चहा हा पावसातला सगळ्यात महत्त्वाचा सोबती. बाहेर पाऊस पडत असताना हातात चहाचा वाफाळता कप हवाच. मुंबईत टपरीवरचा चहा, पुण्याचा अमृततुल्य, उत्तर भारतीय कुल्हडमधली चाय, पावसातला आलं घातलेला गवतीचहा, फार फार तर पॉश हॉटेलमधला ब्लॅक टी आणि ग्रीन टी..हे एवढेच चहाचे प्रकार आपल्या परिचयाचे. पण चहाचे अनेक प्रकार आहेत आणि त्याचे असंख्य स्वाद आहेत. चहाचे दर्दी त्याचा मनापासून रसास्वाद घेण्यासाठी ‘टी सेरेमनी’ला जातात. देशातली आघाडीची टी स्टायलिस्ट, सेलेब्रिटी टी टेस्टर राधिका बत्रा-शाहकडून जाणून घेतलेली ही चहासोबतची रंगत- संगत.

वाफाळता चहा.. याच्याशिवाय आपली सकाळ सुरू झाल्यासारखी वाटत नाही. कंटाळा आला, आळस झटकून टाकावासा वाटला की चहा लागतोच. पाहुणे आले की चहा होतोच. बाहेर पाऊस पडू लागला की फक्कड गरमागरम चहा तर हवाच! असा हा चहा आपल्याला दिवसाच्या कोणत्याही प्रहरी चालतो.. काहींना अगदी लागतोच! असे चहावेडे आपल्या आजूबाजूला असल्याचं आपल्याला माहीत असतीलच, पण काहींना यापलीकडे उत्तम चहाचे वेध लागलेले असतात. परफेक्ट चहाच्या शोधात कुणी स्वत:चा व्यवसाय सुरू केला असं सांगितलं तर ऐकायला नवल वाटेल, पण असंच काहीसं केलंय राधिका बत्रा-शहा हिने.

राधिका ही पंजाबी कुटुंबातील, परंतु मुंबईची मुलगी. स्वत:चं काहीतरी करायचं या उद्देशाने कॉपोर्रेटमधली उत्तम नोकरी सोडून स्वत:चं ‘टी बुटिक’ सुरू केलं. मुंबईच्या वेलिंगकर इन्स्टिटय़ूटमधून एम.बी.ए.ची पदवी घेतल्यानंतर टाटा रिटेल्ससारख्या संस्थेत कामाचा अनुभव असताना तिने हा व्यवसाय करण्याचं ठरवलं. कारण चहाविषयी प्रेम आणि वेगळं काही करण्याचा ध्यास. राधिका सांगते, ‘आमच्या घरात कोणत्याही गोष्टीची चर्चा ही चहाच्या टेबलावरच होते.

मी मॅनेजमेंटचं शिक्षण तर घेतलं, पण मला बारा-बारा तास कॉर्पोरेट सेटअपमध्ये काम करायचं नव्हतं. कारण आपलं स्वतचं असं काहीतरी हवं असा माझा विचार होता. त्यामुळे मी टाटा रिटेलिंग (Trent) मधला जॉब सोडला आणि आवडत्या चहाच्या क्षेत्रात काहीतरी करायचं ठरवलं. घरच्यांचा पाठिंबा होताच.’

राधिका ‘परफेक्ट टी’च्या शोधात होती आणि त्यासाठी तिने प्रथम चीनमधल्या चहाच्या मळ्यांमध्ये जाऊन अभ्यास केला. एखादी गोष्ट त्याचा कोर्स करून शिकण्यासोबतच त्याबद्दलचा अनुभव घेऊन शिकणं तितकंच गरजेचं असतं यावर राधिका ठाम होती. त्यामुळे तिने चीनच्या चहाच्या मळ्यांमध्ये जाऊन रिसर्च केला. चहासाठी करण्यात येणारं प्लकिंग, त्यावर करण्यात येणारी प्रक्रिया, त्याची निगा राखणं हे सगळं प्रत्यक्ष पाहून शिकली आणि मग सर्वोत्तम चहा घडवण्याची प्रक्रिया सुरू झाली. राधिकाने मुंबईत वांद्रय़ाला स्वतचं टी बुटिक सुरू केलं. ती म्हणाली, ‘मला एक असं माध्यम हवं होतं ज्यातून मी ग्राहकांच्या संपर्कात येऊ शकेन. त्यांना चहाच्या रसग्रहणाविषयी सांगू शकेन आणि त्यांना चहाचा आस्वाद घेता येईल. चहामधील प्रत्येक पानाचं स्वत:चं असं काहीतरी महत्त्व असतं. मी चीनमधून चहा मिळवण्यासाठी तिथले पार्टनर शोधले. चीननंतर श्रीलंका आणि भारतातदेखील पार्टनरशिप मिळाली होती. त्यानंतर मी ‘टी कप’ या नावाने टी बुटिक चालू केलं.’ या सर्वस्वी भिन्न क्षेत्रात व्यवसाय सुरू करताना राधिकाला वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट आणि तिथल्या डॉ. उदय साळुंखे यांचं मार्गदर्शन लाभलं, असं ती सांगते.
आपल्या टी बुटिकमध्ये ‘टी सेरेमनी’ करायला राधिकाने सुरुवात केली. ‘टी सेरेमनी; म्हणजे चायनीज पद्धतीचं टी अप्रिसिएशन. यामध्ये मी ग्राहकांना वेगवेगळ्या चहाचं टेस्टिंग करू द्यायचे. चहा करताना तो प्रकारानुसार ठरावीक पद्धतीने करून परफेक्ट मुरला पाहिजे. तर त्याचा स्वाद उतरतो. टी सेरेमनीदरम्यान मी ग्राहकांना वेगवेगळ्या चहाच्या पानांबद्दल सांगते. त्याचा वापर, त्याचं वैशिष्टय़ या सगळ्याबद्दल माहिती दिली जाते. चहाच्या आस्वादात केवळ जिभेलाच नाही तर अनेक माध्यमांतून त्याचा फील घेणं महत्त्वाचं असतं..’ राधिका सांगते.
राधिकाचं टी बुटिक थोडय़ाच कालावधीत अनेकांचं फेव्हरेट बनलं. रंध्रा रंध्राला चहाचा आस्वाद मिळाला पाहिजे हे तत्त्व ती ग्राहकांना समजावून द्यायची. राधिकाचा भाऊ ‘लंचबॉक्स’ चित्रपटामुळे सर्वज्ञात झालेला प्रसिद्ध दिग्दर्शक रितेश बत्रा. मुंबईतले अनेक सेलेब्रिटी राधिकाच्या बुटिकमध्ये टी टेस्टिंगला यायचे. जगातला उत्तम चहा खरेदी करू इच्छिणारेही यायचे. पण काही कारणास्तव मुंबईचं हे बुटिक तिला बंद करावं लागलं. राधिकाने त्यानंतर खचून न जाता टी सेरेमनी चालू ठेवले. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, फाइन डाइन रेस्टॉरंट्समध्ये ती निमंत्रणांवरून टी सेरेमनीसाठी जाते. याबरोबर टी पेअरिंग – अर्थात अमुक चहाच्या स्वादाबरोबर काय खाता येईल याचा सल्ला ती देते. ‘ताज लॅण्ड्स अ‍ॅण्ड हॉटेलच्या शेफसाठी ‘टी सेरेमनी’चं आयोजन करण्यासाठी मला विचारण्यात आलं. तेव्हापासून हे कार्यक्रम सुरू झाले. माझं चहाचं रिटेलिंग सुरू होतंच. सोबतच मी चहा कस्टमाइज करण्यास सुरुवात केली. त्यासाठी ‘गोदरेज नेचर बास्केट’सोबत टायअप केलं. ‘राधिकाज फाइन टी’ या नावानं कस्टमाइज्ड टी उपलब्ध करून दिले. त्यानंतरही मी चहावर नवनवीन प्रयोग करत राहिले..’ गप्पांच्या ओघात राधिका सांगते की, ‘सिरीज ऑफ टेन टी’ हा प्रयोग तिने केला आणि बाजारातही आणला. सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक वेळेसाठी त्या त्या वैशिष्टय़ानुसार १० प्रकारच्या वेगवेगळ्या चहाची तिने ओळख करून दिली. चहाचं रिटेलिंग, टी सेरेमनी, हाय टी बार, काही प्रसिद्ध फूड ब्रॅण्ड्च्या लँॅचिंगसाठी टी पेअरिंग असं वैविध्यपूर्ण काम राधिकाने केलं आहे.
सध्या वेगळ्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणाईचा ‘टी टेस्टिंग’कडे कल वाढताना दिसतोय. त्याबद्दल सांगताना राधिका करिअर मंत्र देते, ‘तुम्हाला ज्यात करिअर करायचं असेल तर त्याबद्दल तुम्ही पॅशनेट असणं आवश्यक आहे. कारण केवळ सध्या याचं फॅड आहे म्हणून हे करू नका. स्वतचा कल ओळखणं आवश्यक आहे. अनुभवदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. स्वत:चा व्यवसाय म्हटला की, त्यात चढउतार येतात. त्याला सामोरं जावं लागतं. तुम्ही सर्वाचे सल्ले घ्या. पण तुमच्या मनाचं ऐका आणि तुम्हाला ज्यात करिअर करायचंय त्यासाठी प्रयत्नशील राहा आणि कधीच थांबू नका.’

 

परफेक्ट कप ऑफ टी : राधिकानं दिलेली परफेक्ट चहाची रेसिपी
चहाची पानं खूप उकळली की, त्यातला फ्लेवर तर नष्ट होतोच, त्याबरोबर उपयुक्त घटकही जातात. परफेक्ट कप ऑफ टी करणं अगदी सोपं आहे खरं तर. तुमच्या आवडीचा चहा घ्या. शक्यतो होल लीफ टी.. फ्लेवरसाठी हाच चांगला. आवडीचा कप घ्या. त्यामध्ये एक चमचा चहा घालून ठेवा. एका किटलीमध्ये पाणी उकळा आणि ते त्या कपात ओता. वरून झाकण ठेवा आणि दोन-तीन मिनिटांनी गाळून घ्या. त्या झाकणाखाली दोन मिनिटांत जादू घडते. परफेक्ट चहाची हीच एवढी रेसिपी आहे. चहा योग्य प्रकारे मुरणं महत्त्वाचं. चहापत्ती चांगल्या दर्जाची आहे हे ओळखण्याची एक ट्रिक म्हणजे हीच चहापत्ती तुम्ही पुन्हा एका वापरू शकता. दोन-तीन वेळा रिब्रू करूनदेखील रंग आणि स्वाद कायम राहील, तो चहा चांगला. आपल्याकडे लोकप्रिय आहे तो दूध घालून उकळलेला चहा. तो करायची पद्धत थोडी वेगळी. या देसी चायसाठी आसाम चहा चांगला. दार्जिलिंग, चायनीज, टर्किश टी अजिबात उकळून करू नये. तर देसी चहा करण्यासाठी पातेल्यात पाणी गरम करा. तीन-चार चमचे दूध घाला. सकाळचा चहा असेल तर आलं, लवंग वगैरे आवडीचा मसाला घाला आणि उकळी येऊ द्या. सगळ्यात शेवटी चहा घाला आणि अगदी एक किंचित उकळी आली की बंद करून झाकण ठेवा. त्यानंतर गाळा.
चहाचे प्रकार : चहाच्या पानांवर केलेल्या प्रक्रियेनुसार त्याचे प्रकार ठरतात. ब्लॅक टी, ग्रीन टी, व्हाइट टी, उलाँन (ड’ल्लॠ) असे हे प्रकार आहेत. टिसान हा चहाची पानं न वापरता केवळ काही हर्ब्स वापरून केलेला असतो. या हर्बल टीमध्ये टॅनिन अजिबात नसतं.

2ब्लॅक टी हा आपल्या भारतात होणारा सुप्रीम टी आहे. चांगल्या दर्जाचा ब्लॅक टी आपल्या दार्जिलिंगला तयार होतो. ब्लॅक टी योग्य प्रकारे बनवून प्यायल्यास काही साइड इफेक्ट्स नसतात. उलट तो आरोग्याला चांगला असतो.

4ग्रीन टी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे, पण तो दुपारच्या वेळीच घ्यावा. तो संध्याकाळी सहानंतर पिऊ नये. ग्रीन टी मेटॅबॉलिझम वाढवतो. त्यामुळे ऊर्जा मिळते.

 

3व्हाइट टी हा शांतवणारा चहा आहे. भारतीय स्त्रियांनी आवर्जून व्हाइट टी घ्यावा. कारण त्या एकाच वेळी अनेक कामं करत असतात. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व्हाइट टी चांगला. हा चहा चीनमध्ये होतो, तसा आपल्या दार्जिलिंगमध्येही होतो.

 

 

5उलाँन टी हा पारंपरिक चायनीज टी आहे. त्याला ‘श्ॉम्पेन ऑफ टी’ म्हणता येईल. हा चहा दिवसा घ्यावा. ऊर्जा मिळते. रक्तदाब आणि मधुमेहावरही गुणकारी असल्याचं मानलं जातं.

 

 

– कोमल आचरेकर