वाघ, सिंह, गेंडा, हत्ती आणि गवा हे वन्यजीव पर्यटनातले बिग फाइव्ह मानले जातात. पण त्याही पलीकडे अगदी एक आठवडय़ापासून ते एक वर्षांपर्यंत आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या दुनियेची सैर करणे हेदेखील आता वन्यजीव पर्यटनात रुजू लागलंय. या चिमुकल्यांच्या अजब दुनियेत एक फेरफटका.

फुलपाखरं आली धरतीवर! असे गुणगुणत नाजूक फुलपाखरांच्या मागे धावणे हा तर लहानपणातला आवडता छंदच. बालपणीच्या रम्य आठवणींचा एक कप्पा फुलपाखरांनी व्यापला नाही असा माणूस विरळाच. वाढत्या शहरीकरणात मात्र ही चिमुकल्यांची दुनिया काहीशी अंतरली आहे.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

नैसर्गिक वैविध्याने नटलेल्या आपल्या देशात ११५० पेक्षा जास्त फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. हिमालयापासून ते वाळवंटापर्यंत सर्वत्रच विविध प्रजातींची फुलपाखरं आढळतात. सर्वात जास्त विविधता आहे ती ईशान्य भारतात. सिक्कीम ते अरुणाचल प्रदेश परिसरात ८०० पेक्षा अधिक प्रजातींची फुलपाखरे नोंदविली गेली आहेत. या फुलपाखरांना पाहणाच्या अनोख्या बटरफ्लाय टुर्स देखील हल्ली सुरू झाल्या आहेत. फुलपाखरे पाहण्याचा म्हणजेच ‘बटरफ्लाइंग’ हा छंददेखील आता झपाटय़ाने वाढतोय. ‘बटरफ्लाइज ऑफ इंडिया’ या फेसबुक मंडळावरील तब्बल वीस हजार सदस्यसंख्या वाढती लोकप्रियताच अधोरेखित करतेय. फुलपाखरांची ही अजब दुनिया पाहण्यासाठी जरा वाट वाकडी करावी लागणार आहे.

सरत्या पावसात सारी सृष्टी अनोखा निसर्गसोहळा साजरा करत असतानाचा काळ हा फुलपाखरं पाहण्यासाठी उत्तम असतो. सर्वत्र पसरलेली हिरवळ, फुलांची भरपूर उपलब्धता आणि पोषक वातावरण असल्यामुळे फुलपाखरांची अगदी रेलचेल असते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हिवाळ्यानंतर बराच झाडझाडोरा वाळून जातो व फुलपाखरांची संख्या रोडावू लागते. निळ्या फुलपाखरांची मात्र उन्हाळ्यातसुद्धा चांगली संख्या असते. अशा फुलपाखरांना छायांकित करण्यासाठी पाणवठय़ावर सकाळपासून उन्हं तापेपर्यंत बस्तान मांडायला लागते. दोनतीन तासांत पन्नासेक प्रजातीची फुलपाखरं अगदी सहज दिसतात.

अंडी (egg), सुरवंट (caterpillar), कोशित (pupa) आणि फुलपाखरू असा फुलपाखराचा जीवनप्रवास असतो. प्रत्येक फुलपाखरू एका किंवा काही विशिष्ट वनस्पतींवरच स्वतची अंडी घालते. प्लेन टायगर नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर, कॉमन क्रो कण्हेरीच्या पानावर, कॉमन मोरमॉन लिंबू व कढीपत्त्याच्या पानांवर अंडी घालते. त्या अंडय़ामधून निघणारा सुरवंट त्याच वनस्पतीची कोवळी पाने खाऊन गुजराण करतो, वाढतो व कालांतराने त्याचे कोशितामध्ये रूपांतर होते. त्या कोशितामधून निघणारे फुलपाखरू हे संपूर्ण वाढ झालेले फुलपाखरू असते. ते पिल्लू वगरे नसते.

फुलपाखरांना केवळ मधुरस हवा असतो असे साधारणत सर्वाना वाटते. पण अनेक प्रजातींची फुलपाखरे कधीही फुलांना भेट देत नाहीत हे खरे आहे. गुलाबाच्या फुलावर फुलपाखरे कधीच येत नाहीत. फुलपाखरांना दात नसल्यामुळे त्यांना कुठलेही घन अन्न खाता येत नाही. तसेच जन्मतच त्यांची पूर्ण वाढ झालेली असल्यामुळे त्यांना वाढ होण्यासाठी आहार घेणे गरजेचे नसते. ते केवळ द्रवरूपी आहार त्यांच्या शुंडेद्वारे शोषून घेतात. फुलपाखरांना उडण्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून ते भरपूर शर्करा असलेल्या फुलांमधील मधुरस अथवा सडक्या-कुजक्या फळांमधील रस शोषून घेतात.

अनेक प्रजातीच्या फुलपाखरांना फुलांमधील मधुरस आवडतो. भरपूर मधुरस असणारी फुले त्यांना आकर्षति करतात. टणटणी वा घाणेरीची झुडुपे, इक्झोराची झुडुपे, कुर्डू, तेरडा, अशा अनेक प्रकारच्या झुडुपाजवळ थोडा वेळ वाट बघितली तर कितीतरी प्रजातींची फुलपाखरे बघायला मिळतात. पण अनेक प्रजातींच्या फुलपाखरांना फुलं अजिबात आवडत नाहीत. अशा फुलपाखरांना केवळ उग्र दर्प असलेली सडकी-कुजकी फळे, प्राण्यांचे मल-मुत्र, तसेच ओलसर चिखलाच्या जागा आवडतात. त्यांना आवश्यक द्रव्ये ती अशा ठिकाणी मिळवतात. जंगलात अनेकदा अशा ठिकाणी अनेक फुलपाखरे जमलेली आढळतात. ती रस शोषून घेण्यात (चीखलपान) एवढी मग्न असतात की आपल्याला अगदी जवळ येऊ देतात. अनेक प्रजातींची ब्राऊन फुलपाखरे, कॉमन नवाब, ब्लॅक व टॉनी राजा, ब्लू ओकलीफ, कॉमन बॅरन यांचा यात समावेश होतो. त्यासाठी उन्हाळ्यात चिखलाच्या ठिकाणी दोनतीन तास व्यतीत करणे अतिशय फायद्याचे ठरते.

फुलपाखराची ही चिरतारुण्याची स्वच्छंदी दुनियाच असते. अल्प काळात सृष्टीला मोहकपणे खुलवतात. त्यांच्या चिमुकल्या दुनियेत सैर करून आपणदेखील त्या तारुण्याचा आनंद घ्यायला हरकत नाही.

महाराष्ट्रात इतरत्र कुठे जाल?

अनेक संरक्षित क्षेत्रात (जसे व्याघ्र प्रकल्प) पर्यटन क्षेत्रात तसेच अतिसंरक्षित क्षेत्रात वाहनातून खाली उतरायची परवानगी दिली जात नाही. अशा ठिकाणी फुलपाखरे बघायला जाऊ नये. त्याऐवजी त्याच जंगलाच्या बफर झोनमध्ये जावे. मुंबईपासून थोडे दूर असलेले सर्वात सुंदर स्थळ म्हणजे अंबोली हे होय. या ठिकाणी दक्षिण भारतातील तसेच पश्चिम घाटातील अनेक प्रादेशिक फुलपाखरे बघायला मिळतात. सह्य़ाद्रीत कुठल्याही जंगलात तुम्ही फुलपाखरे बघायला बिनधास्तपणे जाऊ शकता. सातपुडय़ाच्या पर्वतरांगेत मेळघाट, पेंच, तसेच इतर जंगलांमध्ये सुद्धा फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती आढळून येतात.

फुलपाखरं बघायला कुठे जाल?

ठाणे : ओवळेकरवाडी बटरफ्लाय गार्डन, ओवळा, घोडबंदर रोड. येथे एकाच ठिकाणी खूप मोठय़ा संख्येत विविध प्रकारची फुलपाखरे पाहता येतील.

मुंबई : आवर्जून भेट देण्यासारखी फुलपाखरांची खुली बाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली. नागला ब्लॉक परिसर, बोरिवली येथून प्रवेश घेऊन कान्हेरी रस्ता, पेल्हार धरणाची मागची बाजू, पेल्हार गाव आदी ठिकाणी जाता येईल.

येऊरचे जंगल : टिकूजीनीवाडी येथून प्रवेश घेऊन जावे. पाटोनापाडा येथून प्रवेश बंद आहे.

माथेरान : अनेक छोटय़ा तलावांवर. त्यातही शाल्रेट तलाव, घोडे पागा तलाव येथे फुलपाखरांचे वैविध्य आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्य : कर्नाळ्यात पक्षी निरीक्षणाच्या रानवाटांवरून भटकंती केल्यास खूप फुलपाखरे दिसतात.

फणसाड अभयारण्य : वन्यप्राणी निरीक्षणासाठी असलेल्या रानवाटांवरून भटकंती केल्यास भरपूर फुलपाखरे दिसतात.

जून २०१५ मध्ये ‘ब्लू मोरमॉन’ हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आले. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. या फुलपाखरासाठी मराठी नाव ‘नीळपंख, नीळवंत’

तसेच ‘राणी पाकोळी’ ही मराठी नावे उपलब्ध आहेत.

सुमारे ८० फुलपाखरांना मराठी नावं आहेत. इंग्रज आमदानीत अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्याकडील अनेक फुलपाखरांचे नामकरण केले. सार्जट, कॅप्टन अशा उपाधी त्यात दिसून येतात. तर चिखलाच्या जागी आढळणाऱ्या फुलपाखरांना नवाब, राजा अशी नावं दिल्याचे आढळते.

सदर्न बर्डिवग या फुलपाखराचा पंखविस्तार १९ सेंटीमीटर इतका असतो. तर ग्रास ज्वेल या पिटुकल्या फुलपाखराचा पंखविस्तार केवळ १२ मिलीमीटर एवढा कमी असू शकतो. सदर्न बर्डिवग तळकोकणात, अंबोलीला तसेच खाली दक्षिणेकडे आढळते.

हे लक्षात ठेवा

फुलपाखरांना मोठे डोळे असतात. त्यामुळे त्यांना थोडी जरी हालचाल झाली तरी जाणवते. अर्थात ‘स्लो मोशन’मध्ये आपण त्यांच्या अगदी जवळ जाऊ शकतो. उगाच धावपळ करणाऱ्याला फुलपाखरे जवळ येऊ देत नाहीत. त्यांना भडक रंग आकर्षति करतात. त्यामुळे छायाचित्रण करायचे असल्यास भडक कपडे घालू नये. त्यांना कान नसतात, त्यामुळे आपल्या आवाजाने ते विचलित होत नाहीत.

डॉ. राजू कसंबे – raju.bnhs@gmail.com