शेषराव मोरे  यांचा ‘जातिव्यवस्था आली कोठून?’ हा लेख (२२ जून) वाचला. सध्याच्या जातिव्यवस्थेला आदिवासी टोळ्यांना जबाबदार ठरवणे चुकीचे वाटते. मुळात एक लक्षात घ्यायला हवे की, अस्पृश्य आणि आदिवासी हे दोघेही विषमतावादी व्यवस्थेचे बळी. त्यासाठी उच्चवर्णीय मालकाला खूश करण्यासाठी एका पीडित घटकाच्या व्यवस्थेसाठी दुसऱ्या पीडित घटकाला जबाबदार ठरवणे म्हणजे मानसिक गुलामीची परमावधी आहे.

एकोणिसाव्या शतकातील परिस्थिती लक्षात घेता समजते की, हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण सर्वात उच्च जागी विराजमान होते तर अस्पृश्य गावाबाहेर राहत होते. आदिवासी हे तर परिघाबाहेर जंगलात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करीत होते. मग हा निष्कर्ष आला कसा? यामागे व्यापक रणनीती आहे. सध्या वरून हिंदुत्ववादी आणि आतून मनुवाद्यांची चलती आहे. वेगवेगळे इतिहासकार कामाला लागले आहेत. मोरे यांनी पांडुरंगशास्त्री आठवले यांना मनुवादी म्हटले आहे, पण त्यांचे हे लिखाणही काही वेगळे नाही. पांडित्यपूर्ण रसाळ व ओघवत्या शैलीत मुद्दे मांडून गुळमुळीत लिहून पांडित्य दाखवणे हा जुना खेळ आहे. काही खऱ्या गोष्टी घेऊन बेमालूमपणे त्यात खोटे निष्कर्ष घुसवणे हे त्यांच्या विचारसरणीत बसते.

Gautam Adani Son Jeet Got Engaged Diva Jaimin
गौतम अदाणींच्या धाकट्या सुनेबद्दलची ‘ही’ माहिती वाचलीत? वडिलांचा हिऱ्यांचा व्यवसाय अन्…
sharad pawar slams amit shah over knowledge about agriculture
‘अमित शहा यांचे शेतीसंबंधीचे ज्ञान मर्यादित’, शरद पवार यांचा टोला
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार

आपल्या समाजातील विषमतावादी रचनेचा अभ्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिराव फुले, शरद पाटील, देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी पुराव्यानिशी व सांगोपांग रीतीने मांडला आहे. सर्व पुराव्यांचा अभ्यास करून आपणाला हवे तेवढे व उपयोगी तेवढे पुरावे घ्यायचे व पंडिती भाषेत उच्चवर्णीयांचे लांगूलचालन करून शोषित वर्गालाच कसेही करून दोष द्यायचा ही आधुनिक मनुवादी व्यवस्था आहे. मोरे म्हणतात की एकटा ब्राह्मण वर्ग जातिव्यवस्था निर्माण करू शकत नाही व टिकवू शकत नाही. मोरे यांच्या मानसिकतेतच ‘एक वर्ग अशी व्यवस्था कशी तयार करू शकतो व वाढवू शकतो’ याचे उत्तर आहे. अंतोनियो ग्रामची यांच्या सांस्कृतिक वर्चस्व (कल्चरल हेजिमनी) या सिद्धांतात दडले आहे. आजही मनुवादी व्यवस्था ही काही एकटय़ा ब्राह्मणवर्गावर अवलंबून नाही. उलटपक्षी त्यांच्यापेक्षा खालच्या वर्गामुळे व त्यांच्या मानसिक गुलामी वृत्तीमुळे ही व्यवस्था टिकली. आपण कोणाच्या तरी वर आहोत मग भलेही कुणाचे गुलाम असू या मानसिकतेमुळे त्यास बळ मिळाले.

संपूर्ण पुरावे न मांडता आवश्यक तेवढेच पुरावे मांडणे या करामतीमधूनच मोरे यांनी याआधी, १८५७च्या उठावातील काही धर्मवादी लोकांचा उल्लेख करून त्याला धर्माध मुस्लीम बंड ठरविले आहे. त्यांच्या विद्वतेबद्दल आदर बाळगून हे नमूद करावे लागते की, इतिहास लिखाणासाठी केवळ पांडित्य उपयोगी नसून निरपेक्ष नीतीही असावी लागते. खरे पुरावे मांडून सोयीचे निष्कर्ष काढणे ही ती नीती.

– अजयकुमार लोखंडे, ठाणे.

(या विषयावरील अधिक पत्रे पुढील मंगळवारनंतरच प्रसिद्ध केली जातील)

 

धर्मव्यवस्थेनेच जातिव्यवस्थेला पाठिंबा दिला

‘जातिव्यवस्था आली कोठून?’ हा शेषराव मोरे यांचा लेख वाचला आणि अनेक मुद्दय़ांवर मतभिन्नता व्यक्त करावीशी वाटली.  बेटीबंदी हे जातिव्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण असले तरी तिच्यामधील श्रेष्ठ-कनिष्ठत्व, स्पर्शास्पर्शत्व ही वैशिष्टय़े अधिक अमानवी आणि घातक आहेत. जातिव्यवस्थेचा उगम जर आदिम समाजाच्या टोळीव्यवस्थेत शोधायचा झाल्यास तिच्यातील अमानवी श्रेष्ठ-कनिष्ठत्व, स्पर्शास्पर्शत्व यांचा उगम कोठे शोधायचा, हाही प्रश्न सोडविण्याची गरज आहे.

जातिव्यवस्था ही ब्राह्मणांनी निर्मिली नाही हा निष्कर्ष काढण्यासाठी मोरे यांनी तिचा उगम टोळीव्यवस्थेत शोधलेला आहे की काय, असे वाटते. जातिव्यवस्थेने भारतीय समाजाची जी हानी केलेली आहे ती तिच्यातील कप्पेबंद श्रेष्ठ-कनिष्ठत्व व स्पर्शास्पर्शत्व यांच्यामुळे. जातिव्यवस्थेत ही वैशिष्टय़े कशी आली हे टोळीसिद्धांताने मुळीच सिद्ध होऊ  शकत नाही.

जातिव्यवस्था कोणत्याही कारणांमुळे निर्माण झालेली असली तरी तिला धर्मव्यवस्थेने पाठिंबा दिला हे स्पष्ट आहे. यासाठी जरी भाकडकथांचा आधार घेतला असला तरी ते धार्मिक समर्थन होते हे लक्षात घेतले पाहिजे.

जातिव्यवस्थेमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठत्व कसे निर्माण झाले हे नि:संदिग्धपणे स्पष्ट करता आले नाही तरी मनुस्मृतीसारख्या स्मृतिग्रंथांनी या बाबींना मजबूत समर्थन दिलेले आहे, हे स्पष्ट आहे. त्या वेळी समाजमनावर या स्मृतिग्रंथांचा जबरदस्त पगडा होता यात शंका नाही. स्मृतिग्रंथांतील निर्देश जशास तसे अमलात येत नसले तरी वेळोवेळी त्यांचा आधार घेतला जात असे. तेराव्या शतकात चक्रधरस्वामींच्या एका दलित भक्ताला धर्माधिकार नाही हे निश्चित करून त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली ती शास्त्राचा आधार घेऊनच. लीळाचरित्रात या घटनेचा स्पष्ट उल्लेख आहे.

– ह. आ. सारंग, लातूर.

 

वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास सख्ख्या भावंडांचीही जात वेगवेगळी

शेषराव मोरे यांचा ‘जातिव्यवस्था आली कोठून?’ हा लेख वाचला. जातिअंत करण्यासाठी बेटीबंदी तोडणे हा उपाय सांगितला आहे. माझ्या मते, जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे हाच खात्रीचा उपाय आहे.

वडिलांचा एक शुक्राणू आणि आईची बीजांड पेशी यांचा संयोग झाला म्हणजे मानवाचा गर्भपिंड तयार होतो. त्यात वडिलांकडून आलेली २३ गुणसूत्रे आणि आईकडून आलेली २३ गुणसूत्रे असतात. या ४६ गुणसूत्रांचा संच म्हणजे, तुमची ‘जात’. हीच त्या अपत्याची म्हणजेच त्या व्यक्तीची निसर्गानं लिहिलेली खरी जन्मपत्रिका असते. हा ४६ गुणसूत्रांचा संचच तुमचे सर्व गुणावगुण ठरवितो.

तुमच्या आई-वडिलांकडे ही गुणसूत्रं त्यांच्या आईवडिलांच्या अनेक पूर्वजांकडून आलेली असतात. तुमच्या वंशवृक्षातूनच हे आनुवंशिक तत्त्व आलेले असते. धर्म मानवनिर्मित आहेत. तुमच्यात आलेल्या आनुवंशिक तत्त्वांत, आई-वडिलांच्या धर्माचा काहीही संबंध नसतो.

हा ४६ गुणसूत्रांचा संच प्रत्येक व्यक्तीचा निरनिराळा असतो. एकाच वंशकुळातील व्यक्तींचा संच, प्रामुख्याने सारखा असला तरी, आई-वडील, आई-वडिलांकडील आजा-आजी, पणजा-पणजी वगैरे पूर्वजांचा संचही बराचसा सारखा, पण थोडा का होईना निराळा असतो. सख्ख्या भावंडांचाही संच, थोडा का होईना निराळा असतो. म्हणजे सख्ख्या भावंडांचीही, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास जात वेगळी असते.

थोडक्यात म्हणजे तुमच्यात आलेले आनुवंशिक तत्त्व (गुणसूत्रं आणि जनुकांसह) तुम्हाला जन्मत:च मिळते आणि ते तुमच्या मरणापर्यंत टिकते. जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं तीच तुमची ‘जात’. सख्ख्या भावंडांची ‘जात’देखील अलग अलग असते. प्रत्येक व्यक्तीची ‘जात’ वेगवेगळी असते. आई-वडील, बहीण-भाऊ, मुलगा-मुलगी, या सर्वाची ‘जात’ थोडेबहुत सारखी असली तरी वेगवेगळी असतात. म्हणूनच त्यांच्या शारीरिक व  मानसिक व्यक्तिमत्त्वात बराच फरक असू शकतो.

जात हा शब्द संस्कृत जन.. जा.. म्हणजे जन्म घेणे या क्रियापदापासून आलेला आहे. तुम्हाला मिळालेले ‘जात’ तुमच्या वंशवेलीवरच अवलंबून असते, तुमचा पूर्वजन्म आणि त्याची कर्मे यावर अवलंबून नसते. आत्म्याच्या आनुवंशिक तत्त्व सिद्धांतानुसार तुम्हाला पूर्वजन्म किंवा पुनर्जन्म नसतो. तुमच्या आई-वडिलांचा जन्म हा तुमच्या आनुवंशिक तत्त्वाचा पूर्वजन्म तर तुमच्या अपत्यांचा जन्म हा तुमच्या आनुवंशिक तत्त्वाचा पुनर्जन्म असतो.

तुमचा हा जन्म, पहिलाच आणि शेवटचाच जन्म असतो. आपल्या पूर्वज विचारवंतांनी आपल्या समाजात चार वर्ण निर्माण केले. त्याचा चांगला परिणाम शेकडो वर्षे झालाही असेल. पण आता जाणवते की, ती फार मोठी समाजविघातक चूक होती. ती आपण आता सुधारायला पाहिजे. सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर सजीव निर्माण झाले. तेव्हापासून त्यांच्यातील आनुवंशिक तत्त्वच जन्म घेत घेत लाखो प्रजाती निर्माण झाल्या आणि शेवटी मानव अवतरला. पृथ्वीवर सजीव जगण्याची परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत आनुवंशिक तत्त्व जन्म घेतच राहणार आहे आणि प्रत्येक सजीवाला ‘जात’ मिळतच राहणार आहे.

 – गजानन वामनाचार्य, घाटकोपर (मुंबई)

 

‘अनुलोम-प्रतिलोम’ हाच जातिअंत- मार्ग

प्रा. शेषराव मोरे यांचा ‘जातिव्यवस्था आली कुठून?’ हा ‘संस्कृतिसंवाद’ या सदरातील लेख (२२ जून) वाचला. सदर लेखामुळे जात हीच संकल्पना पुन्हा एकदा तपासून घेण्याची गरज आहे हे समजले. मनुस्मृतीमध्ये ‘अनुलोम-प्रतिलोम विवाह’ हे इतर जातींच्या निर्मितीचे कारण म्हटले आहे. परंतु ‘अनुलोम-प्रतिलोम विवाह’ हाच जातिअंताचा मार्ग ठरू शकेल असे मला वाटते. लेखात उल्लेखिल्याप्रमाणे सध्याच्या काळात  बेटीबंदी अजूनही तग धरून आहे. जोपर्यंत सर्व जातींमध्ये बेटीव्यवहार होणार नाही तोपर्यंत जातिव्यवस्थेमध्ये फारसा फरक पडणार नाही.

– तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण).

 

वारकरी संप्रदायाचे कार्य गावांत दिसावे

पुण्यात भाजप आयोजित वारकरी कीर्तनकारांच्या सत्कार-सोहळ्यातील भाषणात डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ‘‘सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी वारकरी संप्रदायाचे कार्य मोठे आहे.’’ वारकऱ्यांचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे. तेव्हा त्यांच्या या मोठय़ा कार्याचे सुपरिणाम तिथे दिसायला हवेत. पण वास्तव काय आहे ? वाळवंटी खेळ मांडून हे वैष्णव भाई , ‘वर्ण अभिमान विसरले याती । एक-एका लोटांगणी जाती॥’ असे गात नाचले असतील; पण तो विचार आचरणात आला असे दिसत नाही. शहराच्या तुलनेत गावांत जातिभेदाचे प्रमाण अधिक आहे. तिथे दलितांवर अन्याय-अत्याचार होतात. बहिष्कार टाकतात.

जातीभेद संपवण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन. त्याला तर ग्रामीण भागात मोठा विरोध आहे. दलित तरुणांच्या हत्या होतात. बरेचदा खुन्यांना शिक्षा होत नाही. मग, ‘सामाजिक ऐक्यासाठी वारकऱ्यांचे कार्य मोठे.’ असे म्हणण्यात काय अर्थ आहे ?

– प्रा. य. ना. वालावलकर, पुणे</strong>

 

स्वामी भाजपलाही त्रासदायक ठरतील

‘आपले थोर  स्वामीजी’ हा ‘उलटा चष्मा’ (२३ जून) वाचला. स्वामीजींना त्यांचे उपद्रवमूल्य केव्हाच समजलेले आहे. सध्या (दिवस चांगले असल्याने) स्वामी ते मूल्य वटवण्याच्या मागे लागलेले असावेत. स्वामी यांनी अरविंद सुब्रह्मण्यम यांना देशद्रोही ठरवताना त्यांनी २०१३ मध्ये केलेल्या वक्तव्याचा दाखला दिला. त्याच न्यायाने स्वामींच्या सहकाऱ्यांची विरोधी पक्षात असतानाची व आताची  वक्तव्ये तपासली तर? काहीही असो, पुढील काळात स्वामी हे किती बेभरवशाचे आहेत हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्यांना समजणार व ते भाजपला त्रासदायक ठरणार, हे नक्की.

– शैलेश न. पुरोहित, मुलुंड पूर्व (मुंबई)

 

गोरक्षणाचे आणि दुग्धोत्पादनाचेही तारू महाराष्ट्रात भरकटले..

‘गोरक्षणाची ऐशीतैशी’ हा अन्वयार्थ ( लोकसत्ता, २२ जून ) वाचून वाईट वाटले . त्यात वर्णिलेली परिस्थिती ही अहमदनगर या दुग्धोत्पादनात अग्रेसर असलेल्या जिल्ह्यात निर्माण व्हावी ही मोठी शोकांतिका म्हटली पाहिजे. कारण महाराष्ट्रात गाईचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी जे भरीव प्रयत्न द्मााले त्याची मुहूर्तमेढ अहमदनगर जिल्ह्यतून झाली असे निश्चित म्हणता येईल.

पद्मश्री मणिभाई देसाई यांनी भारतीय कृषिउद्योग प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केल्यावर १९७० साली राज्यात विदेशी वळूंचे वीर्य वापरून संकरीत गाईंची पैदास करण्यासाठी जी ८- १० केंद्रे सुरू केली त्यात अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर , श्रीरामपूर , कोपरगाव येथील सहकारी साखर कारखाने आणि नगर येथील पांजरपोळ या संस्थांनी हिरीरीने भाग घेतला आणि या सर्वांच्या संघटित प्रयत्नातूनच चित्र बदलले आणि तो जिल्हा दूध उत्पादनात अग्रेसर झाला. याच मणिभाई देसाई यांनी संकरीत गायींचा कार्यक्रम घेण्याआधी वीस बावीस वर्षे  उरुळी कांचन येथे उत्तम वंशाच्या गीर गायींचा कळप विकसीत केला होता आणि त्यांना ‘गोपालरत्न’ सारखे केंद्र सरकारचे पुरस्कारही मिळाले होते. तरीसुद्धा देशी गीर गाईंमधे पुढील विकास करण्यात त्यांना तांत्रिक समस्या दिसत होत्या आणि त्यावर मात करण्यासाठी विदेशी दुधाळ जातींचे गुण आपल्या गाईंमधे उतरवण्याची त्यांना आवश्यकता वाटली. त्यामुळे संस्था असो वा सामान्य शेतकरी, पण त्यांना आर्थिक दृष्टय़ा परवडतील अशा संकरीत गाई ( देशी गाईंपासून ) तयार करण्याची योजना त्यांनी हाती घेतली.

एका एकरात उसाऐवजी सकस चाऱ्याचे उत्पादन वर्षभर घेतले तर त्यावर ३-४ संकरीत गायी ठेवून दुधाची शेती करता येईल आणि ती उसापेक्षा फायदेशीर ठरेल असे गणित त्यांनी मांडले आणि ते सर्व संबंधितांनी स्वीकारले हे विशेष होय. त्यामुळे त्यांना यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, अण्णासाहेब पी. शिंदे या सर्वानी पाठिंबा दिला आणि पुढील काळात राज्यातील दुग्धोत्पादनाचे चित्रच बदलले . १९७०-७१ साली मणिभाई देसाई यांच्या संस्थेत मी असताना त्यांचे अनेक विचार ऐकले . ते म्हणत असत की , गाईचे खऱ्या अर्थाने महत्व वाढावे असे वाटत असेल तर तिला आर्थिक दृष्टय़ा सक्षम बनवण्यावाचून पर्याय नाही . त्यासाठी दुधाचे गुण विकसीत करणे हाच उपाय होय. अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात कार्नेशन डेअरी फार्मच्या आवारात तेथील चँपियन गाईचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून तिने एका वेतात ३७३६१ पौंड दूध दिल्याची नोंद आहे हे उदाहरण ते गाईच्या पूजेच्या संदर्भात देत असत.  ( सदर गाईचे नाव सेगिज पीटरजे प्रॉस्पेक्ट ऊर्फ पॉशम स्वीटहार्ट होते, मृत्यू १९२५ )

१९७० साली सौराष्ट्रातील दौऱ्यात त्यांच्यासमवेत मी होतो . जेतपुर या ठिकाणी पांजरपोळ संस्थांच्या प्रतिनिधींच्या संमेलनात सरकारने प्रत्येक गायीमागचे अनुदान वाढवून द्यवे अशी एकमुखी मागणी होती . त्यावेळी मणिभाई देसाई यांनी पांजरपोळ संस्थांना आवाहन केले की, सरकारी निधी असा अनंत काळ वापरण्याऐवजी त्यांनी गाईंमधील आर्थिक गुण (इकॉनॉमिक ट्रेट्स ) वाढीला लागतील असे कार्यक्रम हाती घ्यावेत आणि अनुदानावर अवलंबून राहू नये.

यावरून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात  गाईचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी ज्यांचे  मोठे योगदान आहे त्यांची गोरक्षणाबाबत काय मते होती हे  दिसून येईल .

आता असे वाटते की आपले दुग्धविकासाचे तारू कुठे तरी भरकटत चालले आहे . भारतीय वंशाच्या गाई फक्त गुणवान आणि त्यांचा विकास करणे हाच गोधनविकास असा आग्रह चाललेला दिसतो . त्यामुळे ‘गोकुळग्राम’ सारख्या हजाराहून जास्त भाकड , वृद्ध व सोडून दिलेल्या गाईंसाठी योजना आखल्या जातात पण असा एकही प्रकल्प तडीला जात नाही कारण तो अव्यवहार्य आहे हे माहीत असते. देशी गाईंची वृद्धी करणारे कार्यक्रम सरकारने जरूर हाती घ्यावेत पण त्याला वैज्ञानिक आधार असावा आणि जेथे दुग्धोत्पादन फोफावले आहे तेथील शेतकऱ्यांचे प्रश्न वेळीच हाताळून आजवर झालेला विकास लयाला जाणार नाही यासाठी धोरणे आखावीत आणि त्यातच देशाचे भले आहे असे वाटते .

– मुकुंद नवरे, गोरेगाव पूर्व (मुंबई)

 

जोडाक्षरे वापरत नाहीत हा कुठला तर्क?

प्रथम गिरीश दळवी यांचे एका अक्षराचे ‘शव परीक्षण’ या (१८ जून) लेखाबद्दल अभिनंदन! मृत्युपंथावर असलेल्या मराठीबाबतची त्यांची कळकळ वाखाणण्याजोगी आहे. ‘जोडाक्षरे कमी करण्याचे उद्दिष्ट असावे’ या पत्रातील प्रतिवाद (लोकमानस, २० जून) पटला नाही.

त्यात पत्रलेखक म्हणतात, ‘चित्रात दिलेली जोडाक्षरे इतिहासजमा झालेली आहेत.’ सध्या, दृष्ट, हद्द, श्राद्ध, क्वचित, आश्लेषा (नक्षत्र), प्रश्न, विप्लव, द्वंद्व, दग्ध, पुनश्च (जुन्या पद्धतीप्रमाणे) या शब्दांत ही अक्षरे सतत वापरली जात आहेत. ती नीट छापली जात नाहीत असे म्हणा हवे तर.

नव्या पिढीला ‘शोक’ कुठे वापरायचा आणि ‘षोक’ कुठे वापरायचा हे जोडअक्षर नसलेले शब्दही नीट वापरायची इच्छा नाही. अक्षरे वापरली जात नाहीत तर ती रद्द करावीत, हा नियम इंग्रजीला का सहसा वापरला नाही जात? कारण ते सर्व अक्षरे वापरतात. ४ (८४ ), १ (ं१ी ), े (ंे) आदी शब्दातील अक्षरे कमी करण्याचे हे ‘फॅड’ इंग्रजीत एसएमएसपुरतेच ठीक आहे. तिथे पैसे आणि वेळ वाचवायचा असतो. मराठी आहे अशीच टिकवून धरावी.

– यशवंत भागवत, पुणे

 

‘कलेचे वावडे’ मुलांच्या विकासाला घातक

‘अन्वयार्थ’ या सदरातील ‘कलेचे वावडे’ हे स्फुट (१० जून) व त्यानंतर २० जून रोजी कलाध्यापन क्षेत्रातील तज्ज्ञ वसंत सोनावणी यांचे ‘लोकमानस’मध्ये आलेले कला अध्यापनासंदर्भातील विचार वाचले. सोनावणी सरांसारख्या ज्येष्ठ मान्यवरांचे विचार वाचून तरी महाराष्ट्र शिक्षण खात्याचे डोळे उघडावयास हवेत. गेल्या काही महिन्यांत अनेक शाळांमध्ये काही कामानिमित्त जाण्याचा योग आला आणि जे काही पाहायला व ऐकायला मिळाले त्यामुळे मन सुन्न झाले! कित्येक शाळांत चित्रकला, शारीरिक शिक्षण, संगीत यांसारख्या विषयांसाठी शिक्षक तर नाहीतच आणि वाटेल त्या पद्धतीने या विषयांचे तास चालू होते. फळ्यावर काढलेली चित्रे मुले नकलून काढत (‘कॉपी’ करत) होती. शाळाप्रमुख, संस्थाचालक कोणालाही याविषयी गांभीर्याने विचार करावासा वाटत नव्हता. सध्या संस्थाचालकांपुढे शाळा (मराठी माध्यमाच्या) जगवायच्या कशा? तसेच, मुख्याध्यापकांसमोर, शिक्षकांसमोर विद्यार्थिसंख्या किमान पातळीवर कशी आणून ठेवायची यांसारखे अत्यंत गंभीर प्रश्न असल्याने शिक्षण खात्याच्या धोरणाकडे कोणालाही लक्ष द्यावेसे वाटत नाही.

चित्रकला, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, संगीत यांसारख्या विषयांमुळे मुलांचा सर्वागीण विकास होतो. उत्तम कलाकार नाही तरी जाणकार व्यक्ती म्हणून मुलांचा विकास होतो. सुरुवातीच्या काळात तर चित्र हीच मुलांची भाषा असते. मात्र या विषयांसाठी सोनावणी सर म्हणतात त्याप्रमाणे इ. आठवीपर्यंत चांगल्या प्रशिक्षित शिक्षकांकडूनच हे विषय शिकवले गेले पाहिजेत. सर्व पालक, शिक्षक, संस्थाचालकांनी शासनाकडे या गोष्टींचा सतत पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

– अपर्णा भोळे [निवृत्त कलाशिक्षिका], ठाणे पश्चिम

 

‘आनंदमार्ग’ वरील आरोप चुकीचे

आनंदमार्ग या संस्थेबद्दल ‘रामवृक्षच्या फांद्या या लेखामध्ये (१२ जून) दिलेली माहिती अयोग्य असून, या संस्थेचा जादूटोण्यावर अजिबात विश्वास नाही. लेखामध्ये माजी आयबी अधिकाऱ्याच्या हवाल्याने ज्या आरोपांची वाच्यता करण्यात आली आहे, त्यातील काही न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. राजाधिराज योग हे या संस्थेच्या साधनापद्धतीचे नाव असून, जगभर आज योगमार्गाचा जो उल्लेख झाला आहे त्यात आनंदमार्गची मोठी भूमिका आहे.

– आचार्य दिव्यचेतनानन्द अवधूत, जनसंपर्क सचिव, आनंदमार्ग प्रचारक संघ