‘चला हवा येऊ द्या’ हे वाक्य अनेकांच्या सवयीचं झालं ते ‘टाइमपास’ सिनेमातल्या ‘दगडू’मुळे. या दगडू म्हणजे प्रथमेश परबने उडी मारली आहे ती थेट हिंदीच्या मोठय़ा पडद्यावर. आगामी ‘दृश्यम’ या बडय़ा बॅनरच्या सिनेमातून तो मोठय़ा कलाकारांसोबत झळकणार आहे.
एका बडय़ा प्रॉडक्शन हाऊसमधून कास्टिंग डिरेक्टरचा त्याला एक फोन आला. पलीकडून ‘ऑडिशनला ये’ असा निरोप. हो-नाही करत त्यानेही त्या ऑडिशनला जायचं ठरवलं. तिथे गेल्यावर त्याला कळलं की ज्या सिनेमाच्या ऑडिशनला तो गेलाय त्यात अजय देवगण काम करणार आहे. थोडय़ा वेळाने कळलं, वायकॉम एटीन ही मोठी कंपनी निर्मिती करतेय. आणखी थोडं पुढे असं कळलं की त्या सिनेमाचं दिग्दर्शन निशिकांत कामत करताहेत. असे एकेक धक्के मिळाल्यानंतर आणि त्याची ऑडिशन यशस्वी झाल्यानंतर तो निवडला गेला आणि आता थेट अजय देवगणच्या मित्राच्या भूमिकेतून दिसणार आहे तो आगामी ‘दृश्यम’मध्ये. हा ‘तो’ म्हणजे ‘अरे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिलसे अमीर है अमीर.. चला हवा येऊ द्या’ हा संवाद प्रचंड लोकप्रिय करणारा ‘टाइमपास’फेम प्रथमेश परब. कमी वेळातच त्याच्या अभिनय कौशल्याने त्याने झेप घेतली आहे ती थेट हिंदी सिनेमापर्यंत.
हिंदी सिनेमाच्या या संधीविषयी प्रथमेश सांगतो की, ‘विकी म्हणून एका कास्टिंग डिरेक्टरचा फोन आला. ऑडिशनसाठीचा निरोप मिळाला. मी माझ्या इतर काही कामांमध्ये होतो. दिवसभरात काय काम करायचं याचं सगळं नियोजन केलं होतं. त्यामुळे त्या ऑडिशनसाठी जायचं की नाही या संभ्रमात मी होतो. पण, अखेर जायचं ठरवलं. तिथे गेल्यावर सिनेमाविषयी एकेक महत्त्वपूर्ण माहिती मिळत गेली. हिंदी सिनेमा, अजय देवगण मुख्य भूमिकेत, वायकॉम एटीन कंपनीची निर्मिती, निशिकांत कामत यांचं दिग्दर्शन आणि माझी भूमिका अजय देवगणच्या मित्राची असे एकेक सुखद धक्के तिथे गेल्यावर मिळत गेले. मी ऑडिशन दिली. ‘तुझी निवड शक्यतो होईलच. कारण निशिकांत कामत यांनीच तुझं काम बघून नाव सुचवलं होतं’ असं तिकडून मला सांगण्यात आलं. निशी सरांनी माझं नाव सुचवावं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. अशा प्रकारे माझी ऑडिशन झाली आणि निवड झाली.’ कसलीही अपेक्षा न करता समोर सुवर्णसंधीचं दार उघडावं तसंच प्रथमेशच्या बाबतीत झालं. जिथे जाण्याविषयी तो साशंक होता त्याच ऑडिशनमधून त्याची निवड होऊन हिंदी सिनेमात त्याला भूमिका मिळाली.
‘बीपी’, ‘बंध नायलॉनचे’ या एकांकिका आणि ‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास टू’ या सिनेमांमधून झळकल्यानंतर प्रथमेशची बॉलीवूडची दारं खुली झाली. सिनेसृष्टीत आल्यानंतर बॉलीवूडकडे झेप घेण्याची अनेकांची स्वप्नं असतात. काहींची ती खूप उशिरा पूर्ण होतात, तर काहींची पूर्ण होतच नाहीत. काही कलाकारांचं मात्र हे स्वप्न खूप कमी वेळात पूर्ण होतं. या काही मोजक्या कलाकारांपैकी प्रथमेश एक आहे असं म्हणता येईल. हिंदी सिनेमात काम करण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही तोवर ‘बडय़ा बॅनरचा हिंदी सिनेमा करणं’ हे त्यापुढचं स्वप्न रांगेत येऊन उभं राहतं. प्रथमेश त्याबाबतीतही नशीबवान ठरलाय असं म्हणायला हरकत नाही. ‘दृश्यम’ हा वायकॉम एटीन या बडय़ा कंपनीचा हिंदी सिनेमा त्याच्या करिअरसाठी मोठं वळण ठरणार यात शंका नाही. अजय देवगण, तब्बू, रजत कपूर, निशिकांत कामत अशा जाणकार मंडळींसोबत प्रथमेश हिंदीच्या मोठय़ा पडद्यावर झळकणार आहे. ‘दृश्यम’ या सिनेमात त्याची अजय देवगणच्या मित्राची भूमिका आहे. होजे असं त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.
हिंदी सिनेमा आणि कलाकारांचे नखरे हे समीकरण सर्वश्रुत आहे. पण, ‘दृश्यम’च्या सेटवरचा वेगळा अनुभव प्रथमेश सांगतो. अजय देवगण, तब्बू, रजत कपूर अशी बडी स्टारमंडळी असली तरी त्यांच्या वावरण्यात ‘स्टार’ असण्याचा रुबाब आढळून येत नसल्याचं त्याला दिसून आलं. खरं तर आपलं काम झालं की आपापल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसणारे अनेक कलाकार आहेत. पण, काहींना सेटवर सगळ्यांमध्ये मिसळून राहायला आवडतं. त्यापैकीच ‘दृश्यम’चे कलाकार आहेत. प्रथमेश सांगतो, ‘दृश्यमच्या सेटवर गेलो, पण हिंदी सिनेमाच्या सेटवर आलो आहोत असं मला अजिबात वाटलं नाही. कारण तिथलं वातावरण खूप मोकळं होतं. मोठे कलाकार असले तरी त्यांचा इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन साधा, सरळ होता. अजय देवगण तर एखाद्या सीनची तालीम स्वत:च करायला सुरुवात करतात. त्यांच्यासोबत माझे मोठे सीन्स होते. पण, का कोण जाणे मला विशेष दडपण जाणवलं नाही. किंबहुना ते त्यांनीच येऊ दिलं नसावं. सगळ्याच सहकलाकारांसोबत ते सहज जुळवून घेतात. त्यांच्यासोबच्या माझ्या सीन्समध्ये मीच जास्त बोलतो. पण, तरीही त्यांचा अभिनय मला खूप काही शिकवून गेला. तसंच तब्बूचंही आहे. नकळत अनेक गोष्टी त्यांच्याकडूनही अनुभवल्या, शिकल्या.’ निशिकांत कामत यांनी मराठी-हिंदी इंडस्ट्रीत चांगलं नाव कमावलं आहे. प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही बाजूंची त्यांना अचूक जाण आहे. त्यांच्याविषयी प्रथमेश सांगतो, ‘मी आणि निशी सर एकदा एकत्र एअरपोर्टवर येत होतो. तेव्हा आमच्यात खूप गप्पा झाल्या. कॉलेज, एकांकिका स्पर्धा, नवे-जुने सिनेमे, सिनेमांतल्या व्यक्तिरेखा, माझी या सिनेमातली व्यक्तिरेखा असे अनेक विषय आमच्यात चर्चेत आले. निशी सर सेटवर दिग्दर्शकाच्या भूमिकेत असले तरी अभिनयावर प्रेम करणारी व्यक्ती म्हणूनही कलाकारांशी हितगूज करत असतात.’
गोरा, देखणा, उंच, उत्तम शरीरयष्टी अशी सिनेमातल्या हिरोची सर्वसाधारण संकल्पना प्रेक्षकांच्या मनात असते. पण, ‘टाइमपास’ या सिनेमातल्या हिरोने मात्र प्रेक्षकांना विचार करायला लावला. हिरोची ही सरधोपट प्रतिमा ‘टीपी’मुळे वेगळ्या स्वरूपात आली. त्या सिनेमातल्या नायक म्हणजे प्रथमेश परबच्या अभिनयाचं जेवढं कौतुक झालं तेवढीच त्याच्या नायक असण्यावरही टीका झाली. अशा प्रकारच्या प्रतिक्रियांना प्रथमेशलाही त्यावेळी सामोरं जावं लागलं होतं, असं तो स्पष्ट सांगतो. ‘टाइमपास हा सिनेमा करताना मला काहीच कळत नव्हतं. मला नेमकं काय करायचंय, काय होणार आहे वगैरे काहीच माहीत नव्हतं. पण, दिग्दर्शक रवी जाधव आणि लेखक प्रियदर्शन जाधव या दोघांनी माझ्याकडून दगडू करून घेतला. जसजसं शूट करत गेलो तसतसं आत्मविश्वासही वाढत गेला. ‘असा हिरो असतो का’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मलाही मिळाल्या. शेवटी मीही माणूस आहे. त्यामुळे मलाही वाईट वाटलंच होतं. पण, मी त्या प्रतिक्रियांमुळे शिकत गेलो. शांत झालो. समोरच्याला समजून घेण्याची वृत्ती माझ्यात आली. एखादी भूमिका कलाकाराला खूप काही शिकवून जाते. पण, मला दगडू या भूमिकेला मिळालेल्या प्रतिक्रियांनी बरंच शिकवलं’, तो सांगतो.
डहाणूकर कॉलेजच्या प्रथमेशने बँकिंग अँड इन्शुअरन्सची पदवी घेतली आहे. अभिनय क्षेत्राकडे जाणारं त्याचं पहिलं पाऊल म्हणजे डहाणूकर कॉलेज. अनेक कलाकारांप्रमाणे प्रशमेशचीही सुरुवात झाली ती आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामधून. डहाणूकरच्या नाटय़मंडळात येऊन एकांकिकांमध्ये मॉबमध्ये भूमिका करत, नाचत प्रथमेशला ‘बीपी’ या एकांकिकेत भूमिका मिळाली. ‘आंतर महाविद्यालयीन स्पर्धामध्ये ‘बीपी’ ही एकांकिका प्रचंड गाजली. त्यानंतर त्यावर सिनेमा करायचा असं दिग्दर्शक रवी जाधव यांनी ठरवलं. त्या सिनेमासाठी त्यांनी माझीही निवड केली. ‘बालक पालक’ या सिनेमानंतर सहा-एक महिने फारसं काही काम नव्हतं. दरम्यान मी ‘सवाई’साठी ‘बंध नायलॉनचे’ ही एकांकिका केली. यात माझी लहान भूमिका होती, पण त्यात मी पडद्यामागे जास्त सक्रिय होतो. याच काळात मला ‘टाइमपास’ हा सिनेमा मिळाला. जो माझ्या आयुष्यातला टर्निग पॉइंट ठरला’, तो सांगतो. प्रथमेशसह ‘दृश्यम’ या सिनेमात इतरही काही मराठी कलाकार आहेत. ‘उर्फी’, ‘झिपऱ्या’, ‘पस्तीस टक्के काठावर पास’, ‘लालबागची राणी’ असे त्याचे काही आगामी सिनेमे आहेत. सिनेमांच्या हट के नावांप्रमाणे त्याच्या भूमिकांविषयी प्रेक्षकांमध्ये नक्कीच उत्सुकता असेल.

स्टायलिश दिग्दर्शक
‘निशिकांत कामत हे स्टायलिश दिग्दर्शक आहेत असं मी म्हणेन. पहिल्या दिवशी मी जेव्हा सेटवर गेलो तेव्हा माझं लक्ष पटकन त्यांच्याकडेच गेलं. ते स्वत:ला खूप चांगल्या रीतीने सादर करतात. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व उठावदार दिसतं. सेटवर दिग्दर्शक म्हणून वावरत असले तरी त्यांच्या वागण्यात, बोलण्यात अ‍ॅटिटय़ूड कधीच नसतो. सगळ्यांना समजावून, सांभाळून घेतात. त्यामुळे अशा स्टायलिश दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, याचा मला आनंदच आहे.’

अजयला कौतुक मराठी सिनेमांचं
‘अजय देवगणला मराठी सिनेमांच्या व्यवसायाचं कौतुक वाटतं. ‘दृश्यम’ या सिनेमाचं शूट चालू असताना ‘टाइमपास टू’ प्रदर्शित झाला होता. तेव्हा सेटवर कोणी तरी त्यांना सांगितलं की, मीही त्या सिनेमात आहे. तेव्हा ते माझ्याशी त्याबाबत बोलत होते. ‘टीपी टू’ चांगलं कलेक्शन करतोय. मराठी सिनेमा मोठय़ा प्रमाणावर व्यवसायही करतोय हे बघून खरंच आनंद होतो. काही हिंदी सिनेमांचं देशभर जितकं कलेक्शन होतं तितकं काही मराठी सिनेमांचं राज्यभर कलेक्शन होतं असतं, ही कौतुकाची गोष्ट आहे.’
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com