‘टेलिव्हिजन’ या शब्दाचा उगम ग्रीक शब्द ‘टेलि’ म्हणजे ‘दूरचे’ आणि लॅटिन शब्द ‘व्हिजन’ म्हणजे ‘दृश्य’ या दोन शब्दांच्या संगमातून झालाय आणि त्याला अतिशय समर्पक भारतीय नाव आहे – दूरदर्शन. घरबसल्या जगाचा वृत्तान्त देणाऱ्या महाभारतकालीन संजयचा ‘दूरदर्शन’ हा दृश्य अवतार समजला जाई. (आता त्याची जागा इंटरनेटने घेतली आहे म्हणा) या लोकप्रिय तंत्रज्ञानाचे मूळ १८८४ मध्ये पॉल निकोवने शोधलेल्या तबकडीमध्ये आहे. निकोवने त्याच्या प्रयोगातून प्रतिमा प्रवास करू शकते, हे सिद्ध केले आणि आज आपण घरबसल्या टीव्हीच्या माध्यमातून जो जगसंचार करत आहोत तो शक्य झाला आहे.

१९२६ मध्ये खऱ्या अर्थाने दृश्य स्वरूपात सुरू झालेला हा दूरदर्शनचा प्रवास गेल्या ९० वर्षांत झपाटय़ाने आपले स्वरूप बदलत गेला. दूरदर्शन संचांच्या आकारात आणि त्यावर दिसणाऱ्या चित्रांच्या दर्जात आमूलाग्र बदल आणि सुधारणा झाल्या. १५ सप्टेंबर १९५९ रोजी भारतात मुहूर्तमेढ रोवलेल्या ‘दूरदर्शन’ने अनेक स्थित्यंतरं पाहिली. सुरुवातीला ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून सुविधा पुरविल्यानंतर १९८२ साली पूर्णवेळ राष्ट्रीय वाहिनी म्हणून ‘दूरदर्शन’ नावारूपाला आलं. २६ जानेवारी १९६७ साली सुरू झालेला ‘कृषी दर्शन’ हा दूरदर्शनवर सर्वाधिक काळ प्रक्षेपित झालेला कार्यक्रम. त्यानंतर १९७६ साली ‘लड्डूसिंग टॅक्सीवाला’ ही पहिली टीव्ही मालिका दूरदर्शनने प्रसारित केली ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते कवरजितसिंग पेंटल यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. ऐंशीच्या दशकात भारतात रंगीत टीव्हीचे आगमन झाल्यानंतर १५ ऑगस्ट १९८२ साली दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यापाठोपाठ नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात दिल्लीमध्ये झालेल्या आशियाई खेळांचेही थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून झाले होते. यानंतर तब्बल दोन दशकं दूरदर्शनची घोडदौड मोठय़ा अभिमानाने सुरू होती. दूरदर्शन ही एकमेव टीव्ही वाहिनी असली तरी या काळात आलेल्या कार्यक्रमांचा दर्जा आणि त्यांची लोकप्रियता आजही चर्चेचा विषय असते.

हम लोग, बुनियाद, नुक्कड, ये जो है जिंदगी सारख्या मालिकांमुळे देशभर दूरदर्शनचा मोठा प्रेक्षकवर्ग तयार झाला. याच काळात आलेल्या रामायण आणि महाभारत या दोन मालिकांनी तर लोकप्रियतेचे उच्चांक प्रस्थापित केले. या मालिकांच्या प्रक्षेपणाच्या वेळी सर्व रस्ते ओस पडत असल्याचा इतिहास आहे. मालगुडी डेज, ब्योमकेश बक्षी, देख भाई देख, फौजी, मुंगेरीलाल के हसीन सपने, उडाण, तहकीकात, वागले की दुनिया यांसारख्या अनेक दर्जात्मक मालिकांनी देशभरातील जनतेचे मनोरंजन केले होते. सुरभी, भारत एक खोज सारख्या मालिकांनी तर दूरदर्शनला आणि त्यातील कलाकारांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. टीव्ही जगतात दूरदर्शन हा एकमेव मनोरंजनाचा पर्याय असतानाही त्यावर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा दर्जा सर्वोत्तम होता. आजघडीला ज्येष्ठ म्हणून गणले जाणाऱ्या अनेक मोठय़ा कलाकारांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात दूरदर्शनपासून केली आहे. त्यांनी त्याकाळी साकारलेल्या भूमिका इतक्या सशक्त होत्या की, आजही त्या भूमिकांचा प्रभाव कायम आहे. ‘द जंगल बुक’च्या निमित्ताने तर लहान मुलांनाही टीव्हीसमोर बसण्याचे ठोस कारण मिळाले होते. याच मुलांना आपला पहिला सुपरहिरो ‘शक्तिमान’सुद्धा दूरदर्शनमुळे मिळाला. तब्बल आठ वर्षे ‘शक्तिमान’ने मुलांच्या मनावर राज्य केलं. दूरदर्शनवरील बातम्या आणि त्या सुरू होतानाची धूनही घराघरांतून ऐकू येई आणि घडय़ाळात न पाहता वेळ कळत असे. खासगी वाहिन्यांचं आगमन होईपर्यंत दूरदर्शन वाहिनी माहितीपर, संगीत, रोमांचक कथा, चित्रपट प्रक्षेपण, कार्टून, पौराणिक, कौटुंबिक, विनोदी कार्यक्रम आणि बातम्या सादर करून सर्व वयोगटांतील आणि सर्व भाषांतील प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. तब्बल दोन दशकं एकहाती प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर नव्वदच्या अखेरीस खासगी वाहिन्यांच्या आगमनानंतर दूरदर्शनची लोकप्रियता हळूहळू कमी होत गेली. आणि आता तर इंटरनेटमुळे ‘दूरदर्शन’ ही वाहिनी केवळ ‘मन की बात’ ऐकण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

मोठय़ा मेहनतीने देशातील कानाकोपऱ्यात सर्व भाषांमधील लोकांमध्ये दूरदर्शनने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पण गेल्या दशकभराहून अधिक काळ खासगी वाहिन्यांच्या आक्रमणाला तोंड न देता आल्याने नवी पिढी त्यापासून दुरावली गेली. आता पुन्हा नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी दूरदर्शनने आपला लोगो बदलण्याचे ठरविले आहे. उस्ताद अली अहमद हुसैन खान आणि पं. रवी शंकर यांनी तयार केलेल्या धूनवर १९७६ साली ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन’ने (एनआयडी)ने ‘डीडी’ चा मोंटाज तयार केला होता. आता ५८ वर्षांनंतर ‘डीडी’चा हाच लोगो बदलण्याचे योजिले आहे आणि त्यासाठी भारतीयांना नवीन लोगो पाठविण्याचे आवाहनही करण्यात आलंय. एक लाख बक्षीस असलेल्या या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट लोगोची निवड होईल आणि तो लोगो ‘डीडी’ची नवीन ओळख असेल. मात्र दूरदर्शनचा हा निर्णय अनेकांना फारसा पटलेला दिसत नाही. प्रौढांच्या तरुणपणीच्या आठवणींसोबतच ज्या तरुणवर्गासाठी हा लोगो बदलला जात आहे, त्यांनीच सोशल मीडियावर याबाबत मोठय़ा प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या बालपणीच्या आठवणी या लोगोशी जुळलेल्या असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे केवळ लोगो बदलून तरुण पिढी या वाहिनीकडे आकर्षित होणार नाही. काळाप्रमाणे इतर वाहिन्यांनी तरुणांना आवडतील असे कार्यक्रम निर्माण केले. मात्र ‘दूरदर्शन’मध्ये तसं झालेलं पाहायला मिळत नाही. एकाच साच्यातले आणि जुने चेहरे घेऊन कार्यक्रम करण्याच्या अट्टहासाची किंमत ‘दूरदर्शन’ मोजत आहे. तरुणाईची गरज आणि ‘दूरदर्शन’वर प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये मोठी तफावत असून सर्वात आधी त्याकडे लक्ष द्यायला हवे असा सूर सर्व स्तरांतून आळवला जातोय. कारण कुठलीही वाहिनी त्याच्या लोगोमुळे नाही तर त्यावर कुठल्या प्रकारचे कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात यावरून ओळखली जाते. दूरदर्शन साठाव्या वर्षांत पदार्पण करताना नवीन लोगोचा मोठा गाजावाजा होईल आणि काही काळ तो सोशल मीडियावर व्हायरलही होईल. कदाचित नवीन लोगो वाहिनीच्या उजव्या कोपऱ्याला आकर्षित दिसेलही. परंतु वाहिनीवर चांगले कार्यक्रमच नसतील तर लोगो पाहात लोक किती काळ थांबणार, हा खरा प्रश्न आहे.

प्रशांत ननावरे viva@expressindia.com