कृ. ज. दिवेकर यांचा ‘ब्लॉग माझा’ या सदरात आलेला ‘डस्टबीन’ वाचायला घेतला आणि डोंबिवलीचे नाव वाचल्यावर उत्सुकता वाढली. दिवेकर यांनी खरोखरच सत्य परिस्थितीचे कथन केले आहे. पण ती मुलगी डोंबिवलीतील नव्हती हे वाचून बरे वाटले. कारण गेली ५४ वर्षे मी डोंबिवलीत राहात आहे. आमच्या डोंबिवलीतल्या मुली असे प्रश्न कधीच विचारणार नाहीत. त्या खूप समजदार आहेत. आलेल्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे व त्यातून काय मार्ग काढायचा हे सर्व त्या नोकरी सांभाळून व घर सांभाळून करतात, म्हणून तर विवाहेच्छुक मुलांना डोंबिवलीतल्या मुली आवडतात. माझा नातू पुण्यात आहे. तो लग्नाचा आहे. सर्व छान आहे. नोकरी, पगार, ‘ब्लॉक’ सर्व आहे. बहिणीचे लग्न झाले आहे. आई-वडील नोकरी करतात. पण परवा माझी पुतणी (मुलाची आई) सांगत होती मुली घरी आल्या किंवा आम्ही बघायला गेलो तर मुलीकडील लोक ‘असे’ प्रश्न विचारतात की, काय उत्तर द्यावे कळतच नाही. मुली खूप शिकतात, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या करतात, स्वतंत्र निर्णय घेतात, पण त्यांचा रस्ता कुठे तरी चुकतो आहे आणि मुलींच्या आईपण जास्त लक्ष घालतात (मुलींच्या आईने रागावू नये) मुलीला सर्व पसंत आहे पण आई म्हणते,‘ बघ स्वाती, मला मुलाच्या आईचा चेहरा जरा रागीटच वाटला (अरे असा असतो एखाद्याचा) लग्न झाल्यावर त्रास होईल.’ तेव्हा मुलगी आईला ठणकावून का सांगत नाही, आई सर्व छान आहे, मला पसंत आहे, मी मुलाच्या आईला सांभाळून घेईन तू काळजी करू नकोस. खरोखरच सध्या भ्रूणहत्येमुळे मुली कमी झाल्यात आणि काही आहेत त्या अशा ‘डस्टबीन’सारखे प्रश्न विचारणाऱ्या, अर्थात सगळ्याच अशा नसतात. खूप चांगल्यापण आहेत असो.
-शरयू वि. कुलकर्णी, डोंबिवली (पूर्व).

चटका लावणारी घटना
पंधरा वर्षे कणाकणाने मृत्यूशी धीराने सामना करणारा निखिल आणि खडतर जीवनातील सत्य स्वीकारून, निखिलचा सारथी बनून, त्याच्या सावलीशीसुद्धा एकरूप झालेल्या, हळव्या पण कर्तव्यदक्ष पित्याची ‘एक अटळ..हळवा प्रवास’ (१५ जून २०१३) ही कथा चटका लावून गेली. एका पित्याची ही अनोखी ओळख हिरकणीपेक्षाही कितीतरी पटीने थक्क करणारी वाटली. अंतर्मुख झालेल्या मला पुढे शब्दच सुचत नाहीत. फक्त शतकोटी प्रणाम करताना आदराने व गर्वाने ऊर भरून येतोय, एवढे मात्र खरे!
-मनीषा दीक्षित, भांडूप(पूर्व).

Why you must never drink fruit juice on an empty stomach
तुम्ही सकाळी उठल्या उठल्या फळांचा रस पिता का? उपाशीपोटी फळांचा रस का पिऊ नये? डॉक्टरांनी सांगितले कारण…
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Ram Navami 2024 Shubh Yog
२०२४ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग जुळून आल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा

‘फादर्स डे विशेष’ लेख आवडले
‘फादर्स डे’साठीची १५ जूनची चतुरंग पुरवणी मन समृद्ध करून गेली. ‘एक अटळ हळवा प्रवास’ हा लेख एकीकडे सुन्न करून गेला तर एकीकडे वेळप्रसंगी आपल्या जिवलगासाठी, काळजाच्या तुकडय़ासाठी आपल्याला कणखरही व्हावे लागते याची जाणीव करून गेला. यासह गुलजार यांचा लेख म्हणजे तर एक तरल कविताच होय! त्यांच्या पहिली मुलगी होण्याच्या इच्छेबद्दल वाचताना मला माझ्या आयुष्यातील एक प्रसंग आठवला. माझे एक दीर ज्योतिषी आहेत. त्यांनी माझा हात बघून पहिला मुलगा होईल असे भविष्य वर्तवले होते. माझ्या सासरच्या मंडळींना हे ऐकून खूप आनंद झाला, पण मला पहिली मुलगी झाली तेव्हा सगळ्यांनी तिचं आनंदात स्वागत केलं. पण दीर मात्र विचारात पडले. तेव्हा त्यांना मी सांगितलं, माझीच आंतरिक इच्छा होती मला मुलगी व्हावी अशी.. असो. एकंदरीतच गुलजार यांचा लेख, तो शाळा निवडण्याचा प्रसंग अगदी न बोलताही प्रत्येक पालकांचे प्रबोधन करणारा आहे. गुलजार यांचे परममित्र अरुण शेवते यांनी या लेखाचे दुधात साखरेप्रमाणे विरघळलेले शब्दांकन केले असल्याने लेख खूपच उंचीवर गेला आहे.
– ज्योती कपिले, वांद्रे.

शेतकऱ्यांच्या कर्जामागील वास्तव
२२ जून च्या ‘चतुरंग’मधील ‘जिणे अभावाचे’ या लेखामधील शेतकऱ्यांचे वास्तव जीवनवर्णन हृदयद्रावक तर आहेच तसेच ‘या बँका-फँका कायबी कामाच्या न्हायीत’ हे इंदूबाईचे उद्गार सत्य आहेत. सहकारी बँकांची कोणतीही प्रशंसा करीत नाही. ‘शेतकऱ्यांना कर्ज हवे’ असे त्या भागाचे पुढारीच शासनाला पटवून देतात. त्यात पुढाऱ्यांचेच हित दडलेले असते.  यानेच शेतकरी हाय खातात.
-म. ने. वालचाळे, खारघर

जातीवैविध्य ‘वैशिष्टय़’ का ठरू नये ?
२९ जूनच्या ‘चतुरंग’मधील अमृता सुभाष यांच्या लेखात त्यांनी एका अत्यंत संवेदनशील विषयाला स्पर्श केला आहे. नावांचा उच्चार चुकीचा करणे हे सार्वत्रिक आहे, त्याचा जातीशी तसा काही संबंध नसतो. आम्हाला कित्येक लोक विशेष करून टेलीमार्केटिंगवाले सर्रास ‘म्हात्रे’ म्हणतात. त्यांना पुन:पुन्हा सांगावं लागतं, आमचं आडनाव ‘म्हात्रे’ नसून ‘मराठे’ आहे. त्यावर ते ‘तेच ते’ असं म्हणतात. दुबे नावाच्या एका उत्तरभारतीय अधिकाऱ्याला डुबे म्हटलं तर तो चिडला असा एक किस्सा एकदा वर्तमानपत्रात वाचला होता, त्याची आठवण आली.
‘शेपूट गळून पडली तशी जात गळून पडण्याची वेळ आली आहे’ असं अमृताचं म्हणणं आहे. पण सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत ते केवळ कठीण नाही तर अशक्य आहे आणि त्याची गरजही नाही. प्रत्येक जातीचं काही ना काही गुणवैशिष्टय़ असतंच. त्या वैशिष्टय़ांवर टीका न करता त्याचा यथोचित उपयोग करून घेण्याचं धोरण ठेवलं पाहिजे, असे वाटते. आपल्या देशाचं भौगोलिक आणि सांस्कृतिक वैविध्य हा आपल्या अभिमानाचा विषय असतो, तसा जातीय, आहार-विहाराचं वैविध्य का नसावं? जातीभेद नष्ट करण्यापेक्षा दुसऱ्या जातींचा आदर करायला शिकवणं,  ही खरी काळाची गरज आहे.
– राधा मराठे

वृद्ध मंडळींनीही सहकार्य करावे
६ जुलैच्या पुरवणीमधील ‘श्रावण बाळासाहेब’ हा मंगला गोडबोले यांचा खुमासदार शैलीतील लेख आवडला. विशेष कारण नसताना केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी कुरकुर करण्याची सवय अनेक वृद्धांना असते. घरांत ज्येष्ठ म्हणून मिरविण्याची हौस मरेपर्यंत जात नाही. घरातल्या बाकीच्या सदस्यांना त्यांची-त्यांची कामे असतात, तरीही हे ज्येष्ठ त्यांची दुखणी-बहाणी काढत असतात. त्यांची विचारपूस केली जातेच, तरीही घरातल्या लहानसहान गोष्टींमध्ये नाक खूपसून स्वत:चे महत्त्व वाढवण्याच्या प्रयत्नात ते असलेले महत्त्वही घालवून बसतात. हल्ली चांगले औषधोपचार, साथींच्या रोगांचे नियंत्रण, मध्यम वर्गाला मिळालेली सुबत्ता इत्यादींमुळे आयुर्मर्यादा चांगलीच वाढली आहे. कित्येक घरांत मुलाबाळांची साठी तर सोडाच पण सहस्रचंद्रदर्शन सोहळा पाहण्याची संधीही वृद्धांना मिळते. शरीर साथ देत नाही, मरणही येत नाही. इतके त्रास असताना जे तुमचं करतात त्यांना सहकार्य करण्याऐवजी भुणभुण करून घरातल्यांना आपण नकोसे होण्यापर्यंत मजल मारण्यात काय हशील आहे? परंतु हा समजूतदारपणा न दाखवता त्यांची कोंडी करण्यातच त्यांना धन्यता वाटते त्याला कोण काय करणार? बाहेरच्यांना याची कल्पना नसते. त्यामुळे घरातील तरुण पिढीची घुसमट त्यांना समजत नाहीं. अशा वृद्धांसाठी, मानपसोपचाराचे स्पेशलायजेशन ही आता काळाची गरज झाली आहे.
– राजीव मुळ्ये, दादर

 जात नाही ‘जात’
‘माझं नाव’ या अमृता सुभाष यांच्या २९ जूनच्या लेखातील मुद्दय़ांशी मी सहमत आहे. ज्या बालवयात लहानग्या मुलांवर फक्त माणूसपणाचे संस्कार होणे अपेक्षित आहे, त्याच वयात शाळेत त्यांना आधी जात विचारली जाते, नव्हे ती मनावर कोरली जाते. अशा वेळी जातीपाती पलीकडचा अत्यंत सुंदर विचार रुजावा तरी कसा? एकीकडे ‘सारे भारतीय माझे बांधव’ असा पाढा गिरवायचा आणि दुसरीकडे त्याच शाळेच्या िभतीवर या जातीचे किती अन् त्या जातीचे किती हा आकडा गिरवायचा अशा विरोधी वातावरणात वाढतो आपण आणि मग कसले धडे देतोय जातीय, वर्णभेद नाहीसा करण्याचे आपण! जोवर हा दांभिकपणा आपण थांबवत नाही तोवर जात नाही ‘जात’ असंच म्हणण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर येत राहील. म्हणूनच अमृताने यावर शोधलेले ‘अमृता सुभाष’ हे उत्तर पटलेच. काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात बातम्या झळकल्या; आंतरजातीय विवाह केला म्हणून बापाने मुलीचा खून केला आणि दुसरी बातमी काही दिवस आधीची- शाळेच्या दाखल्यावरून जात काढावी असा प्रस्ताव. या दोन घटनांच्या पाश्र्वभूमीवर अमृताचा लेख अधिकच खोलवर भिडतो. अत्यंत संवेदनशील विषय नेटकेपणाने मांडल्याबद्दल तिचे अभिनंदन.
– तुषार देसले

बदल अपरिहार्य
लेखिका मंगला गोडबोले यांच्या ६ जुलैच्या सदरातील ‘श्रावण बाळासाहेब!’ हा लेख अतिशय आवडला. आजच्या पिढीतल्या तरुणांना स्वत:चेच काही करायला आता वेळ नसतो, कारण नोकरी आणि स्वत:च्या मुलांचे करण्यातच त्यांचा सारा वेळ जातो. तरीही जमेल तसे आमच्या पालकांचे आम्ही करतच असतो. त्यांनीही थोडे समजून घेतले पाहिजे असे वाटते. आणि परदेश वगैरे कारणे सोडाच अगदी १० मिनिटांवर जरी पालकांचे घर असले तरी जायला वेळ नसतो अनेकांकडे, इतकं आयुष्य घडय़ाळ्याच्या काटय़ावर चालणारं आहे. पण या धकाधकीच्या आयुष्याची सुरुवात आधीच्या पिढय़ांनी करून ठेवली म्हणून आम्हीही आता त्यात भरडले जात आहोत असे मला वाटते. यालाच आयुष्य म्हणतात. बदल अपरिहार्य आहे.
-अश्विनी, ई-मेलवरून.

आजच्या स्त्रीने ठरवायला हवे.
सरस्वतीबाई ऊर्फ येसूवहिनी सावरकर यांच्या कारकिर्दीची माहिती देणारा रोहिणी गवाणकर यांचा ६ जुलैच्या पुरवणीतील लेख आवडला. स्वत:ची कोणतीही टिमकी न वाजवता सर्व धर्मातील, पंथातील, स्तरातील स्त्रियांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जे कार्य मूकपणे केले, त्यासाठी वाट्टेल ते सहन केले त्याला ‘लोकसत्ता-चतुरंग’ प्रसिद्धी देत असल्याबद्दल आभार. आजही अनेक स्त्रियांना मिळणारे स्वातंत्र्य हे अत्यंत मर्यादित व दिखाऊ स्वरूपाचे आहे, त्याचे कारण काय यावर अधिक विचार व्हायला हवा. सवाष्णपणाचे व त्यामुळे होणाऱ्या समारंभांना आधुनिक स्त्रीने किती महत्त्व द्यायचे, ते कौतुक किती प्रमाणात मिरवायचे तसेच दागिन्यांच्या ओझ्याखाली किती झुकायचे? एक व्यक्ती म्हणून माणूसपणा जिवंत ठेवण्यास किती महत्त्व द्यायचे, हक्क मागायला का बिचकायचे व सतत त्यागमूर्तीच का व्हायचे, हे आजच्या स्त्रीने ठरवायला हवे.
-राधा, ई-मेलवरून.

ई-प्रतिसाद
बदल अपरिहार्य
लेखिका मंगला गोडबोले यांच्या ६ जुलैच्या सदरातील ‘श्रावण बाळासाहेब!’ हा लेख अतिशय आवडला. आजच्या पिढीतल्या तरुणांना स्वत:चेच काही करायला आता वेळ नसतो, कारण नोकरी आणि स्वत:च्या मुलांचे करण्यातच त्यांचा सारा वेळ जातो. तरीही जमेल तसे आमच्या पालकांचे आम्ही करतच असतो. त्यांनीही थोडे समजून घेतले पाहिजे असे वाटते. आणि परदेश वगैरे कारणे सोडाच अगदी १० मिनिटांवर जरी पालकांचे घर असले तरी जायला वेळ नसतो अनेकांकडे, इतकं आयुष्य घडय़ाळ्याच्या काटय़ावर चालणारं आहे. पण या धकाधकीच्या आयुष्याची सुरुवात आधीच्या पिढय़ांनी करून ठेवली म्हणून आम्हीही आता त्यात भरडले जात आहोत असे मला वाटते. शेवटी यालाच आयुष्य म्हणतात. बदल अपरिहार्य आहे.
-अश्विनी, ई-मेलवरून.

जात नाही ‘जात’!
‘माझं नाव’ या अमृता सुभाष यांच्या २९ जूनच्या लेखातील मुद्दय़ांशी मी सहमत आहे. ज्या बालवयात लहानग्या मुलांवर फक्त माणूसपणाचे संस्कार होणे अपेक्षित आहे, त्याच वयात शाळेत त्यांना आधी जात विचारली जाते, नव्हे ती मनावर कोरली जाते. अशा वेळी जातीपाती पलीकडचा अत्यंत सुंदर विचार रुजावा तरी कसा? एकीकडे ‘सारे भारतीय माझे बांधव’ असा पाढा गिरवायचा आणि दुसरीकडे त्याच शाळेच्या िभतीवर या जातीचे किती अन् त्या जातीचे किती हा आकडा गिरवायचा अशा विरोधी वातावरणात वाढतो आपण आणि मग कसले धडे देतोय जातीय, वर्णभेद नाहीसा करण्याचे आपण! जोवर हा दांभिकपणा आपण थांबवत नाही तोवर जात नाही ‘जात’ असंच म्हणण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर येत राहील. म्हणूनच अमृताने यावर शोधलेले ‘अमृता सुभाष’ हे उत्तर पटलेच. काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात बातम्या झळकल्या; आंतरजातीय विवाह केला म्हणून बापाने मुलीचा खून केला आणि दुसरी बातमी काही दिवस आधीची- शाळेच्या दाखल्यावरून जात काढावी अशा प्रस्ताव. या दोन घटनांच्या पाश्र्वभूमीवर अमृताचा लेख अधिकच खोलवर भिडतो. अत्यंत संवेदनशील विषय नेटकेपणाने मांडल्याबद्दल तिचे अभिनंदन. खरं तर हे आपलं दुर्दैवच की ‘हे विश्वची माझे घर’ असं सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणारे आपण आजही हे सहन करतोय.
तुषार देसले