१७ हजार ५०० इटुकल्या पिटुकल्या बेटांच्या तुकडय़ा तुकडय़ांमध्ये विभागलेल्या निसर्गरम्य इंडोनिशियात जगभरातून लाखो पर्यटकांचा ओघ सातत्याने सुरू असतो. बोरोबुदुर, बाली, जिवंत ज्वालामुखीचे अस्तित्व असणारे डोंगर अशा अनेक ठिकाणांना पर्यटकांची पसंती असते. यापलीकडे जात इंडोनेशियातील काही बेटांवर निसर्गाची अद्भुत चमत्कार पाहायला मिळतात. लोकप्रिय पर्यटनस्थळांच्या तुलनेने येथे गर्दीही अगदीच मर्यादित असते. यांपैकीच एक म्हणजे ‘फ्लोरेस’ बेट. येथील निसर्गसौंदर्य बरेचसे आपल्या कोकणाशी मिळतेजुळते आहे. परिसर दऱ्याखोऱ्यांचा. सलग असे पठार नाहीच. निळ्याशार समुद्रकिनाऱ्यावरील या बेटावरच्या केलिमुतु राष्ट्रीय उद्यानात सृष्टीचं एक अद्भुत दडलं आहे.
हे राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे ते ज्वालामुखीमुळे निर्माण झालेल्या तीन वेगवेगळ्या रंगांच्या आम्लयुक्त तळ्यांसाठी. वर्षभरात ह्य़ा तळ्यातील पाणी निळा, पांढरा, हिरवा, आकाशी, तपकिरी तर कधी चक्क काळा रंग धारण करते. ही तळी आता युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये नोंदली गेली आहेत. पाण्यातील खनिजांतील बदलामुळे तळ्यांच्या रंगात हे बदल होतात. स्थानिकांमध्ये या तळ्यांबाबत पूर्वजांशी निगडित अनेक समजदेखील आहेत. या तळ्यांबरोबरच केलिमुतु राष्ट्रीय उद्यानाची भटकंती ही अनेक अर्थानी समृद्ध करणारी आहे. ५० चौरस किलोमीटरवर पसरलेल्या ह्य़ा राष्ट्रीय उद्यानात नामशेष होण्याच्या टप्प्यावर पोहोचलेल्या अनेक वनस्पतींचे रक्षण करण्यात आले आहे. इंडोनेशियाच्या पर्यटनात लोकप्रिय पर्यटनस्थळांबरोबरच या ठिकाणी भेट देणे नक्कीच श्रेयस्कर ठरेल.
कसे जाल?
मोनी हे केलिमुतुच्या पायथ्याचे गाव असून येथे इंडे आणि मौमेरी या दोन मार्गानी पोहोचता येतो. बालीच्या डेंनपसार विमानतळावरून इंडे आणि मौमेरीला जाण्यासाठी विमानसेवा आहे. इंडेपासून मौनी हे ५० कि.मी.वर तर मौमेरीपासून ६२ किलोमीटरवर आहे. मौनीमधून केलीमुतुला जाण्यासाठी जीपची सोय होऊ शकते. मोनीपासून केलिमुतु राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार साधारण अध्र्या तासावर आहे. केलिमुतुच्या तळ्यांचा नजारा पाहण्यासाठी मात्र पाऊण तासांचा ट्रेक करावा लागतो. राष्ट्रीय उद्यानाची प्रवेश फी २० हजार इंडोनेशियन रुपये आहे.
राहण्याची व्यवस्था
मोनी हे गाव छोटेसेच असल्यामुळे तिथे राहण्यासाठी काही मोजकी हॉटेल्स आणि होमस्टेदेखील आहेत. काही हॉटेल्समध्ये जेवणासाठी रेस्टॉरंटही उपलब्ध आहेत.
योग्य कालावधी
मे ते सप्टेंबर

सीमा भारांबे – बोरोले