबरीमध्ये विरोधपूर्ण नात्यांनी मांडला आहे. या सगळ्यातून निरागस बालपण शोधण्याचा प्रयत्न आहे. ‘या बगळ्याला कसं मारत असतील? ‘पांडरशिप’ पक्ष्याला मारून खायचं म्हणजे दगडाचं काळीज पाहिजे,’ असे तो म्हणतो. प्रत्येक अनुभवातून चिंत्याची वाढ होते, तर शेवटी त्याच्या बगळा पकडण्याची परिणती वेगळ्या भानात होते. त्याच्या घरामध्ये पाठीच्या कुबडामुळे अपंगत्व आलेला, नोकरी नसलेला गोविंदकाका आहे. त्याच्या औषधोपचारासाठी आपण काही तरी केले पाहिजे, ही भावना त्याच्यात येते. त्याच्या शहाणपणाची वाढ शाळांपेक्षा समाजामध्ये होत त्याचे एक परिणत आणि विकसित रूप चिंत्याच्या ‘कॅरेक्टर’मधून मांडलेले आहे.

‘बगळा’ कादंबरीचा रूपबंध हा वेगळ्या तऱ्हेचा आहे. मराठी कादंबरीवर नागर मध्यमवर्गीय भाषेचा मोठा प्रभाव आहे. या पाश्र्वभूमीवर फक्त आवाजाची भाषा, ध्वनीची भाषा, बोलण्याची भाषा यांना सतत या कादंबरीत फोकस करून तिचे रूप घडविले आहे. तसेच कादंबरीत शाळकरी मुलांची भाषा आहे. शाळेतील मुलं ज्या पद्धतीची भाषा वापरतात, तशी भाषा कादंबरीत आहे. तो बॉल ‘सुळ्ळकन’ गेला किंवा ‘बेस्टम् बेस्ट’ अशा प्रकारची एक वेगळीच चिन्हव्यवस्था या भाषेत आहे. मोडूनतोडून नवे शब्द करणारं एक जग यात आहे. सामाजिक स्तर व संस्कृती-प्रदेशाची भाषारूपे आहेत. उदगीरच्या बहुभाषिक गावाचा नकाशा, माणसांचे आवाज, गल्ल्यांतील बोलण्यातले आवाज या कादंबरीमध्ये सतत आवृत्त झाले आहे आणि ‘बोलण्या’च्या भाषेला केंद्रवर्ती स्थान या कादंबरीमध्ये आहे. ‘आलताव’, ‘गेलताव’, ‘इवलालता’, ‘हारवलाता’, ‘कुटलालता’, ‘हर्पूण गेला’, ‘येवुलाल्ती’, ‘चालताव’.. अशी प्रदेशविशिष्ठ रूपे आहेत. ‘अग्गं माय कसला इदुषक दिसलालाय’ या प्रकारची प्रदेश-व्यक्तींनी घडविलेली संवादरूपे कादंबरीभर आहेत. ‘अय बोबडय़ा, अय बोबडय़ा’ अशी बोबडय़ा मुलांची भाषारूपे आहेत. सामाजिक, प्रादेशिक व व्यक्तीबोलींनी सजविलेले हे गद्य आहे. त्यामुळे या भाषारूपांचा आस्वाद आनंददायी आणि गतस्मरणरंजनाचा प्रत्यय देणारा आहे.

हरवलेल्या बालपणाचा शोध घेत असताना कुमठेकर यांनी कथनाचा वेगळा अवलंब केला आहे. अनेक पात्रे चिंत्याबद्दल बोलतायत असे कथनरूप ठेवले आहे. त्यामुळे चिंत्याचे पात्र सतत केंद्रवर्ती राहते. त्याच्याविषयी अनेक जण बोलत राहतात. या प्रकारच्या कथनशैलीमुळे त्यास अनेक आवाजीपण प्राप्त होते. प्रत्येक माणसाचे भूतकाळातले एक जग आहे आणि ते ‘करप्ट’ झालेलं आहे, परंतु ते प्रत्येकाच्या मनात रुतून बसलेले आहे. मास्तर बोलताहेत, छडय़ा मारताहेत, दोस्तांच्या गमतीजमती या शाळकरी अनुभवांमुळे वाचकांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. असे असले तरी कादंबरीत एका सीमित कार्यकाळाचे चित्रण आहे. ती एक लघुक्षेत्रांच्या अंगाने प्रकटते. तसेच कादंबरीचे केंद्र सतत चिंत्याभोवती राहिल्यामुळे कादंबरीच्या एकूण संरचनेमध्ये इतर पात्रांना तसा फारसा उठाव मिळालेला नाही. कादंबरीचे मुद्रणमूल्य फारसे चांगले नाही, त्याकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले दिसते.

एकंदरीत एका शाळकरी मुलाच्या जीवनातील काही काळाचे चित्र ‘बगळा’ या कादंबरीत आहे. हरवलेल्या बालपणाच्या मुक्ततेचा आणि घडवणुकीचा स्वर कादंबरीतून प्रकटला आहे. प्रचलित ज्ञान आणि समाजव्यवस्थेच्या अपुरेपणाच्या सोडवणुकीतून बाहेर पडण्याचा आणि व्यक्तिघडणीचा आविष्कार या कादंबरीतून झाला आहे, तर भाषेच्या परिचितीकरणाचा अत्यंत ढळढळीत तोंडी आविष्कार तिच्यातून घडला आहे.

‘बगळा’ – प्रसाद कुमठेकर

पार पब्लिकेशन्स, मुंबई,

पृष्ठे- १५८, मूल्य- ३०० रुपये.

 

– डॉ. रणधीर शिंदे

randhirshinde76@gmail.com