आता पुरुषही फॅशनच्या बाबतीत स्त्रियांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू पाहताहेत. एखाद्या पार्टीला जाण्याआधी मुलगी मुलाला, ‘किती वेळ झाला नटतोयस. चल आटप आता लवकर’, अशी वाक्यं ऐकवू लागली, तर त्यात नवल नाही. एक फॅशन वर्तुळ पूर्ण झालं, म्हणायचं!       

प्रत्येक क्षेत्र ही एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी असते. आपल्या आजवरच्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांनी चूल आणि मूल ही बंधनं सावरत अनेक क्षेत्रं  पादाक्रांत केली, तरीही काही क्षेत्रं केवळ स्त्रियांची ठरलेली होती. त्यातलं एक सौंदर्योपासना आणि फॅशन. फॅशन ही स्त्रियांची मक्तेदारी समजली जायची. एखादा समारंभ किंवा पार्टी असली की, त्यासाठी तयार होताना बायकांना लागणारा वेळ हा अनेक विनोदवीरांनी वेळ मारून नेण्याचा विषय. स्त्रियांचं नटणं-थटणं एवढा वेळ चालायचं, कारण त्यांना त्यात बराच ‘स्कोप’ही होता म्हणा. आता पुरुषही फॅशनच्या बाबतीत स्त्रियांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू पाहताहेत.

पुरुषांची फॅशन ही वर्षांनुर्वष संक्रमणाच्या अवस्थेची वाट पाहात होती. कधी एकदा आमच्या फॅशन सेन्सला अंकुर फुटतो आणि कधी एकदा आम्ही बहरतो, असं झालेलं. कुठल्याही समारंभासाठी, अगदी कुठलाही प्रसंग असला तरी पुरुषांना कपडय़ात फारसे पर्याय नव्हते. एकतर सदरा किंवा शर्ट-पॅन्ट! निळा शर्ट – काळी पँट.. अनेक र्वष तेच कॉम्बिनेशन. कापडाचा पोत, सदऱ्याची फॅशन याकडे फारसं लक्ष नसे. जास्तीतजास्त मळखाऊ  कापडापलीकडे कुणी फारसा विचारही करत नसे. बुशकोट ही ब्रिटिशांनी आणलेली पद्धत, तीही पहिली काही र्वष साहेबलोकांपुरतीच मर्यादित राहिली. या सगळयांच्या तुलनेत स्त्रियांना कपडय़ांत, फॅशनमधले बदल भराभर आत्मसात केले आणि स्वतसाठी बरेच पर्याय खुले ठेवले. रंगाच्या आणि प्रिंटच्या बाबतीत हवं ते वापरण्याची मुभा होती. दागिन्यांमध्ये तर शेकडोंनी व्हरायटी होती. आता मात्र काळ बदलतोय. पुरुषांसाठीचे रंग, पॅटर्न याविषयीचे ठोकताळे मुलांनाही मान्य नाहीत.

यासंदर्भात काही मुलांशी बोलले असता, फुलाफुलांच्या प्रिंट्स आणि गुलाबी रंग हे एक प्रकारे स्त्रियांचं पेटंट होतं. पण जसजसे स्त्रियांनी पुरुषांच्या जीन्स, टी-शर्ट, शर्ट यावर कब्जा मिळवायला सुरुवात केली तसतसे पुरुषांनीही त्यांचे मळखाऊ  कपडे झटकायला सुरुवात केली, असं अनेकांनी सांगितलं. ‘आजूबाजूचे सगळे रंग ट्राय करण्यासोबतच मुलांचा ट्रेंड हा ‘सो कॉल्ड’ फेमिनाइन कलरकडे वळला’, असे मत गौरव चव्हाण याने व्यक्त केले. मुलांच्या या विषयाबद्दलच्या भावना बऱ्याचशा आधुनिक वाटल्या. अभिषेक थोरातच्या मते, ‘लहानपणापासूनच मुला-मुलींना गिफ्ट देताना हे वर्गीकरण केलं जायचं. मुलांना गिफ्ट म्हणजे निळ्या कलरचं आणि मुलींचं पिंक कलरचं! हाच शिरस्ता पुढे टिकून त्याचा प्रभाव कपडे निवडीवरही होत राहतो. खरं तर गुलाबी रंगात काय फेमिनाइन आहे?’  हल्लीच्या काळात सर्वलिंगसमभावाचा प्रभाव मुलांच्या फॅशनवरही दिसतोय. खास सण-समारंभासाठी मुलं आईच्या किंवा आज्जीच्या पैठणी साडय़ांपासून कुर्तेही तयार करताना दिसताहेत. त्यातून एक ‘रॉयल’ लुक मिळतो. त्याचप्रमाणे फुला-फुलांच्या प्रिंट्सचाही विशेष ‘ट्रेंड’ आहे. शर्टमध्ये कॉलरला आणि बाह्य़ांना डिझाइन्स असण्याचीही फॅशन हल्ली मुलांना आवडते.

हल्ली ही फ्लोरल प्रिंट्स आणि एम्ब्रॉयडरी मुलांच्या कपडय़ांमध्ये स्टाइल म्हणून सर्रास रुजू होण्याआधी केवळ ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘जेठालाल’ला ‘स्टाइल आयकॉन’ मानणारे लोकच फक्त अशा प्रकारच्या प्रिंट्सचा वापर करायचे. पण हल्ली फ्लोरल पॅटर्न मुलांमध्ये कॉमन झालेला दिसतोय.

कपडय़ांपलीकडे मुलांच्या केशरचनाही स्टायलिश झाल्यात. विविध कपडय़ांवर शोभून दिसणाऱ्या ‘अ‍ॅक्सेसरीज’ म्हणून मुलं दागिन्यांकडेही वळलेत. ‘हल्ली मुलींचे रंग – मुलांचे रंग असं काही राहिलं नाही. प्रिंट, रंग, पॅटर्नसकट सगळं युनिव्हर्सल होत चाललंय. पेहरावापासून ते आभूषणांपर्यंत स्त्री-पुरुष समानता झालीये’, असं सर्वेश देवळकर म्हणाला. या सगळ्या तरुणांची मतं लक्षात घेता यापुढे एखाद्या पार्टीला जाण्याआधी एखादी मुलगी मुलाला, ‘काय रे, किती वेळ झाला नटतोयस. चल आटप आता लवकर. तर, अशी वाक्यं ऐकवू लागली, तर त्यात नवल नाही!  एक फॅशन वर्तुळ पूर्ण झालं, म्हणायचं!

– सौरभ नाईक