रत्नागिरीत नुकताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पर्यटन महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त साकार झाला एक भव्य-दिव्य म्युरल पेंटिग प्रकल्प. त्यात सहभागी झालेल्यांचा कलानुभव-

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रत्नागिरी जिल्हा पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०१५ या कालावधीत साजरा करण्यात आला. जिल्ह्य़ातील पर्यटन स्थळाकडे आणि कोकणातील विविध कला संस्कृतीकडे पर्यटक आकर्षलेि जावे, पर्यटन विकासाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून जिल्ह्य़ातील सह्य़ाद्रीच्या पर्वत रांगा, ठिकठिकाणचे निसर्गसंपन्न समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड किल्ले, मंदिरे, विविध जातीचे प्राणी, पक्षी, जलचर इत्यादी गोष्टींची रंगाकाराने रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णाच्या सुमारे ३५० फूट बाय सहा फूट लांबी-रुंदीच्या भव्यदिव्य अशा नवीन संरक्षक िभतीवर आकर्षक चित्रांची म्युरल पेंटिगच्या तंत्राने केलेली मांडणी आजही येणाऱ्या लाखो पर्यटकांचे आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात आलेल्या चित्र-शिल्प प्रकल्पाचे प्रमुख संकल्पनाकार या नात्याने मी स्वत:च्या संकल्पनेनुसार डिझाइन तयार केले. सह्य़ाद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डेच्या १६ आजीमाजी उदयोन्मुख कलाविद्यार्थ्यांना व देवरुखच्या डी-कॅडच्या कॉलेजच्या चार कलाविद्यार्थ्यांना बरोबर घेऊन सुरुवात केल्यापासून केवळ १२ दिवसांत २८ पॅनलचे सुमारे ३५० फूट लांबीचे काम पूर्ण केले. त्याला पर्यटकांसोबतच जिल्ह्य़ातील सर्व थरांतील ग्रामीण जनतेची प्रामाणिकपणे शाबासकी मिळविली.
रत्नागिरीच्या समुद्रकिनारी आजही अस्तित्वात असणारा अति दुर्मीळ असा जलचर समुद्री घोडा, शिल्पकार संदीप ताम्हणकर यांनी साकारला. कोकणच्या सुमारे ७५० कि.मी.च्या समुद्रकिनारी होणारे कासवांचे प्रजनन, संवर्धन आणि त्याचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन जनजागृती करण्याचे आव्हान सहयाद्री निसर्ग मित्रचे भाऊ काटदरे यांनी पेलले. त्यांनी अंगीकारलेल्या या कामामध्ये खारीचा वाटा म्हणून सहकार्य करून जनजागृती करणाऱ्या प्रा. रुपेश सुर्वे यांनी जांभा दगड शिल्प माध्यमातून ५ ते ६ फूट लांबी-रुंदीची केलेली कासव संवर्धनाच्या कामाची शिल्पे पर्यटन महोत्सवाचे खास आकर्षण ठरली.
खरंतर बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांभा दगड (फाडी) हा कलात्मक कामासाठी वापरला जाऊ शकतो याचेच अनेकांना आश्चर्यच वाटत होते. मी काही वर्षांपूर्वी मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत जांभा दगड शिल्पांचे पहिले प्रदर्शन केलेले होते. त्यामुळे मला त्याची माहिती होती. भले मोठे व जड जांभा दगड कोंकण रेल्वेच्या हद्दीतून प्रशासनाच्या वतीने आम्ही क्रेनने उचलून, तीन ट्रॅक्टरमधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस आणले. कारण तेथेच आम्हाला आवश्यक असणारी सावली, पाणी, वीज व्यवस्था होती. कामाची सुरुवात करण्यापूर्वी नियोजित शिल्पांचे पाच वेगवेगळी छोटी मॉडेल्स (मॅकेट) तयार करण्यात आलेली होती. त्यातून समुद्री घोडा व कासव या दोन मॉडेल्सची निवड करण्यात आली. आम्ही मिळविलेला जांभा दगड त्यातील लोखंडाच्या अंतर्गत कणांमुळे अतिशय कडक होता. सुरुवातीचे चार-पाच दिवस या मोठय़ा जांभा दगडांना विशिष्ट आकार देण्याचे काम सुरु होते. त्यावेळी हे दगड जागेवरुन हलविण्यासाठी आम्ही जेसीबी व क्रेन यांचा आधार घेतला. काम बघायला आलेल्या नागरिकांचीही आम्ही मदत घेतली. त्यांनीही उत्साहाने आम्हाला मदत केली. कारण अनेकांना आमच्या कामाबद्दल कुतूहल होते. ते वेळोवेळी अनेक प्रश्न विचारत. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळाल्यानंतर तसेच छोटय़ा मॉडेल्सचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचे थोडेफार समाधान होत असे, परंतु लगेचच हे कसे काय शक्य आहे असा प्रतिप्रश्नही ते लगेचच करत. आपल्या प्रश्नावर चर्चा करताना तेच म्हणत की, ‘‘जांभा दगड हा ठिसूळ, मग कसा काय नाजूक आकार तुम्ही घडविणार?’’
मात्र शिल्पकार संदीप ताम्हणकर व प्रा. रुपेश सुर्वे यांनी समुद्री घोडा आणि कासवांच्या छोटय़ा मॉडेलप्रमाणेच जांभा दगडातून घडवलेले भव्यदिव्य शिल्प पाहिल्यावर मात्र याच रसिकांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही.
आम्ही सर्व कलाकार मंडळी चित्र शिल्प प्रकल्पाचे काम करीत असताना आमच्या सर्व कलात्मक कामाला सर्व प्रकारची वृत्तपत्रे, दूरदर्शन चॅनलकडून सतत प्रसिद्धी आम्हाला मिळत होती. रत्नागिरी जिल्ह्य़ात पहिल्यांदाच असा प्रकल्प साकार होत होता. जसजशी प्रसिद्धी मिळत होती तशी चौकशीही वाढत होती. परंतु या सर्वामुळे आम्हा सर्वाचा उत्साह कैकपटीने वाढत होता. साहजिकच आमची कामाची ओढ जशी वाढली तशी जबाबदारीही वाढीला लागली. भित्तिचित्रं व शिल्प प्रकल्पाचे काम करताना नावीन्यपूर्ण चतन्याची, आत्मिक आनंदाची तसेच दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी समाधानाची लकेर पाहताना आम्हा सर्वाना एक वेगळीच अनुभूती येत होती. कामाच्या पूर्ततेनंतर आमच्या डोळयांतून कधी आनंदाश्रू आले हेही आम्हाला समजले नाही.
या चित्र-शिल्प प्रकल्पामुळे कलामहाविद्यालयाच्या बाहेरील जगतात खूप काही शिकावयास मिळाले. इतकेच नव्हे तर आमच्या मध्येही आव्हान पेलण्याची ताकद, सहकाराच्या भावनेतून जिद्दीने काम करण्याची नियोजनबद्ध पद्धत आहे हे नव्यानेच जाणवले. कामाची पूर्तता करताना आम्ही नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान हाताळत होतो. चित्र-शिल्प विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यासाठी झटत होतो. त्यातील बारकाव्यांनी आम्हाला कामाचा आनंद दिला. अर्थातच हे सारं केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर आम्ही पूर्ण केलं. रत्नागिरी जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात आलेल्या या चित्र-शिल्प प्रकल्पाचे आम्ही साक्षीदार आहोत, आणि म्हणूनच आमच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय कालावधी आहे. यातून अनेक उदयोन्मुख कलाकारांनी, कलाविद्यार्थ्यांनी खूप काही मिळविलेले आहे. हे समाधान आमच्या आयुष्यभर लक्षात राहील. रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या िभतीवरील ही पर्यटन म्युरल पेंटिग्ज (भित्तिचित्रे) पाहूनच प्रत्येक जण पुढे जातो, हीच आमच्या कामाची पावती म्हणावे लागेल. म्हणूनच तमाम रत्नागिरीकरांनी एखाद्या अनमोल ठेव्याप्रमाणे ही पर्यटन भित्तिचित्रे व समुद्र घोडा व कासव ही शिल्पे कायमस्वरूपी जपावी, ही इच्छा.

अवघे धरू सुपंथ
या संपूर्ण चित्र-शिल्प प्रकल्पामध्ये साहाय्यक चित्रकार म्हणून परशुराम गावणंग यांनी काम पाहिले. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन आणि सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार आणि सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्रपणे केलेली धडपड लक्षात येत होती. आम्ही सर्व २१ कलाकार मंडळी उन्हातान्हातून दररोज १६ ते १८ तास काम करत होतो. या आम्हाला अमूल्य साथ लाभली ती प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्याची व सहकाऱ्यांची. रत्नागिरीतील वयोवृद्ध, चित्रकार व कला शिक्षणतज्ज्ञ मोहन पाटणकर यांचे आम्हाला बहुमोल मार्गदर्शन लाभत होते. रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्था यांच्या मार्फत अल्पोपाहार-चहापाणी, याशिवाय युवा सेनेचे तरुण, कलारसिक प्राची िशदे, दादासाहेब हेळेकर, शीतल मुळे या सगळ्यांनी वेळोवेळी अल्पोपाहार-चहापाणी देऊन आमची ऊर्जा कायम ठेवायला मदत केली. रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खोडदे यांनी लहान-मोठय़ा कामात दाखविलेली तत्परता आणि आपुलकीपणामुळे हा म्युरल पेंटिंगचा प्रकल्प पुढे अनेक वष्रे अबाधित राहील यात शंका नाही.
प्रा. प्रकाश राजेशिर्के – response.lokprabha@expressindia.com