‘ये रेशमी जुल्फें, ये शरबती आँखे,

इन्हें देखकर जी रहे है सभी..’

हे वर्णन अजूनही तुमच्याबद्दल केलं जातंय असं तुम्हाला वाटत असेल, तर तमाम तरुणींनो जागे व्हा. कारण सध्या चर्चा आहे. मुलांच्या केसांची. कारण त्यांच्या केसांचे नखरे आता तरुणींइतकेच नाही, तर त्यांच्या कैकपटीने वाढले आहेत. काही वर्षांपर्यंत केसही अंघोळीच्या साबणाने धुणाऱ्या मुलांचा काळ आता मागे पडलाय. फक्त ट्रेण्डी हेअरकट करून भागत नाही. तर तो तितकाच जपला पण पाहिजे, याची जाणीव मुलांना होऊ  लागली आहे. त्यामुळे शम्पू, कंडिशनर, हेअर वॅक्स, डाय याची एक मोठी बाजारपेठ सध्या उभी राहू लागली आहे. बहिणीच्या फेसबुकवरून भांडणाऱ्या या मंडळींच्या कपाटातील हेअर प्रोडक्ट्सची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.

नोव्हेंबर महिन्याचं माहात्म्य काय? दिवाळी उरकलेली असते. नवीन वर्षांची चाहूल लागलेली असते, हे सगळं ठीक आहे. पण हा महिना एका महत्त्वाच्या घटनेसाठी ओळखला जातो. कारण हा महिना असतो, ‘नो शेव्हिंग मन्थ’ म्हणजेच अख्ख्या महिन्यात डोके, दाढी, मिशीच्या केसांना बिलकूल कात्री लावायची नाही. हे जंगल वाढू द्यायचं. त्यामुळे मुलांसाठी हा महिना जिवाभावाचा झाला आहे. एरवी पंधरा दिवसांतून एकदा आईचा ओरडा खाऊन कंटाळा आला की, न्हाव्याकडे बसून केसांना कात्री लावायचा सोहळा प्रत्येक मुलाला करावा लागतो. पण हा महिना त्यासाठी अपवाद. कारण या महिन्यात कोणी केस कापलेच तर ग्रुपमध्ये ‘भित्रा’, ‘आईचं लेकरू’ अशा किती तरी नावांनी मुलीही चिडवणार. त्यामुळे साहजिकच केस कापायचा विचार या महिन्यात करणं पापच. अर्थात, फक्त हाच महिना नाही, पण मुलांमध्ये त्यांच्या केसांविषयीचं प्रेम सध्या वाढतंच आहे. मिलिटरी कट किंवा कमीत कमी केस म्हणजे कमीत कमी कटकट ही समजूत असलेली पिढी आता मागे पडते आहे. आता ट्रेण्ड येतोय लांब केसांचा. अर्थात मी मुलींबद्दल बोलत नाही आहे, हे आताच सांगते. पण एकीकडे मुलींना लहान किंवा मध्यम आकाराचे केस आवडू लागले आहेत, तिथे मुलांमध्ये मात्र केस वाढवण्याची शर्यत वाढते आहे. अर्थात यात दाढी, मिशीही येतात. याची सुरुवातच मुळात दाढीपासून झाली. सतत दाढी करण्याचा कंटाळा या पलीकडे दाढी स्टेट्स सिम्बॉल होऊ  लागलं होतं. मुलींनाही क्लीन शेव्हच्या चॉकलेट बॉयपेक्षा सेक्सी दाढीचा मॅचो लुक आवडू लागला होता. पण ही दाढी वाढवताना त्याचा आकार-उकार, प्रमाण याकडे मात्र मुलं साहजिकपणे दुर्लक्ष करत होती. रणवीर सिंग, शाहीद कपूर, फवाद खान अशा किती तरी सेलेब्रिटींनी दाढीला क्रेझ मिळवून दिली. त्यामुळे दाढी वाढवणं बंधनकारक होऊ  लागलं. हळूहळू या पुढचा टप्पा म्हणून दाढीच्या आकाराकडे लक्ष द्यायलासुद्धा मुलांनी सुरुवात केली. सलूनमध्ये जाऊन दाढी व्यवस्थित ट्रीम केली जाऊ  लागली. स्क्रबल लुक आवडू लागला. मग त्यात दाढीचे प्रकार येऊ  लागले. मिशीला दाढीइतकं ग्लॅमर मिळालं नाही, पण त्याचं आकर्षण कमी होतं, असंही नाही. झुपकेबाज, व्यवस्थित कातरलेली मिशी चर्चेचा विषय ठरू लागली. त्यानंतर मोर्चा वळला तो केसांकडे. शाहरुखने आधीच लांब वाढवलेले, पोनी बांधलेले केस हिट केले होते. नंतर त्यात अनेक स्टाइल्स येऊ  लागल्या. कलर, हायलाइट केस मुलांमध्येही लोकप्रिय होऊ  लागले. सध्याच्या हेअर स्टाइल्समध्ये लांब, भरगच्च केस महत्त्वाचे आहेतच. त्यामुळे साहजिकच एखादी हेअरस्टाइल करायची असल्यास पहिल्यांदा दोन महिने केस व्यवस्थित वाढवण्याचा सल्ला हेअर स्टायलिस्ट मुलांना देतात. वेव्ही म्हणजेच कर्ली हेअर्स, फेडेड हेअर्स म्हणजे मधल्या भागामध्ये भरगच्च आणि खाली येत पूर्ण शेव्ह केलेले केस, खांद्यापर्यंत आलेले कानामागे घेतलेले कर्ल्स, काऊबॉय लुक, साइड पार्ट स्टाइल म्हणजेच भाग पाडल्यावर एका बाजूला भरगच्च केस आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण कातरलेले केस हे सध्याच्या हेअरस्टाइलचे ट्रेण्ड्स आहेत. त्यातही डोक्याचा एक भाग भादरून त्यावर रेझरने भौमितिक आकार काढायलाही मुलांची मागणी असते. ‘गजनी’ सिनेमातील आमिर खानचा लुक आठवत असेलच. नवरात्री, क्रिकेट-फुटबॉल सामने अशा महत्त्वाच्या वेळी रेझरने प्रतिकृतीही काढली जाते. मागच्या फिफा वर्ल्डकपच्या वेळी किंवा क्रिकेटच्या वर्ल्डकपच्या काळात वर्ल्डकपची प्रतिकृती केसांवर काढायची स्पर्धाही मुलांमध्ये रंगली होती. कित्येकांची ही हौस यापुढे जात व्यक्तींचे चेहरे काढण्याठी जाते. यामध्ये अर्थातच हेअर स्टायलिस्टच्या हाती कसब असणं गरजेचं होतं. त्यामुळे कित्येक प्रोफेशनल हेअर सलून या काळात शहरांमध्येच नाही, तर निमशहरी गावांमध्ये उभी राहू लागली.

अर्थात केस वाढवणं हे वाटतं तितकं सोप्पं काम नाही, हे मुलींशिवाय उत्तम कोण सांगणार. त्यामुळे केवळ याचं कारणाने हेअर प्रोडक्ट्सची एक मोठी बाजारपेठ उभी राहू लागली. पुरुषांचे शाम्पू, कंडिशनर, केस सेट राहावे म्हणून वॅक्स, जेल, स्प्रे अशी किती तरी उत्पादनं बाजारात येऊ  लागली. केसांच्या काळजीसाठी मेन्स स्पाचं प्रस्थ वाढू लागलं. अगदी तुम्हाला टक्कल असेल, तरी ते कसं नीट जपावं यासाठी उत्पादनं बाजारात आहेत. त्यामुळे टक् कलसुद्धा मिरवलं जात आहे. हे सगळं साहजिक होतं, पण यापलीकडे एक वेगळीच बाजारपेठ या ट्रेण्डमुळे जन्माला आली. दाढीवाले आणि दाढीप्रेमी लोकांची वाढती संख्या लक्षात घेऊन या संदर्भातील कोट्स, फोटोज, चित्र असलेली टी-शर्ट्स, मोबाइल कव्हर्स, वह्यांची कव्हर्स, लॅपटॉप कव्हर्स, ब्रोच, पेंडेंट बाजारात येऊ  लागले. हे या पिढीला अर्थातच आपलेसे वाटू लागले. त्यामुळे यातून फक्त एक ट्रेण्ड नाही, तर अख्खी संस्कृती उदयाला येऊ  लागली आहे आणि आपण सहजच त्याचा भाग बनतो आहोत. झुपकेबाज दाढी, केस असलेली व्यक्ती म्हणजे बिन्धास्त, डेअर डेव्हिल, मनमौजी इथपासून तो जर केसांची इतकी काळजी घेतो तर तो कुटुंबाची किती काळजी घेईल? या कल्पनेतून आदर्श नवरा, बाप ही विशेषणं त्यांना लागली. त्यामुळे साहजिकच दाढी, केस हा फक्त एक ट्रेण्ड न उरता पुरुषांसाठी आता जीवनशैलीचा भाग बनली आहे. यापुढे मुलामुलींच्या केसांमध्ये स्पर्धा होणार हे नक्कीच. न जाणो, उद्या एखादीच्या टिण्डर प्रोफाइलमध्ये दाढी मस्ट ही अट असेल तर आश्चर्य मानायला नको.

viva@expressindia.com