आपले मौल्यवान डोळे ही जणू बाह्य़ जगाची आपल्याला मिळालेली सुंदर खिडकीच आहे. असं म्हणतात की, माणसाच्या मनातले विचार, त्याचं दु:ख, आनंद, उदास भाव, क्रोध, उद्विग्नता अशा सर्व भावभावना त्याच्या डोळ्यांतून स्वच्छपणे प्रकट होतात. काळेभोर, भावदर्शी टपोरे डोळे हे स्त्रीसौंदर्याचे एक महत्त्वाचे लक्षण मानले जाते. या डोळ्यांवर कवी आणि गीतकारांनी आजवर असंख्य कविता आणि गीते लिहिली आहेत. हिंदी चित्रपटांतील नयन-गीतांवर टाकलेला एक उत्कट दृष्टीक्षेप!

हिंदी चित्रपट गीतकारांचे काही लाडके विषय आहेत. त्यात प्रेयसी/ प्रियकराचे डोळे हा तर त्यांचा फारच आत्मीय आणि रोमॅण्टिक विषय. जागेपणी स्वप्ने बघणारे डोळे, त्याची वा तिची वाट पाहणारे, तरसणारे डोळे, अश्रूंची बरसात करणारे डोळे, पाणीदार डोळे, शराबी डोळे अशी डोळ्यांची अगणित रूपे या गीतकारांनी आपल्या गाण्यांतून साकारली आहेत. त्यातही साहिर लुधियानवी, राजेंद्र कृष्ण आणि मजरुह सुलतानपुरी यांची डोळ्यांवरची गीते विशेषच ‘हटके’ आहेत.फिल्म ‘प्यासा’मध्ये गीतकार साहिर आणि संगीतकार एस. डी. बर्मन या जोडीने एक छान युगलगीत दिलंय.

kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
jun furniture poster
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित

गुरुदत्तने बनविलेल्या ‘चौदहवी का चाँद’ या चित्रपटातील ‘चौदहवी का चाँद’ या गीतात साहिरने स्त्रीसौंदर्याचं मनोवेधक वर्णन केलेलं आहे.. ‘जुल्फें है जैसे कंधों पे बादल झुके हुए.. आंखे है जैसे मय के प्याले भरे हुए.. मस्ती है जिस में प्यार की तुम वो शराब हो..’ नायिका वहिदा रहमानला गुरुदत्त म्हणतो.. ‘प्रेमाची नशा असलेले तुझे डोळे जणू मदिरेने काठोकाठ भरलेले प्यालेच आहेत.’

शक्ती सामंता यांच्या ‘कश्मीर की कली’ या चित्रपटातील गीतात एस. एच. बिहारी यांनी नायिकेच्या डोळ्यांना शांत सरोवराची उपमा दिली आहे. ‘झील से नीली आँखे’ हा शब्दप्रयोग वाचला की विशाल पसरलेल्या निळ्याशार सरोवराचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतेच. ‘ये चाँदसा रोशन चेहरा, ज़ुल्फों का रंग सुनहरा.. ये झील से नीली आँखे, कोई राज़्‍ा है इन में गहरा..’ आता शर्मिलाची ‘नीली आंखे’ नव्हती ते सोडून द्या!

‘मुझे जीने दो’मधील एका अत्यंत हटके, तरल गाण्यात गीतकार साहिर लिहितात.. ‘रात भी है कुछ भीगी भीगी, चाँद भी है कुछ मध्धम मध्धम.. तुम आओ तो आंखे खोले, सोयी हुई पायल की छमछम..’ ‘तू येणार असशील तर निद्रादेवीच्या अधीन झालेली माझी पायल डोळे उघडून पुन्हा छमछम करील. वाऽऽ! क्या बात!

‘मेरे मेहबूब’मधील टायटल साँगमध्ये (गीत- शकील, संगीत- नौशाद) शायर नायक राजेंद्रकुमार साधनाला म्हणतो, ‘फिर मुझे नर्गिसी आंखों का सहारा दे दे..’ ‘नर्गिसी आंखें’ हा शब्द शकीलला कसा काय बरं सुचला असावा?

‘संगदिल’ या कृष्णधवल चित्रपटाचा नायक दिलीपकुमार लोभस मधुबालेला म्हणतो, ‘तुझ्या एका मादक दृष्टिक्षेपाने तू माझ्या हृदयात केवढी खळबळ निर्माण करतेस याची तुला कल्पना नाही.’ ‘तुझे क्या खबर हैं ओ बेखबर, तेरी इक नज़्‍ार में है क्या असर.. जो गजब में आये तो कहर है, जो हो मेहेरबां वो करार है..’ (गीतकार- राजेंद्र कृष्ण, संगीत- सज्जाद हुसेन)

‘मं चूप रहुंगी’मधल्या ‘चाँद जाने कहाँ खो गया..’ या गीतात गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी डोळ्यांना लुकलुकणाऱ्या, चमचमणाऱ्या ताऱ्यांची उपमा दिली आहे. रफीने ‘प्यार कितना जवाँ, रात कितनी हसीं.. आज चलते हुए थम गई है जमीं, थम गई है जमीं..’ म्हटल्यावर लता म्हणते, ‘आँख तारे झपकने लगे.. ऐसी उल्फत का जादू जगाना न था, चाँद जाने कहाँ खो गया..’ व्वा! किती गोड गाणं!

‘उनसे मिली नज़्‍ार कि मेरे होश उडम् गए..’ या गाण्यात (चित्रपट- ‘झुक गया आसमान’, गीत- हसरत जयपुरी) ‘जब वो मिले मुझे पहली बार.. उनसे हो गईं आंखे चार..’ असं नायिका सायराबानू आंघोळ करता करता म्हणते. (किसी से) ‘आंखे चार होना’ हा वाक्प्रचार ‘रात कली इक ख्वाब में आयी..’ या गाण्यातही ‘सुबह को जब हम नींद से जागे आंख तुम्ही से चार हुई..’ आला आहे. (चित्रपट- ‘बुढ्ढा मिल गया’, गीत- मजरुह)

‘घर’ या चित्रपटाचा नायक विनोद मेहरा रेखाला म्हणतो- ‘आप की आँखों में कुछ महके हुए से राज़्‍ा हैं..’ गुलजारची भाषासमृद्धी बघा. ‘आँखों के राज’ साधेसुधे नाही, तर ‘महके हुए’ आहेत. खरं तर रेखाच्या डोळ्यांतला राज सगळ्यांनाच माहित्येय. (आणि तो स्वत: विनोद मेहरा वा मुकेश अगरवाल नक्कीच नाहीए!)

‘सदमा’मधील ‘सुरमयीं अंखियों में नन्हामुन्हा इक सपना दे जा रे..’  या सुंदर गाण्यात (जी एक उत्कृष्ट लोरी आहे!) गुलजारने डोळ्यांना ‘सुरमयी’ असे छान विशेषण जोडले आहे. फिल्म ‘असली नकली’मध्ये गीतकार हसरत जयपुरी यांनी ‘सर आँखों पर’ या हिंदी वाक्प्रचाराचा सुंदर उपयोग केला आहे. नायक देव आनंद रफीच्या आवाजात नायिकेला म्हणतो, ‘तुझे जीवन की डोर से बाँध लिया है.. तेरे जुल्मों सितम सर आँखों पर..’  नायिका लगेच त्याला लताच्या आवाजात उत्तर देते- ‘मंने बदले में प्यार के प्यार दिया है.. तेरी खुशियाँ और ग़म सर आँखों पर..’

गुलाम अली यांची एक सुंदर गझल आहे.. ‘कुछ दिन तो बसो मेरी आंखो में.. फिर ख्वाब अगर महकाओ तो क्या..’ ‘काही दिवस तरी तू माझ्या डोळ्यांत मुक्काम कर. मग हवं तर स्वप्न बनून रहा.’ यातली मला एक गोष्ट पटली नाही, की असं तिला मुळात सांगायचंच कशाला? जी आवडती, हवीहवीशी व्यक्ती आहे, ती तर आपल्या डोळ्यांत कायमची असतेच. तिला ‘कुछ दिन तो बसो’ अशी विनंती करायची गरजच का भासावी?

फिल्म ‘प्यासा’मध्ये गीतकार साहिर आणि संगीतकार एस. डी. बर्मन या जोडीने एक छान युगलगीत दिलंय. त्यात गुरुदत्त (गायक- रफी) नायिका माला सिन्हाला म्हणतो, ‘हम आपकी आँखो में इस दिल को बसा दें तो?’  त्याला माला सिन्हा (गायिका- गीता दत्त) खटय़ाळपणे उत्तर देते- ‘हम मूँद के पलकों को इस दिल को सजा दें तो?’ ‘नौ दो ग्यारह’मध्येही असंच ‘सवाल-जवाब’ गीत आहे. ‘आंखों में क्या जी?’ असं ती त्याला विचारते. तो उत्तर देतो- ‘रुपहला बादल..’

‘सुजाता’ चित्रपटासाठी मजरुहसाहेबांनी ‘जलते हैं जिसके लिए, तेरी आंखों के दिये..’  हे सुंदर गाणे लिहिले आहे. त्याचे सुनील दत्त आणि विशेषत: अतिशय तरल, बोलका चेहरा असलेल्या नूतनने अक्षरश: सोने केले आहे. ‘तेरी आंखों के दिये..’ काय छान कल्पना आहे! मराठीत आपण ‘डोळ्यांची निरांजने’ असा शब्दप्रयोग वापरतो, तो मजरुहसाहेबांनी वाचला असावा की काय?

‘एक करोड बजेटची फिल्म’ अशी जाहिरात करण्यात आलेल्या १९६९ मधील ‘तलाश’मधली सगळीच गाणी खूप छान होती. त्यात ‘पलकों के पीछे से क्या तुमने कह डाला फिर से तो फरमाना..’ हे एक अतिशय गोड गाणे आहे. राजेंद्रकुमारच्या या प्रश्नाला शर्मिला टागोरकडून तितकच लोभस उत्तर मिळतं- ‘ननों ने सपनों की महफिल सजायी है, तुम भी जरुर आना..’ याच चित्रपटात मन्ना डे यांच्या आवाजातलं ‘तेरे नना तलाश करें जिसे..’ हे ‘आसावरी’ या रागावर आधारित गाणे ऐकायला मिळते. ‘तीन देवीयाँ’ या चित्रपटातली एक देवी (नंदा) देव आनंदला विचारते, ‘लिखा है तेरी आंखों में किसका फसाना?’ यावर देव आनंद तिला उत्तर देतो- ‘तुला समजलं तर तूच सांग मला याचं उत्तर!’

‘हम को तो जानसे प्यारी है तुम्हारी आंखें..’ (चित्रपट- ‘नना’, गीत- हसरत) हा मात्र मला शुद्ध ढोंगीपणा व भंपकपणा वाटतो. जानसे प्यारी किसी की आंखें? केवळ अशक्य! माणसाला स्वत:च्या जीवापेक्षा काहीच प्यारं असत नाही. ‘तेरी आंखों के सिवा दुनिया में रख्खा क्या है’ (चित्रपट- ‘चिराग’, गीत- मजरुह) या गाण्याच्या बाबतीत मात्र असा अतिरेक वाटत नाही. मजरुहसाब पुढे लिहितात.. ‘ये उठे सुबह चले.. ये झुके शाम ढले.. मेरा जीना मेरा मरना इन्ही पलकों के तले..’

‘सफर’मधल्या कर्करोगग्रस्त नायकाचं (राजेश खन्ना) आयुष्य संपत आलंय आणि नायिकेसमोर तर सारं आयुष्य पडलंय. जिला उद्देशून नायक ‘जीवन से भरी तेरी आंखें..’ हे गाणे म्हणतो, त्या शर्मिला टागोरचे डोळे खरोखरच बोलके, टपोरे, भावदर्शी असल्यामुळे या काव्यालाही उचित न्याय मिळाला आहे. ‘जीवन’ या शब्दाचा अर्थ पाणी असाही आहे.. त्या अर्थाने ‘माझ्या विरहाच्या कल्पनेने अश्रूंनी डबडबलेले तुझे डोळे मला जगायला मजबूर करीत आहेत,’ असंही नायक तिला सांगत असावा. राजेश खन्नाचा अप्रतिम अभिनय, इंदिवरचे उत्कृष्ट शब्द असा सगळा छान योग या गाण्यात जुळून आलाय. काफी रागातलं हे गाणं कल्याणजी-आनंदजी यांचे संगीतकार म्हणून आणि ‘आंखे’ या विषयावरचेही सर्वोत्कृष्ट गाणे ठरावे. किशोरकुमारलाही या गाण्यासाठी शंभरपकी शंभर गुण द्यायला हवेत.

डोळे ही माणसाची बाह्य़ जगाकडे बघण्याची जणू खिडकीच आहे. मात्र, कुणाच्या अंतर्मनात डोकवायचे असेल तर बाह्य़ चक्षू बंद करावे लागतात. हे तत्त्वज्ञान ‘अंखियों के झरोकों से’ चित्रपटाची अंध नायिका सांगतेय. आणखी एक विशेष म्हणजे हे गीत लिहिणारे व संगीतबद्ध करणारे रवींद्र जैन जन्मत:च अंध आहेत. या गाण्याने गायिका हेमलताला खूप प्रसिद्धी मिळाली.

‘झूला’ या चित्रपटासाठी राजेंद्र कृष्ण यांनी ‘आंखों से काजल की लेकर सियाही’ असं एक गाणं लिहिलं होतं. ‘डोळ्यातल्या काजळाची शाई घेऊन’ ही कल्पना काय भारी आहे नाही? ‘छाया’ या चित्रपटात राजेंद्र कृष्ण यांनी ‘आंखों में मस्ती शराब की..’ हे मस्तीभरं गीत लिहिलं होतं. एकूणच डोळ्यांत मदिरेची मस्ती हा गीतकारांचा आवडता फॉम्र्युला असावा. ‘द ट्रेन’मध्ये मात्र हे ‘शराबी नन’ ‘गुलाबी’ झाले आणि ‘दिल शराबी’ झालं. (‘गुलाबी आंखे जो तेरी देखी..’) दिल शराबी ठीक आहे. पण आंखे गुलाबी? ये बात भई, कुछ हजम नहीं हुई! ‘जहाँ आरा’ चित्रपटासाठी राजेंद्र कृष्ण ‘तेरी आंख के आंसू पी जाऊं ऐसी मेरी तकदीर कहाँ..’ असं छान लिहून गेलाय. ‘तुझ्या डोळ्यातले सारे अश्रू मला माझ्या ओठांनी पिऊन टाकावेसे वाटताहेत, पण तेही माझ्या नशिबात नाहीये.’ ‘आंखों में कयामत के काजल..’ (चित्रपट- ‘किस्मत’, गीत- एस. एच. बिहारी) या गाण्यातल्या ‘कयामत’ या शब्दाची जादू पाहा. एरवी ‘कयामत’ शब्दाचा अर्थ ‘भयंकर संकट’ असा आहे. पण ‘कयामत के काजल’ किती भारी वाटतं ना!

राकेश रोशनचा सभ्य नायक ‘आंखों आंखों में बात होने दो..’ म्हणत होता, तेव्हा त्याची काहीशी चंट नायिका ‘मुझ को अपनी बाहों में सोने दो..’ असं त्याला लाडिकपणे विनवत होती. अर्थात, ‘शादी हो जाने दो..’ असं म्हणणारा ‘धीरोदात्त’ नायक आपल्याला केवळ रूपेरी पडद्यावरच पाहायला मिळतो.

गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार सलील चौधरी यांनी ‘मधुमती’ आणि ‘परख’मध्ये फार गोड गाणी दिली आहेत. ‘आजा रे परदेसी.. ये अंखियां थक गयी पंथ निहार..’  प्रियकराची वाट पाहून तिचे डोळे पार थकून गेले आहेत. तर ‘जुल्मी संग आंख लडम्ी..’ या लोकसंगीतावर आधारित गीतात जो ‘जुल्मी’ शब्द आलाय तो किती मजेशीर आहे पाहा. एरवी जुलूम-जबरदस्ती करणारा कुणीतरी सावकार, जमीनदार खलनायक असतो. पण या गाण्यातला जुलमी फार लोभसवाणा आहे. त्याने तिचे हृदयच चोरले आहे.

‘ओ सजना बरखा बहार आयी..’चा हा अंतरा पाहा- ‘ऐसे रिमझिम में ओ सजन प्यासे प्यासे मेरे नयन तेरेही ख्वाबों में खो गये.. सावली सलौनी घटा जब जब छायी अंखियों मे रैना भयी िनदिया न आयी..’ अशा सुंदर ओळी गीतकार शैलेंद्र सहज लिहून गेला आहे. ‘अनुराधा’ या चित्रपटात गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार रविशंकर यांनी ‘जाने कैसे सपनों मे खो गयी अंखिया, मं तो हूँ जागी मेरी सो गयी अंखियां..’ हे राग ‘तिलक श्याम’वर आधारित सुंदर गाणे दिले आहे. ‘माझे डोळे कधीच निद्रादेवीच्या अधीन झालेत. ‘मी मात्र जागी राहून माझ्या प्रियतमाची स्वप्ने पाहते आहे.’ यातल्या दोन्ही कडव्यांच्या शेवटच्या ओळी किती सुंदर आहेत..

अंतरा पहिला- ‘पल में परायी देखो हो गयी अंखियां..’

अंतरा दुसरा- ‘जगमग दीप संजो गयी अंखियां..’

‘मेरी आंखों से कोई नींद लिये जाता है..’ (चित्रपट- ‘पूजा के फूल’, गीत- राजेंद्र कृष्ण) हे आणखी एक अत्यंत गोड गाणं. ‘माझ्या डोळ्यातली झोपच त्याने हिरावून घेतलीय. डोळे बंद केले की त्याचाच चेहरा डोळ्यासमोर तरळतो..’ नायिकेची किती लाडिक तक्रार! मदन मोहनची सुंदर चाल, त्याला रईस खानच्या बोलक्या सतारीची जोड, लतादीदींचा गोड आवाज. पुन:पुन्हा ऐकावं असं हे गाणं.

डोळ्यावरचं सर्वात लोकप्रिय ठरलेलं थीम साँग ‘नना बरसे रिमझिम..’ राजा मेहंदी अली खाँ यांनी ‘वह कौन थी’साठी लिहिलं. तसंच ‘शोख नजर की बिजलियाँ.. ’ हे अगदी वेगळ्या ढंगाचंही. ‘मेरा साया’साठी राजा मेहंदी अली खाँ यांनी ‘ननों में बदरा छाये..’ हे आणखी एक अप्रतिम गाणं लिहिलं. ‘माझ्या डोळ्यांत जणू ढगच दाटून आलेत. आता कोणत्याही क्षणी मला रडू येईल..’ या आशयाचं मदन मोहन यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेले हे गीत लतादीदींनी तितक्याच ताकदीने साकारले आहे. या गाण्याचा हायलाइट म्हणजे उस्ताद रईस खान यांनी सतारीवर आणि पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर केलेली कमाल! हे गाणं म्हणजे जणू सतार, संतूर व लताजींचा आवाज यांची जुगलबंदीच आहे!

‘ननों से नन मिलाना’ हाही गीतकारांचा आणखी एक आवडता फॉम्र्युला असावा. यात अग्रस्थानी असणारं गाणं म्हणजे ‘मं तो तुम संग नन मिला के हार गयी सजना..’ गीतातली मधुरता म्हणजे काय, याचा हे गीत एक उत्कृष्ट नमुना ठरावं. (चित्रपट- ‘मनमौजी’, गीत- राजेंद्र कृष्ण) ‘नन मिले चन कहाँ..’ (चित्रपट- ‘बसंत बहार’, गीत- शैलेंद्र) मधील या ओळी पाहा- ‘नटखट नना ना माने मेरा कहना.. हरदम चाहे तेरी गलियों में रहना..’ ती स्वत: खटय़ाळ आहे हे न सांगता ‘माझे डोळे खटय़ाळ फार.. माझं ऐकतच नाहीत,’ अशी गोड तक्रार करते.

‘गाईड’मधले ‘पिया तोसे नना लागे रे..’ हे गीत उत्कृष्ट गीतलेखन, संगीत व कोरिओग्राफीचा नमुना ठरावा. ‘झनक झनक पायल बाजे’ या शांतारामबापूंच्या ‘नन सो नन नाही मिलाओ’ या गाण्यात नायिका संध्या म्हणते, ‘देखत सूरत आवत लाज..’ ‘तू माझ्या नजरेला नजरसुद्धा मिळवू नकोस. लाज वाटते!’ किती शालीन, सोज्वळ, मर्यादाशील असावं माणसाने?

असो. डोळ्यांवरील अशा असंख्य गाण्यांचा परामर्श घेता येईल. आपण ज्या गाण्यांचा इथे वेध घेतला तो काळ (अर्थातच हिंदी चित्रपट संगीताचे सुवर्णयुग) खरोखर सभ्य, शालीन संस्कृतीचा होता, हे नि:संशय! १९८० नंतरच्या नायकांनी मात्र नायिकेच्या डोळ्यांत आणि डोळ्यांकडे बघायचं सोडून भलत्याच गोष्टींकडे नजर वळवली. नायिकेच्या अंगावरचे कपडेही कमी कमी होत गेले आणि नायकांच्या निर्मळ नजरा गढूळ झाल्या. डोळ्यांपेक्षा तिचा कमनीय बांधा, तिचं सौष्ठव याकडे वळल्या. प्रेक्षकांबद्दलही काय बोलावं? चित्रपटांनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्यावर प्रेक्षकांनीही शालीन सभ्यता सोडून दिली.

‘नन सो नन नाही मिलाओ..’ या गाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास बघता बघता ‘अंखियाँ मिलाऊ कभी अंखियाँ चुराऊं’पर्यंत पोहोचला आणि ‘नजरेला नजरसुद्धा भिडवू नकोस, लाज वाटते’ असं सांगणारी नायिका ‘नजरें मिली दिल धडका’ असे म्हणत ‘किस मी आजा..’ असं बिनधास्तपणे गाऊ लागली. हा सिलसिला आता कुठवर पोहोचतो ते आपण आता उघडय़ा डोळ्यांनी बघत राहायचं!

jayant.tilak@gmail.com