पोहा भुजिंग

पोहे असं ऐकताच डोळ्यापुढे येते ती पिवशीधम्मक डिश. पोहे त्याबरोबर मधे दिसणारे दाणे, वरून पेरलेली कोथिंबीर आणि खोबरं.. असं सगळं चित्र डोळ्यांसमोर येतं. पण इथे गोष्ट वेगळी आहे. इथे पोहे आणि त्यासोबत चिकन आहे. १९४० मध्ये विरार आगाशी येथील बाबू हरी गावड यांना हा आगळाच पदार्थ सुचला आणि त्यांनी त्यांच्या किचनमध्ये हा पदार्थ बनवून पाहिला. घरात सगळ्यांना तो आवडला. हा नवा पदार्थ अनेकांपर्यंत पोहोचवायची आयडिया त्यातूनच आली. म्हणूनच ७७ वर्षांपूर्वी आगाशी येथे पोहा भुजिंगचा छोटासा स्टॉल टाकला गेला. पोहा भुजिंगमध्ये रोस्टेड चिकन, बटाटा, कांदा आणि वेगवेगळे मसाले यांचं मिश्रण पोह्य़ाबरोबर मिळून येतं. पोहे भुजिंगचा मसाला खास असतो. भुजिंग हा शब्द मूळ भुजने या शब्दापासून आला. भुजने याचा अर्थ भाजणे. पोहा भुजिंगला वसई-विरार विभागात प्रचंड मागणी आहे. हा पदार्थ जरी वेगळा असला तरी लोक आवडीने खातात.

सध्याचा जमाना आहे जुगाड जमाना. देशोदेशींच्या उपयुक्त (जे जे उत्तम, उदात्त ते) त्या गोष्टी घेऊन साकारलेला स्वतचा एक वेगळा जुगाड. याला काही जण फ्यूजन असं म्हणतात. तर कुणी ‘कुछ हटके’ असं म्हणतात. ‘इंडो वेस्टर्न’चा तर सध्या ट्रेण्डच आहे. गाण्यांमध्ये, राहणीमानामध्ये, कपडय़ांमध्ये आणि अर्थातच खाण्यामध्ये हे फ्यूजन दिसतं. तरुणाईला फॅशनमध्ये फ्यूजन आवडतं तसं खाण्यामध्येदेखील. म्हणून इंडियन चायनीज, इंडियन इटालियननंतर आता इंडियन थाई जोरावर आहे. दिवाळीची सुट्टी आता सुरू झाली असेल. घरचा फराळ खाऊन कंटाळा आला की वेध लागतात- ‘काही तरी वेगळं हवं’चे. खाण्यासाठी फिरण्याची तयारी असेल तर टीम व्हिवाने हे काही फ्यूजन फूड मेन्यू तुमच्यासमोर ठेवले आहेत. मुंबई आणि पुण्यात कुछ हटके खाना शोधणाऱ्या व्हिवा टीमच्या हाती हा मेन्यू लागला. तुमच्या पाहण्यात आणखी काही हटके खाना असेल तर यात भर घालायला हरकत नाही. फोटोसह आम्हाला जरूर कळवा-  viva.loksatta@gmail.com   वर.

चॉकलेट थाळी

चॉकोलेटप्रेमींनो, दिल थाम के बैठो.. आपकी खिदमत मे चॉकलेट थाली पेश होत आहे. लहानग्यांपासून ते अगदी आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेलं चॉकलेट थाळीच्या रूपात पेश केलं जातं तेव्हा चॉकलेटपासून बनलेले नानाविध पदार्थ यामध्ये असतात. या थाळीत चॉकलेट सूप, चॉकलेट श्रीखंड, चॉकलेट ट्रफल, लॉलीपॉप, चॉकलेट खाकरा आणि चॉकलेट गुलाबजाम असतात.  मुंबईतील मारिन ड्राइव्ह परिसरातील देशी क्लबमध्ये ही अवीट गोडीची चॉकलेट थाळी मिळते. ती एकटय़ा माणसाने संपवायला खरोखरचा चॉकलेटप्रेमीच हवा.

देसी पानिनी आणि पिझ्झा पंच

पानिनी हा खरं तर पाश्चिमात्य खाद्यपदार्थ. मूळ इटालियन. पानिनी म्हणजे ग्रिल्ड सँडविचचा एक प्रकार, पण यासाठी नेहमीचा स्लाइस्ड ब्रेड वापरत नाहीत. वेगळ्या प्रकारचा ब्रेड वापरतात. आपल्याकडे काही ठिकाणी देसी पानिनी अशी डिश नव्याने दाखल होतेय. भारतीय चाट आणि पाश्चिमात्य पिझ्झा यांचा भन्नाट मेळ साधून केलेली ही डिश. याला पिझ्झा शेवपुरी असंदेखील म्हटलं जातं.  चिरलेले कांदे, भोपळी मिरची, त्यावर थोडं पनीर, ऑलिव्हज्, स्वीट कॉर्न घालून वर थोडं चीज घालून एकत्र करायचं. वरून थोडी स्पेशल लाल चटणी आणि वर आणखी थोडं चीज. मग हे सारं मिश्रण चपटय़ा पुऱ्यांवर रचायचं आणि ते कुकिंक टॉर्चचा वापर करीत ग्रिल करायचं. मग पुन्हा सढळ हाताने चीजची पेरणी आणि गरमागरम देसी पानिनी तयार!

बोरिवलीच्या चामुंडा सर्कलजवळच्या श्रीजी स्टॉलच्या जयंतीलाल भाईंनी एकमेकांशी संबंध नसलेले साहित्य एकत्र करून त्यातून एक नवीन- वेगळाच पदार्थ बनवायचा जणू चंग बांधला आहे. त्यांचा पहिला प्रयोग यशस्वी ठरला, तेव्हा अजून काही नवनवीन हटके पदार्थ त्यांनी बनविले. पिझ्झा पंच त्यापकीच एक प्रकार आहे. यामध्ये पाणीपुरीसोबत पिझ्झा सव्‍‌र्ह केला जातो. एका बाजूला पाणीपुरी बनवली जाते व दुसरीकडे पिझ्झा बनवला जातो. छोटय़ा पिझ्झा बेसवर भाज्या, सॉस, चीज हे सगळं टाकून तो गरम केला जातो. पिझ्झासाठी वापरले जाणारे मसाले त्यावर टाकतात. त्यानंतर पाणीपुरीवर हा पिझ्झा ठेवून एकत्र सव्‍‌र्ह केलं जातं.

उपरवाला भेल

अलीकडे मुंबईच्या काही भेळवाल्या भय्यांच्या मेन्यू कार्डवर (मेन्यू बोर्ड म्हणा हवं तर!) ओली, सुकी, स्पेशल याखालोखार ‘स्पे. उपरवाला’ असं नाव पाहायला मिळतंय. हा पदार्थ नक्की काय आहे? भेळीमध्ये चुरमुरे हा मुख्य पदार्थ. त्यामध्ये वरून शेव, फरसाण, कांदा, तिखट डाळ, टोमॅटो, कैरी, मिरची, लिंबू, कोिथबीर, बटाटा, चिंचेची चटणी असं सगळं असतं. या ‘उपरवाला’मध्ये हेच सगळं वरून घालायचं सामान असतं. चुरमुरे वगळून केलेली ही भेळ. उपरवाल्या पदार्थानिशी बनलेली ही स्पेशल भेळ एकदा चाखायलाच हवी. नरिमन पॉइंटला खाऊ गल्लीच्या तोंडाशी असणाऱ्या भेळवाल्या भय्याच्या ‘उपरवाला भेल’ची चव आम्ही घेतली. त्यात चनाजोर, फुटाणे, वाटाणे या उपरवाल्या पदार्थानाही विशेष स्थान होतं. कांदा, लिंबू, मिरची आणि भुरभुर शेवेनं हा उपरवाला आयटेमही चटकदार बनवला.

शेवपाव

वडापाव, दाबेली, सँडविच, पावभाजी, पावपॅटिस या सगळ्या पदार्थाबरोबरच पावाचा आणखी एक चवदार पदार्थ सध्या पुणेकरांना तृप्त करीत आहे. पावामध्ये भरपूर कांदा, टोमॅटो, काकडी घातलेली असते. त्यात यथेच्छ मेयोनीज घातलेलं असतं आणि नंतर भरपूर शेव घालून पाव बंद केलेला असतो. बटरवर खमंग भाजून त्यावर पुन्हा कांदा आणि शेव भुरभुरवून शेवपाव खाण्यासाठी सज्ज होतो. पुण्याच्या पेठ एरियातील अनेक खाऊच्या गाडय़ांवर शेवपाव मिळू शकतो.

देसी बर्गर

ब्रेड हा मुळातला परकीय पदार्थ आपण नुसता आपलासा केलाय असं नाही तर तो अस्सल देसी करून टाकलाय.. पावभाजी, वडापाव आदी पदार्थाबरोबक. पाव- पॅटीस या पदार्थाची अनेक व्हर्जन्स वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतील. बहुधा   मध्ये बटाटय़ाची भाजी घालून चण्याच्या पिठात पाव बुडवून तळून काढलेल्या डिशला पाव पॅटीस म्हटलं जातं.  पण हेच पाव पॅटीस वेगळ्या फॉर्ममध्ये दिसलं कांदीवलीमध्ये. पाव पॅटीस बर्गर या नावातंच जुगाड आहे. कांदिवलीच्या पटेल नगरमध्ये एका स्टॉलवर भन्नाट चवीचं पाव पॅटीस मिळतं. पावाला लाल लाल लसणाची चटणी लावून मध्ये सरळ पॅटीस कोंबतात आणि एक कांद्याची आणि टोमॅटोची चकती घालून सव्‍‌र्ह करतात. पण स्टॉलचे भाऊ आधी ती लाल लसणीची चटणी मस्त बटर मध्ये फ्राय करतो.त्याच्या वासानेच भूक चाळवायला लागते. मग ती चटणी पावावर लावली जाते आणि पाव परत बटर वर फ्राय केला जातो. तो भाजलेल्या पावांचा वास नाकातून सरळ पोटात जातो. १५ ते ३० रुपयांना मिळणारा हा देसी बर्गर भन्नाटच!

पाणीपुरी शॉट्स

ठेल्यावरची पाणीपुरी आपण नेहमीच खातो. रगडा आणि गोड-तिखट पाण्याने भरलेली भन्नाट चवीची पुरी आपण एका घासात गट्टम करतो.  पाणीपुरी शॉट्सची चवही अशीच भन्नाट, पण पद्धत मात्र जरा वेगळी आहे. एका प्लेटमध्ये सहा लहान ग्लासात तिखट पाणी लिकर शॉट्ससारखं भरलेलं असतं. त्या प्रत्येक ग्लासवर एक एक पुरी ठेवलेली असते आणि त्याच्या मधोमध गोड पाणी भरलेला लहान ग्लास ठेवलेला असतो. एका बाऊलमध्ये बुंदी आणि मुगाचा रगडा ठेवलेला असतो. आणि वरून मस्त चाट मसाला भुरभुरलेला असतो. एक पुरी उचलायची, त्यात आवडीप्रमाणे रगडा, तिखट-गोड पाणी घालायचं आणि ती चटकदार पुरी गट्टम करायची. तिखट पाण्याचा झणझणीत शॉट मारायला अज्जिबात विसरायचं नाही. सोबतीला फ्रुट बीयर रंगत नक्कीच वाढवेल. माटुंग्याच्या रुईया कॉलेजसमोर असलेल्या डिपी’जमध्ये तुम्हाला पाणीपुरी शॉट्सचा आस्वाद घेता येईल.

संकलन : प्राची परांजपे, सिद्धी गवस, मानस बर्वे, कौस्तुभ पेंढारकर.

छायाचित्रे : मानस बर्वे, अक्षय गायकवाड