श्रावण महिना सुरू झाला की एकामागून एक सणांचा आणि उत्सवांचा सिलसिला सुरू होतो. वर्षभरातल्या सणा-समारंभांमध्ये आणि मुख्यत: लग्नांमध्ये कोणत्या प्रकारचा ट्रेण्ड असणार आहे, कोणत्या रंगाचा प्रभाव डिझाइन्सवर असणार आहे, कोणत्या प्रकारातली पारंपरिक डिझाइन्स आणि कपडय़ाचा कोणता प्रकार अधिक पाहायला मिळणार आहे, या सगळ्याचा खूप आधी अभ्यास करून सर्व फॅशन डिझायनर्स दरवर्षी आपापलं ‘कलेक्शन’ आणत असतात. या वर्षीच्या कलेक्शनसाठी सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे ते दिल्लीत ४ ऑगस्टपासून होणाऱ्या पाचव्या ‘वोग वेडिंग शो’कडे! या ‘ट्रेण्डसेटर’ शोच्या पाश्र्वभूमीवर नामांकित डिझायनर्सशी साधलेल्या संवादातून सापडलेले ट्रेण्ड्स आणि काही मनोवेधक गोष्टी..

जरदोसी आणि अरगंडी

पारंपरिक म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणचा इतिहास आणि तिथली संस्कृती दाखवणारं डिझाइन. कपडय़ांबद्दल मात्र संस्कृती आणि इतिहास यांच्यासोबतच त्याला समकालीन मानसिकता आणि आवडनिवड यांचीही जोड असावी लागते.  भारतात बहुतांशी ठिकाणी एक लेहंगा, सोबत एक चोली किंवा ब्लाऊ ज आणि त्यावर एक दुपट्टा या गोष्टींनी पारंपरिक डिझाइन तयार होतं. मात्र त्यात दुपट्टा ड्रेप करण्याचे प्रकार, चोलीची डिझाइन्स, लेहंग्याचा घेर आणि पॅटर्न या साऱ्यात वैविध्य असल्यामुळे प्रत्येक पारंपरिक वेष हा वेगळा दिसतो. यावर्षी पारंपरिक डिझाइन्स आणि हलके तरीही युथफुल रंग दिसतील. माझ्या नवीन कलेक्शनमध्ये संपूर्ण काम हे एम्ब्रॉयडरी व लेसमधून केलेलं आहे आणि या लेसेस इनहाऊस बनवण्यात आल्या आहेत. यात जरदोसी पद्धतीतलं काम पाहायला मिळेल. अरगंडी कापडाच्या मदतीने तयार केलेली पक्षी, फुलं, महाल यांसारखी थ्रीडी डिझाइन्स या वेळी वेडिंग गाऊन्स आणि घागरा, लेहंग्यावर असतील.

गौरव गुप्ता

वेस्टर्न आणि भारतीय डिझाइन्सचं मिश्रण

भरजरी कापड आणि डिझाईनचे दिवस आता राहिले नाहीत. गेल्या वर्षभरात चोलीऐवजी ब्रालेट्स किंवा कॉर्सेट्स आणि घट्ट पॅण्ट्सऐवजी धोती पॅण्ट्स असे बदल झालेले आहेत. अशा वेळी समारंभांमध्ये  ब्रालेट्स किंवा कॉर्सेट्स यांच्यासोबत एम्ब्रॉयडरी केलेलं जॅकेट हे कॉम्बिनेशन लेहंगा किंवा स्टायलिश पॅण्ट्सवर हिट ठरेल. एका अमेरिकन वधूला केवळ भारतीय कपडय़ांची हौस म्हणून स्वत:च्या लग्नात भारतीय पारंपरिक पोशाख हवा होता. तिच्या बजेटमध्ये बसेल असं पारंपरिक डिझाईन असेल, याची काळजी घेत आम्ही ते पूर्ण केलं. पारंपरिक सोनेरी लेहंगा, ज्यावर जुन्या पद्धतीची एम्ब्रॉयडरी आणि बनारसी लेसचं काम होतं असं डिझाइन तिच्यासमोर ठेवलं. आपल्या परंपरा, इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या अशा संधींनी नवीन फ्युजन करायला हुरूप येतो.

जेड (मोनिका-करिश्मा)

डेस्टिनेशन वेडिंगसाठी हटके डिझाइन्स

डेस्टिनेशन आणि थीम वेडिंग या संकल्पनेमुळे आजची पिढी ठरावीक डिझाइन्स सोडून नवीन काही ‘ट्राय’ करून पाहायला उत्सुक असते. पूूर्वीपासून चालत आलेले वधूचे रंग वगैरे कल्पना सोडून वधू  तिच्या आवडीचा आणि  थीमला शोभून दिसेल असा रंग निवडते. त्यामुळे यंदाच्या लग्नसराईत एम्ब्रॉयडरी केलेले क्रॅप टॉप्स आणि त्यासोबत हाय वेस्ट लेहंगा असं डिझाइन अधिक दिसून येईल. ऑफ -शोल्डर ब्लाऊज किंवा चोली हा सध्याचा ट्रेण्ड तसाच राहील आणि रंगांचं स्वातंत्र्य असलेल्या मुलींना गोल्ड लेहंगा आणि चोली हा उत्तम पर्याय असेल.

मोनिषा जयसिंग

स्टाइल भी, कम्फर्ट भी

पारंपरिक कपडे म्हणजे केवळ भरजरी कपडे किंवा हेवी ज्वेलरी असा अर्थ होत नाही. त्याउलट जे पारंपरिक कपडे आहेत ते सर्वात जास्त कम्फर्टेबल असले पाहिजेत. आपल्या जुन्या मुळांना धरून राहत मात्र काळाप्रमाणे बदलत पारंपरिकता जपली गेली पाहिजे. भारताचं हातमागावरचं विणलेलं कापड ही पारंपरिक ओळख आहे. ते वापरून लग्नाच्या वेळी ज्यात वधूला वावरायला सोपं जाईल अशी डिझाइन्स तयार होत आहेत आणि ट्रेण्डमध्ये येत आहेत. ओबी बेल्ट्स, संपूर्ण एम्ब्रॉयडरी केलेली जॅकेट्स आणि शिअर केप्स-फ्रिल्स हे या वेळी आम्ही कलेक्शनमध्ये आणलं आहे जेणेकरून डिझाइन्स केवळ पारंपरिक न राहता युथफुलही होतील. हातमागावर विणलेलं कापड आणि हाताने केलेली गोतापट्टीची एम्ब्रॉयडरी हे माझ्या कलेक्शनमध्ये प्रामुख्याने दिसेल. माझ्या कलेक्शनसाठी या वर्षी मी एमराल्ड ग्रीन हा रंग निवडला आहे. मात्र कोणत्याच नववधूने ट्रेण्ड फॉलो न करता तिचं मन आणि आवड तिला काय सांगते ते फॉलो करावं.

अनिता डोंगरे