शेक्सपीयरचं स्मारक पाहिलं आणि आठवला तो शिवस्मारकावरून आपल्याकडे घातला जाणारा घोळ.. आपल्याकडच्या सगळ्या खुणा पुसत चालल्यात. वस्तू तर एकही शिल्लक नाही. सगळं संपल्यात जमा आहे. जे काही शिल्लक आहे ते फक्त जिभेवर आहे.

मी सलग दुसऱ्या महिन्यात लंडनला जाऊन आलो. माझ्या ‘यलो’ या सिनेमाचे शो होते तिकडे. या खेपेस मी ‘िवड्सर कॅसल’ आणि शेक्सपीयरच्या जन्मगावी- स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हनला त्याचं राहतं घर बघायला गेलो होतो. ‘िवड्सर कॅसल’ हा ९०० वर्षांपूर्वी उभा केलेला कॅसल आहे. तो पाहून आपले फक्त डोळे फाटतात; कित्येक तास आपला फक्त आ वासलेला असतो; आपल्या उरात धडकी भरते. ही अवस्था फक्त ब्रिटिशांच्या वैभवाने होत नाही तर एखादी पुरातन वास्तू कशी जतन करावी याच्या जाणिवेनं होते. शेक्सपीयरचं घर त्या कॅसलच्या तुलनेनं खूपच छोटं. पण माझ्यासारख्या रंगकर्मीला तिथं जाणं म्हणजे वारकऱ्यानं पंढरपूरला जाण्यासारखंच. पण माझी तिथं जाण्यामागची प्रेरणा फक्त भावनिक नव्हती तर बरंच काही जाणून घेण्याची होती. शेक्सपीयरच्या वडिलांनी १५२० साली खरेदी केलेलं घर म्हणून ब्रिटिशांनी आजही जसंच्या तसं जतन करून ठेवलं असेल? असं काय आहे त्या घरात, जिथं बसून शेक्सपीयरनं त्याची अजरामर नाटकं लिहिली? शेक्सपीयरसारख्या लेखकाचं घर नक्की आहे तरी कसं? कुठे आणि कसा राहिला तो? त्यानं लिहिलेली नाटकं त्याला नक्की सुचली कुठून? अनेक प्रश्नांची भेंडोळी. या प्रश्नांच्या उत्तरामागे अनेक शतकं गेली. तशी ती सर्वच सर्जनशील कलावंतांच्या, शास्त्रज्ञांच्या, विचारवंतांच्या, अगदी कोणत्याही कर्तृत्ववान माणसांच्या यशस्वी होण्यामागची; ती माणसं ‘तशी’ असण्यामागची उत्तरं शोधण्यात जातात. बव्हंशी अनेक उत्तरं मिळतात, पण काही प्रश्न अनाकलनीयच राहतात. एखादा लेखक जेव्हा लिहितो तेव्हा तो कोणत्या घरात वाढला, त्याचा परिसर, अवकाश, परिस्थिती याला अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्याच्या सर्जनतेची बीजं नक्की कुठं दडलेली असतात? ही बाब कवी, नाटककारापासून अगदी शास्त्रज्ञांपर्यंत लागू होत असते. कारण त्यांना सुचलेल्या विचारांमागे या सगळ्याचा कोणता ना कोणता तरी आधार त्यांच्या सर्जनशीलतेमध्ये असतोच असतो. गतकालीन सर्जनशीलतेची कारणं शोधणं हा माणसाचा ध्यासच आहे. गोष्टी सापडत नाहीत तोवर त्याचा पिच्छा पुरवणं आणि एकदा सापडल्या की त्या साठवणं, बाळगून ठेवणं; जतन करणं.
कोणतीही गोष्ट जतन करण्याच्या बाबतीत अभ्यासूंनी एकदा आपल्या देशाबाहेर कुठेही जाऊन यायलाच हवं आणि युरोपात तर हमखासच.
आणि काहीही जतन करण्याच्या बाबतीत आपण मात्र नेमके कुठे आहोत? काहीही जतन करण्याच्या बाबतीत आपण इतके निकम्मे, इतके बेजबाबदार, इतके बेमुर्वतखोर, इतके निलाजरे झालो आहोत की त्याची आज आपल्याल्या यित्कचितही शरम वाटेनाशी झाली आहे.
मी लंडनमधूनच घरी, मित्रांना व्हॉट्सपवर उतावीळपणे शेक्सपीयरच्या घरचे फोटो पाठवले. पण तिथून फोटो पाठवणं म्हणजे ओंजळीत पाणी घेऊन, ‘हा बघ िहदी महासागर’ असं सांगण्यासारखं होतं. त्यामुळे आल्यावर स्वाभाविकपणे तिथल्या अनुभवांची सरबत्ती सुरू झाली. मी काही फोटो दाखवत असतानाच माझ्या बायकोने माझं पुराण मध्येच थांबवून माझ्यासमोर आदल्या दिवशीचं वर्तमानपत्र धरलं. होमी भाभांच्या घराच्या लिलावाची बातमी होती. मी ज्या उत्साहानं सगळं सांगत होतो ते माझं सगळं अवसानंच गळालं.
ज्या शास्त्रज्ञाने आपल्या देशात पहिलं आण्विक केंद्र उभं केलं, त्या शास्त्रज्ञाच्या घराचा लिलाव होतो? नंतर या प्रकरणात अनेक निराळे तपशील आले. तेही सगळे चमत्कारिकच आहेत. ज्या एनसीपीएच्या ताब्यात हे घर आहे; ही संस्थाच कला, संस्कृतीविषयक संशोधन, संवर्धन, जतन करणारी देशभरातली एक जाणकार आणि मान्यवर संस्था आहे. या संस्थेनंच या बंगल्याच्या लिलावाचा पुढाकार घ्यावा हेच एक आश्चर्य. त्यात परत काही नामवंत कलाकारांनी एका शास्त्रज्ञाच्या बंगल्याच्या लिलावाला पाठिंबा दर्शवला आहे; हे आणखीन आश्चर्य. आपल्याकडे घोळ फार. हा बंगला होमींनी त्यांच्या भावाच्या म्हणजे जमशेदच्या नावावर केला होता, त्या बंगल्याचे हक्क नंतर भावाकडे होते, होमी भाभा स्वत या बंगल्यात फार काळ राहिले नव्हते वगरे, वगरे.. म्हणजे इतकी र्वष बंगला होमी भाभांचा म्हणूनच ओळखला जात होता. पण विकताना त्यात कायदेशीर बाबी महत्त्वाच्या असल्याने तो बंगला कायद्याच्या दृष्टिकोनातून होमींचा कसा नव्हता; ३७२ कोटी रकमेपुढे हा भावनिक गोंधळ कसा मूर्खपणाचा आहे, यातला काही पसा कलाविषयक संवर्धनासाठी एनसीपीएला कसा उपयोगी पडणार आहे वगरे व्यवहार्य मुद्दे समंजस म्हणवणाऱ्या धुरीण लोकांनी मांडायला सुरुवात केली आहे. शेवटी कायदा महत्त्वाचा आणि सरकार कायद्याच्या विरोधात जाणार नाही. शेवटी काय..तर एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शास्त्रज्ञाच्या घराच्या आठवणी इतिहासातून कायमच्या पुसल्या जाणार..
हे गंडांतर आपल्या देशात असंख्य इतिहासकारांच्या, तज्ज्ञांच्या, कलावंतांच्या, शास्त्रज्ञांच्या ऐतिहासिक अस्तित्वावर होत आलेलं आहे; आणि येत राहणार आहे. कारण सरकारला या अशा क्षुल्लक गोष्टींत लक्ष घालायला जराही फुरसत नाही. सरकारला या मुद्दय़ावरून राजकारण करता येणार असतं तर सरकारनं बाकी सगळं बाजूला टाकून यात पहिलं लक्ष घातलं असतं. वास्तू कुणाची आहे, त्याची जात, त्याचं राजकीय भांडवल, त्याची विचारधारा नक्की कुणाच्या बाजूनं आहे या इतर बाबी, त्या माणसाच्या कर्तृत्वापेक्षा अतिशय महत्त्वाच्या असल्यानं, सरकारला कोणत्याही स्वरूपात फायद्याच्या नसलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या ऐतिहासिक वास्तू, वस्तू, खुणांना आपल्याकडे काहीही मोल नसतं; हेच आजवर सिद्ध होत आलेलं आहे.
मला शेक्सपीयरचं घर जास्तच आठवायला लागलं. इंग्लंडमध्ये खूप कमी गोष्टी फुकट बघायला मिळतात. कारण पर्यटन हा व्यवसाय म्हणून कसा असावा याचंच हे उदाहरण आहे. तिकिटाच्या रांगेत उभं राहिल्यावर बाजूला शेक्सपीयरचा अप्रतिम फोटो लावलेला आहे आणि काऊंटरवर ब्रॉशर्स ठेवलेली आहेत; ज्याच्यावरून आपल्याला आत नक्की काय पाहायला मिळणार आहे त्याची माहिती मिळते. आत जाण्यापासूनच वातावरणनिर्मिती अशी की, ते घर जतन करणारं सरकार आपल्याला जणू सांगतंय की, ‘‘बघा आमचा लेखक जागतिक स्तरावर किती महत्त्वाचा होता ते; बघा तो आम्हाला आणि जगाला किती महत्त्वाचा आहे ते; बघा आम्ही त्याच्यावर किती प्रेम करतो ते; आम्हाला कसा अभिमान आहे तो आमचा आहे ते.’’ तिथे काम करणाऱ्या सर्व लोकांच्या देहबोलीतून, बोलण्यातून, वागण्यातून हे सतत जाणवत असतं आणि ही बाब फक्त त्या एका लेखकाच्या घरापुरती मर्यादित नाही तर सर्व शास्त्रज्ञ, गड, किल्ले, राजमहालापर्यंत सगळ्याच जागी जाणवत राहते.

शेक्सपीयरच्या घरात आत गेल्यावर त्याचा तारीख-वारासह पूर्ण चित्रात्मक जीवनपट दिसतो. एका दालनात त्याच्या नाटकांचं, नाटकांवर आधारित चित्रपटांचं, जगभरच्या कलाकारांनी केलेल्या फिल्म्सचं स्क्रीिनग; तर दुसऱ्या दालनात त्याच्या नाटकाची उपलब्ध सर्व हस्तलिखितं, त्यामागच्या कथा; एका िभतीवर त्याच्या प्रत्येक नाटकाचा गíभतार्थ असलेल्या शिल्पमुद्रांचे नमुने. या सगळ्याची सजावट, रचनेचं डिझाइन, रंगसंगती आणि कमालीची स्वच्छता. प्रत्यक्ष स्वच्छता तर आहेच, पण विचारांची स्वच्छता अधिक. पुढे तुम्ही त्याच्या प्रत्यक्ष घरात कुतूहलानं प्रवेश करता त्या वेळी घराची माहिती सांगायला एक स्त्री उभी असते. आपल्यासारखं स्वतंत्र पसे ठरवून आपल्याला हवा तो गाइड वगरे नाही. म्हणजे जो गाइड मिळेल आणि तो सांगेल तो इतिहास मानून आपण ते ऐतिहासिक स्थळ स्मरणात ठेवणार. इथे व्यवस्थापनाचाच नेमलेला मार्गदर्शक. पण त्याला उभं करण्यामागेही त्यांचा अप्रतिम विचार दिसतो. हा मार्गदर्शक शेक्सपीयरच्या नाटकातल्या पात्रांसारखी वेशभूषा, केशभूषा करून उभा असतो. ते सगळं सांगण्यामागे एक आंतरिक तळमळ आणि माझ्यासारख्या नटाला सगळ्यात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे, ती सगळी माहिती उभं राहून शेक्सपीयरन अभिनयाच्या सादरीकरणासारखी ते देतात. त्या वेळचे कॉस्च्यूम्स, हातातल्या वस्तू, लेदरचे ग्लोव्ह्ज, टोप्या वगरे आणि माहितीही थोडीशी साभिनय, त्यामुळे क्षणार्धात तुम्हाला ते त्या काळात घेऊन जातात. घर आणि घरातल्या वस्तू तर अशा काही पद्धतीने जपून ठेवल्यात की, आपल्याला लाज वाटू लागते. वस्तू म्हणजे, अगदी स्वयंपाकघरातल्या वापरातली लाटणी, कप, चमचेसुद्धा. बेडरूममधले लाकडी दिवाण, मुलांचे पाळणे, माजघरातली तावदानं, फायर प्लेसेस, मच्छरदाण्या सगळं अगदी जसंच्या तसं अगदी पाचशे वर्षांपूर्वीचं. बाहेरच्या अंगणात तर आणखीन आश्चर्य. मध्यभागी वर्तुळाकार दीडफुटी उंचवटा आहे आणि त्यावर तिथं काम करणारे कलाकार शेक्सपीयरच्या नाटकातली स्वगतं सादर करतात. मी पाहिले तेव्हा तीन कलाकार होते. दोन स्त्रिया आणि एक पुरुष. ते आलटूनपालटून कधी टेिमग ऑफ द श्रू, कधी हॅम्लेट, कधी मॅकबेथ असं पर्यटकांच्या फर्माईशीने अगदी संगीतिका, कविताही सादर करत होते. म्हणजे ते ठिकाण बघायला जाणारा माणूस नाटक, साहित्यवेडा असणार हे लक्षात घेऊन ही किती विलक्षण आयडिया आहे त्या जागेची आणि सादरीकरणाची! म्हणजे तुम्ही शेक्सपीयरचं फक्त घर बघत नाही तर ते अनुभवता. त्याची कला समोर पाहता. सांगण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत.
इंग्लंडमधलं कॅसलचं वर्णन करणंच अशक्य आहे. ते व्यक्त करायला ही जागा निव्वळ अपुरी. पण होमी भाभांच्या घराच्या लिलावाच्या बातमीनंतर मी पाहिलेली ब्रिटिश सायन्स म्युझियममधलं जेम्स वॅटच्या घरातली त्याच्या कामाची खोली डोळ्यांसमोर उभी राहिली. प्रत्यक्ष वॅटचं घर कुठे होतं माहीत नाही. पण या म्युझियममधे जवळपास त्याची आख्खी खोलीच उचलून आणली असावी असं वाटत होतं. वॅटसारख्या शास्त्रज्ञाच्या पेन्सिली, पेनांपासून, त्याच्या निरीक्षण वह्य ते त्याच्या सगळ्या उपकरणांपर्यंत, खुर्ची टेबलापर्यंत, संपूर्णच्या संपूर्ण वस्तू जतन केल्या आहेत. आणि नुसत्या जतन नाही तर त्याची आख्खी खोलीच तशीच्या तशी उभी केली आहे. त्या वेळच्या प्रकाशयोजनेसह. आत पाऊल टाकताच १६व्या शतकात जातो आपण. बाहेरच्या बाजूला त्याने लावलेले शोध, त्याचे फसलेले शोध, त्यानं काढलेली चित्रं, शिल्प, मूर्ती बनवण्याच्या सर्व उपलब्ध डायपासून त्यानं केलेल्या गणिताच्या आकडेमोडीच्या कागदांपर्यंत, शेकडो आकृत्यांपर्यंत सर्व काही पाहायला मिळतं आणि सगळं पाचशे वर्षांपूर्वीचं.
आणि जरा आपल्याकडची परिस्थिती पाहा! एक शिवाजी महाराज हा मुद्दा घेऊन वर्षांनुवर्षे आपल्याकडे राजकारणाचा चोथा चालला आहे. खरंच राजकारण्यांना शिवाजीबद्दल प्रेम आहे का? शंभर कोटींचं स्मारक उभं करणार म्हणतंय सरकार. म्हणजे काय असणार आहे हे स्मारक म्हणजे? आणि शंभर कोटींचा नुसता भव्य पुतळा उभा करून काय होणार आहे? असलेल्या गडकिल्ल्यांची काय अवस्था आहे? महाराजांच्या ऐतिहासिक लढायांवर फुकटच्या मिशा पिळतो आपण. पण त्यांची कोणती ऐतिहासिक वस्तू जपून ठेवलीय आजवर? कोणता किल्ला बघण्यासारखा राहिलाय? काय संवर्धन केलंय आपण? एवढा अप्रतिम इतिहास आपला, एवढय़ा शौर्यकथा, गाथा, एवढे प्रसंग, ठिकाणं, त्यांचे तपशील नाटय़मय. ज्या काळाच्या कर्तृत्वावर छाती पुढे काढून फिरतो आजचा मराठा, काय बूज राखलीय या ऐतिहासिक वास्तूंची आजच्या मावळ्यांनी? पाऊस, वारा, नसíगक चक्रानं गुळगुळीत होऊन गेलेत सगळे किल्ले. सगळ्या खुणा पुसत चालल्यात. वस्तू तर एकही शिल्लक नाही. सगळं संपल्यात जमा आहे. जे काही शिल्लक आहे ते फक्त जिभेवर आहे. म्हणून जगाला नुसतं ओरडून सांगायचं, आमचे महाराज किती ग्रेट होते म्हणून. बाहेरच्या पर्यटकांना सोडा, आपल्या पुढच्या पिढय़ांना दाखवायलाही शिल्लक नाहीय काही. उद्या आपल्याच मुलांनी विचारलं, कशावरून किल्ला होता इथे? तर फक्त श्रद्धा एवढय़ाच गोष्टीवर सोपवावं लागणार आहे आपल्याला.
पण याच शंभर कोटींमध्ये विचार करा की, आपण सिंहगडावर चढतोय; गाडय़ांसाठी मार्ग असूच द्या, पण पर्यटनाची मजा म्हणून ज्यांना गड चढायचा आहे त्यांच्यासाठीचा पायी मार्ग, त्या मार्गातल्या खुणा, गडाच्या पायऱ्या, प्रत्येक टप्प्यावर मावळे स्वागत करतायेत; आत आल्यावर शिवकालीन शामियाने उभे आहेत, थकलेल्या पर्यटकांसाठी त्या काळच्या बठका आहेत, विकत घेऊनच- पण खायला झुणका, भाकरी, कांदा, गूळखोबरं आहे, समोर कुणी पोवाडा सादर करतोय, एखादा महत्त्वाचा प्रसंग सादर होतोय; प्रत्यक्ष कडय़ावरून तानाजी मालुसरे कसा चढला याचं प्रात्यक्षिक, उत्साही तरुणांना झलक म्हणून कडा चढण्याची संधी, घोरपड, घोरपडीची माहिती, मेणे, पालख्या, तटबंदींची सजावट, तलावारी, भाले, घोडे.. किती किती म्हणून करण्यासारख्या गोष्टी आहेत. उत्तम दर्जा राखला तर लोक तिकीट काढून का नाही येणार? परदेशी पर्यटक आणखी काय बघायला येतात मग? आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना किती स्वरूपातला रोजगार निर्माण होऊ शकतो. आणि प्रत्येक गडकिल्ल्यागणिक घटना वेगळ्या, त्यांचं महत्त्व वेगळं आणि प्रत्येक ठिकाणचं वैशिष्टय़ वेगळं. किती ठिकाणी रोजगाराची आणि पर्यायाने पर्यटनाची संधी!
पण अशा स्वरूपात टिकवायचे आहेत का आपल्याला शिवाजी? टिकवायचा आहे का आपल्याला इतिहास? आहे का आपल्याला नक्की प्रेम? प्रत्यक्ष ज्यांच्यामुळे स्वराज्याची स्थापना झाली त्या महाराजांबद्दलची ही अवस्था तिथं कुणाला वेळ आहे आपले जागतिक दर्जाचे कवी, लेखक, शास्त्रज्ञ, नाटककार, कलावंत यांच्या स्मृती जपण्याची?