जागतिकीकरणाने जीवनाच्या विवक्षित क्षेत्रांत झपाटय़ाने बदल घडवून आणले आहेत. आणि ही प्रक्रिया सुरूच आहे. त्यापासून कुटुंबसंस्था, नातेसंबंध हेही फारसे दूर नाहीत, जागतिकीकरणाचा प्रभाव त्यांच्यावरही झाला आहे. हा प्रभाव व त्याने झालेले बदल हे वरवरचे नसून ते मूल्यात्मक आहेत. त्यामुळेच ते आधीच्या पिढय़ांना न पेलवणारे आहेत. त्याबद्दल ओरड करणारा एक वर्गही आहे. तरीही सध्याच्या पिढीचे संपूर्ण जगणे व्यापून असणाऱ्या या बदलांकडे वडीलधारी पिढीतील काही जण मात्र सकारात्मक व समजूतदारपणाने पाहात आहेत. ‘नवे किरण’ हा रेखा रमेश नार्वेकर यांचा कथासंग्रह याच समंजसपणाचे दर्शन घडवतो. तेरा कथांचा समावेश असणाऱ्या या संग्रहातील बहुतांश कथा या नव्या-जुन्या पिढीतील भावांदोलने टिपणाऱ्या आहेत. शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने परदेशी वास्तव्य करणाऱ्या मुला-मुलींच्या पालकांचे भावविश्व या कथा रेखाटतात. मायभूमीशी घट्ट नाळ जुळलेल्या आधीच्या पिढीच्या नजरेतून नव्या पिढीच्या स्वप्नांकडे, त्यांच्या जगण्याकडे या कथा पाहतात. उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या मुलीला भेटायला गेलेल्या आईचे भावविश्व रेखाटणारी ‘दीप्ती’ ही कथा असो वा वृद्धावस्थेत नाइलाज म्हणून परदेशात मुलीकडे जावे लागलेल्या पित्याविषयीची ‘अ‍ॅडजस्टमेंट’ ही कथा असो किंवा ‘रुंबा’, ‘कैसे सुख सोवे’, ‘परीघ’ या कथा असोत, त्यातून उच्चमध्यमवर्गातील अपरिहार्य स्थित्यंतरामुळे निर्माण झालेली भावनात्मक स्पंदने प्रगल्भपणे उमटली आहेत. याशिवाय ‘नवे किरण’, ‘कल्याणी’ , ‘जगाच्या कल्याणा’ या कथाही तितक्याच वाचनीय आहेत. याआधीच्या ‘दुर्गे दुर्घट भारी’ या पहिल्या कथासंग्रहानंतर लेखिकेचा हा नवा कथासंग्रह समाजाच्या एका थरात होत असलेले मूल्यात्मक स्थित्यंतर टिपत असतानाच निसर्ग, संगीत यांनाही तितक्याच आत्मीयतेने कवेत घेतो. संघर्षांला दूर सारत जीवनातील समंजस स्वीकाराची जाणीव व्यक्त करणाऱ्या या कथा आवर्जून वाचाव्या अशा आहेत.

‘नवे किरण’ – रेखा रमेश नार्वेकर,

डिम्पल पब्लिकेशन्स,

पृष्ठे – १२२,

मूल्य – १२० रुपये