उस्मानाबाद जिल्ह्य़ात ऐन पावसाळ्यात मुद्दाम जावे आणि आवर्जून पाहावे असे एक मानवनिर्मित नवल म्हणजे नळदुर्गचा भुईकोट किल्ला आणि त्यातला जलमहाल. सोलापूरपासून फक्त ४७ किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याला लागूनच बोरी नदी वाहते आणि त्या नदीपलीकडे आहे रणमंडळ नावाचा अजून एक किल्ला. हे दोन किल्ले  जोडणारा एक प्राचीन बंधारा या बोरी नदीवर बांधलेला आहे. आणि या बंधाऱ्यातच आहे जलमहाल. साधारण ऑगस्ट महिन्यात जेव्हा मोठा पाऊस होतो तेव्हा या बंधाऱ्यावरून पडणारे पाणी जलमहालाच्या छपरावरून खाली पडते. आपण तेव्हा जर जलमहालात उभे असू तर आपल्यासमोर वरून पडणाऱ्या पाण्याचा एक पडदा तयार झालेला दिसतो. हा देखावा खरोखर नयनरम्य असतो. पूर्वी अनेक वेळा हे दृश्य पाहता यायचे. परंतु आता बोरी नदीवर वरच्या बाजूला झालेल्या अजून एका बंधाऱ्यामुळे खूप मोठा पाऊस झाला की मगच हे दृश्य दिसते. नळदुर्ग किल्ल्यापाशी बोरी नदीचं पाणी वळवून एका अजस्र िभतीने हे पाणी अडविले आहे. या िभतीतील राजा कमान आणि राणी कमान अशा दोन प्रचंड धारांच्या रूपाने हे पाणी खाली कोसळते. या िभतीतच पाणी महाल, गणेश महाल, पाताळ मोरी, पाणचक्की अशा व्यवस्था केलेल्या दिसतात. पाणी महालात असलेल्या शिलालेखावरून याचे बांधकाम इ.स. १६१६ मध्ये मीर महंमद याने केल्याचे समजते.

गगनबावडा

कोल्हापूरवरून कोकणात उतरण्यासाठी गगनबावडामाग्रे जाणारा करूळ घाट हा फारच निसर्गरम्य आहे. या घाटाच्या तोंडावर असलेले गगनबावडा गाव तर केवळ अप्रतिम. निसर्गसौंदर्याने नटलेले हे अगदी छोटेखानी गाव फारच देखणे आहे. इथून करूळ आणि भुईबावडा असे दोन घाटरस्ते कोकणात उतरतात. कोल्हापूर गगनबावडा हे अंतर जेमतेम ५५ किलोमीटर इतकेच आहे. वाटेत घरपण, कळे, साळगाव, असळज अशी खूप छान छोटी छोटी गावे लागतात. ऐन पावसाळ्यात हा सगळा परिसर गार होऊन जातो. सर्वत्र धुक्याची चादर लपेटलेली असते. गगनबावडाने आता हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला सुद्धा मोहात पाडले आहे. अनेक सिनेमांचे चित्रीकरण या ठिकाणी केले जाते. गगनगड नावाचा किल्ला इथेच गावाच्या मागे उंचावलेला दिसतो. तिथे जायला पायऱ्यांची वाट केलेली आहे. मोठमोठी शिल्पे वाटेत आपल्याला पाहायला मिळतात. माथ्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे. या किल्ल्यावरून सभोवताल अफलातून दिसतो. हिरव्यागर्द झाडीमधून वळणे घेत गेलेला करूळ घाटरस्ता अप्रतिम दिसतो. धुके बाजूला झाल्यावर दिसणारा रस्ता आणि त्यावरून येत असलेली एसटीची बस बघणे केवळ आनंददायी असते. गगनबावडा इथे आता मुक्कामाला काही हॉटेल्स झाली आहेत. परंतु कोल्हापूरला मुक्काम करून एक दिवस मनसोक्त भिजायला गगनबावडा अवश्य गाठावे. गगनबावडा एसटी स्थानकावर कॅन्टीन आहे आणि त्या ठिकाणी कटवडा नावाचा एक भन्नाट पदार्थ मिळतो. धो धो पावसात गरमागरम झणझणीत कटवडा खाणे आणि त्यावर स्पेशल चहा पिणे यासारखे दुसरे सुख नाही.

हे सर्व अनुभवण्यासाठी एक ओला पावसाळी दिवस शोधून मुद्दाम गगनबावडय़ाला गेलेच पाहिजे.

खेकरानाला

महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेला नितांतसुंदर प्रदेश म्हणजे विदर्भ. जवळजवळ सगळा विदर्भ हा गर्द झाडी लेवून नटलेला आहे. तिथे असलेल्या अभयारण्यामुळे तर त्याच्या सौंदर्याला अजूनच झळाळी आलेली दिसते. अभयारण्य ही जरी फिरायला सुंदर असली तरी पावसाळ्यात तिथे प्रवेश बंद असतो. मात्र काही अभयारण्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशात पावसाळ्यात भटकंती करता येते. खेकरानाला हे त्यातलेच एक ठिकाण. नागपूरपासून िछदवाडा रस्त्यावर ५२ किलोमीटरवर हे ठिकाण वसलेले आहे. नागलवाडी जंगलात निसर्गाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण. खेकरानाला धरणाच्या काठावरच हे ठिकाण आहे. ट्रेकिंग, जंगल सफारी अशा गोष्टींमध्ये रुची असणाऱ्या लोकांसाठी हे अगदी उत्तम ठिकाण आहे. जंगलात असलेल्या वसतिस्थानापासून जवळच खूप मोठी मोकळी अशी जागा दिसते. तसेच इथून फक्त २ किमी अंतरावर एक सुंदर गुहा आणि जवळच पाण्याचा प्रचंड मोठा धबधबा बघायला या ठिकाणी जायलाच हवे. पावसाळा संपल्यावर जर इथे गेले तर इथून फक्त १२ किमी अंतरावर मानसिंगदेव प्राणी अभयारण्य बघता येते. नागलवाडी अभयारण्यात रात्रीच्या सफारीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट यांच्याकडे दिवस-वेळ आधीच ठरवून बुकिंग करावे लागते. वाइल्ड लाइफ विषयात काम करणाऱ्या व्यक्तींना इथे प्राधान्य दिले जाते. त्यासाठी काही विशिष्ट नियमावली वनविभागाकडून जारी केलेली आहे.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com