हिरव्या रंगाच्या नाना छटा, फुलांचे विविध रंग आणि आकार पाहात निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त भटकायचं आहे? मग कोल्हापूर जिल्ह्यतील राधानगरी अभयारण्यात जायलाच हवे. गवा हा इथला बघण्यासारखा प्राणी आहे. राधानगरी अभयारण्याचा समावेश जागतिक वारसास्थळामध्ये करण्यात आला आहे. जगातील ३४ अतिसंवेदनशील ठिकाणांपकी पश्चिम घाटात राधानगरी अभयारण्य येते. दक्षिण व उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा सह्याद्रीमधील हा महत्त्वाचा जंगलपट्टा आहे. याचा निमसदाहरित जंगलात समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेस असणाऱ्या राधानगरी अभयारण्याचा परिसर ३५१ चौ.किमीचा आहे. याची समुद्रसपाटीपासूनची ऊंची ९०० ते १ हजार फूट असून येथे सरासरी पर्जन्यमान ४०० ते ५०० मि.मी. आहे. दाजीपूरचे जंगल हे राधानगरी अभयारण्याचाच एक भाग आहे. कोल्हापूर संस्थानचे महाराष्ट्र राज्यात विलीनीकरण झाल्यानंतर १९५८ मध्ये दाजीपूर जंगलाची दाजीपूर गवा अभयारण्य म्हणून नोंद करण्यात आली. हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पहिले अभयारण्य आहे. राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या भोवतीच्या जंगल परिसराला १९८५ ला राधानगरी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. येथील घनदाट जंगलाचे पट्टे डंग या नावाने ओळखले जातात. येथील डोंगरमाथ्यावर जांभ्या खडकांचे मोठे सडे आहेत. सडय़ांवर व सडय़ांच्या भोवताली असणाऱ्या दाट जंगलामधील जैवविविधता प्रचंड संपन्न अशी आहे.

निमसदाहरित व पानगळीच्या मिश्र जंगल प्रकारामुळे हे वन असंख्य प्रजातींचे आश्रयस्थान झाले आहे. डोंगरातील दऱ्याखोऱ्यात घनदाट जंगल, विस्तीर्ण सडे आणि गवताळ कुरणात असंख्य प्रजातीचे वृक्ष, वेली, झुडपे, बुरशी आढळून येते. अभयारण्यात १५०० पेक्षा जास्त फुलझाडांच्या प्रजाती आहेत. भारताच्या द्विपकल्पामधील  प्रदेशनिष्ठ २०० प्रजाती या भागात असून ३०० पेक्षा जास्त औषधी वनस्पती इथे आहेत. येथे ३६ प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोंद झालेली आहे. वाघ, बिबळ्या, लहान हरीण, रानकुवा, अस्वल, गवा, सांबर, भेकर, चौसिंगा, रानडुक्कर, सािळदर, उजमांजर, खवले मांजऱ, लंगूर याबरोबरच वटवाघळाच्या तीन प्रजातीही येथे आढळतात.

plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?

पक्षी निरीक्षणासाठी राधानगरी अभयारण्य अप्रतिम ठिकाण आहे. येथे २३५ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. तीन प्रकारची गिधाडे येथे वास्तव्यास आहेत. जगात फक्त पश्चिम घाटात आढळणाऱ्या पक्ष्यांपकी १० प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. अभयारण्यातील सांबरकोड, कोकण दर्शन पॉइंट, सावदें, काळम्मावाडी धरण, उगवाई देवी मंदिर ही स्थळे पक्षीनिरीक्षणासाठी उत्तम आहेत. १२१ प्रजातींच्या फुलपाखारांची नोंद राधानगरीत झाली आहे. सदर्न बर्डिवग हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू असून ग्रास ज्येवेल हे सर्वात लहान फुलपाखरू आहे. हे दोन्ही फुलपाखरे राधानगरी अभयारण्यात आढळतात. हजारोंच्या संख्येने एकत्र जमून स्थालांतर करणारी ब्ल्यू टायगर, ग्लोसी टायगर, स्ट्राइप टायगर ही फुलपाखरे या ठिकाणी ऑक्टोबर -नोव्हेंबरमध्ये येतात.

गोवा आणि कर्नाटकच्या संरक्षित भागाला लागून असलेले हे अभयारण्य ट्रेकर्सच्या पसंतीचे ठिकाण आहे. दाजीपूरला शासनाचे रिसॉर्ट आहे.

कोल्हापूर -सिंधुदुर्ग जिल्ह्यच्या सीमेवर राधानगरी तालुक्यामध्ये कोल्हापूरपासून साधरणत: ८० किमी अंतरावर हे अभयारण्य वसले आहे. जवळचे विमानतळ कोल्हापूर आणि बेळगाव आहे तर जवळचे रेल्वे स्थानक कणकवली आणि कोल्हापूर आहे. कोल्हापूर-राधानगरी- दाजीपूर हे अंतर ८० किमीचे आहे. दाजीपूर, राधानगरीला भेट दिल्यानंतर जवळ बिसन राष्ट्रीय उद्यान, स्वामी गगनगिरी महाराज मठ, राधानगरी धरण, फोंडा घाट आणि शिवगड किल्लाही आपण पाहू शकतो. महाराष्ट्रातील सर्वात पहिले असलेले हे अभयारण्य अनेक नद्यांनी वेढलेले आहे. भोगावती, दूधगंगा, तुळशी, कळमा, दिर्बा या नद्या अभयारण्यातून वाहतात. नंतर हे सर्व प्रवाह कृष्णेला जाऊन मिळतात. अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी नोव्हेंबर ते मार्च असा आहे.

डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com