विविध वाङ्मयप्रकारांत लेखन करणाऱ्या बी. जी. वाघ यांची दोन पुस्तके लवकरच प्रकाशित होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या लेखन कारकीर्दीचा घेतलेला परामर्ष..
बी. जी. वाघ हे एक संवेदनशील कवी आणि लेखक आहेत. अंगभूत क्रियाशीलता, प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि व्यासंगातील सातत्य यामुळे ते लौकिक आयुष्यात यशस्वी ठरले. विद्यार्थिदशेपासून केलेल्या ललित व वैचारिक लेखनामुळे त्यांच्या नावावर आज दहा पुस्तके आहेत. त्यांनी सर्व लेखनप्रकारांत साहित्यनिर्मिती केली असून कथा, कविता, कादंबरी, ललित मुक्तगद्य, वैचारिक लेखन, नाटक अशा प्रत्येक प्रकारात त्यांनी मुशाफिरी केली आहे.
वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी पहिली कथा आणि एकविसाव्या वर्षी ‘मृत्यू’ या विषयावर पहिली कादंबरी लिहिली. त्यांची पहिली ‘अधाशी’ ही कथा भुकेच्या प्रश्नाचे विविध पैलू उलगडून दाखवते. ‘एका स्वप्नाची सुरुवात’ ही त्यांची अन्य एक कादंबरी. तिचा नायक सूर्यधन हा कवी आहे. आजाराने त्रस्त. मृत्यूवर प्रेम करून, त्याचे चिंतन करून मृत्यू या शाश्वत सत्याचे विविध पैलू तो उलगडून दाखवतो. त्याची प्रेयसी डॉ. सुजाता सरदेशमुख ही त्याच्या दुर्धर आजारावर उपचार करणारी एक बुद्धिमान तरुणी. पण आयुष्यातील चांगल्या गोष्टींवरील विश्वास उडालेली. त्यामुळे मनाने उद्ध्वस्त. एक असाध्य आजाराने ग्रासलेला कवी आणि त्याची डॉक्टर प्रेयसी यांची हृदयंगम प्रेमकहाणी म्हणजे ही कादंबरी. डॉ. सुजाता पुरुषाविषयीच्या पूर्वग्रहदूषित वृत्तीपायी आधी सूर्यधनचा अतोनात छळ करते. परंतु प्रखर जीवननिष्ठा असलेला हा कलंदर कवी तिला बदलवतो आणि स्वत:ही बदलतो. दोघांच्या मनात एक नवे स्नेहल स्वप्न जागते. तरल, हळुवार, काव्यात्म भावकल्लोळाने व्याप्त अशी ही कादंबरी आहे. स्वानुभवाची व चिंतनाची आशयघन जोड या कादंबरीला लाभली आहे. कुठेही पारंपरिक न होता अनुभवांचा आणि मांडणीचा अंगभूत वेग घेऊन येणारी ही कादंबरी वाचकाला चांगलीच अंतर्मुख करते.
ललित साहित्याप्रमाणेच वाघ यांचे वैचारिक साहित्यही मोलाचे आहे. एका बाजूला थोरो, टॉलस्टॉय, इमर्सन यांचा प्रभाव, तर दुसऱ्या बाजूला पौराणिक तत्त्वज्ञानाशी निगडित भारतीय वाङ्मयीन परंपरांचा आणि गौतम बुद्ध, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले यांचा वैचारिक वारसा जगणारे त्यांचे लेखन आहे. ‘अंतरीचे धावे’ ही त्यांची डायरी ज्ञानपीठविजेते कवी-नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचे अतिशय आवडते पुस्तक होते. त्यांनी या पुस्तकासंदर्भात अभिप्राय व्यक्त करताना म्हटले आहे- ‘‘आपले पुस्तक वाचून मी थक्क झालो आहे. आपल्या लेखणीला थांबण्याचा अधिकार नाही. चिंतनशील आणि व्यासंगपूर्ण ललित लेखन करणाऱ्या आजच्या मराठी लेखकांत आपल्या लेखनाची नोंद वरच्या पातळीवर करावी लागेल.’’ तर त्यांच्या ‘अशांततेचे रंग’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कुसुमाग्रज म्हणतात- ‘‘वृत्ती दूरस्थतेची आणि जबाबदारी शासकीय अधिकारपदाची; त्यामुळे ते वाङ्मयीन वर्दळीपासून दूर असतात. पण त्यांचे साहित्य वाचत असताना आपण एका विलक्षण प्रतिभावंताच्या सहवासात आहोत, हा अनुभव चोखंदळ वाचकाला येतो. त्यांच्या तत्त्वशोधाला काव्यात्मतेचीही सुंदर जोड आहे. निसर्गाच्या विविध रूपांतून त्यांनी केलेले तत्त्वचिंतन नि:संशय श्रेष्ठ दर्जाचे आणि संस्कृतीच्या पायाभूत सूत्राशी बांधलेले आहे. मराठी लेखनाप्रमाणेच ‘मॅलीस टुवर्ड्स नन’ या त्यांच्या इंग्रजी लेखसंग्रहातही त्यांच्या सखोल चिंतनाचा आणि व्यापक व्यासंगाचा प्रत्यय येतो.
‘ताओ- एक नैसर्गिक जीवनप्रवाह’ आणि ‘स्वत:ला जाणा आणि ज्ञानी व्हा!’ तसेच ‘जगावे कसे?’ ही ताओ तत्त्वज्ञानावर आधारित बी. जी. वाघ यांची ग्रंथसंपदा आहे. ताओवादाला पूर्णत: आपल्या अंतरंगी घोळवून व रुजवून ही पुस्तकमालिका निर्माण झालेली आहे. ‘इतरांना समजून घेणे शहाणपण आहे, स्वत:ला समजून घेणे आत्मज्ञान आहे..’ या आशयसूत्राशी निगडित असे हे ताओ तत्त्वचिंतन आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संज्ञा खऱ्या अर्थाने प्रस्थापित करणारे तत्त्वज्ञान म्हणजे ताओ! ताओचा मूळ अर्थ आहे- प्रवाहाबरोबर जाणे. आपल्या अस्तित्वाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला निसर्गाशी एकरूप व्हावे लागेल.. त्याच्या प्रवाहाबरोबर जावे लागेल. ही संकल्पना या पुस्तकात मांडण्यात आली आहे. या तत्त्वज्ञानाचा उगम चीनमध्ये झालेला असला तरीही ते आपल्या ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या तत्त्वज्ञानाशी साधम्र्य सांगणारे आहे, हे वाचताना जाणवते. या पुस्तकातील विचारांचे मंथन करताना काही नवीन रत्ने हाती लागतात, तर काही जुनी नव्याने चमकतात. जीवनाचे अध्यात्म साध्या, सुरस भाषेत समजावून सांगणारे हे प्रभावी असे पुस्तक आहे.
‘वळणावरी नीलमोहोर एकला’ हे वाघ यांचे पुस्तक म्हणजे ललितरम्य आत्मसंवाद आहे. तुकारामांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ या अभंगातील आशयसूत्राशी निगडित भुईतून उगवून विस्तारशील होणाऱ्या आभाळमायेशी आहे. यातल्या प्रत्येक लेखाची सुरुवात निसर्गाच्या सान्निध्यातील संस्मरणीय सहवासातून होते आणि चिंतनाच्या पातळीवर विस्तार पावत समाजसंस्थेशी निगडित मानवी वृत्ती-प्रवृत्तींचा वेध घेत लेखकाच्या चिकित्सक मतप्रणालीशी थांबते. त्यातून त्यांचा व्यासंग आणि संवेदनशील सर्जनतेचा प्रत्यय येतो. ते चिंतनाद्वारे शासन, समाज आणि निसर्ग यांचा भेदक शैलीत वेध घेतात. मानवतावादी मूल्यांचा जयघोष आपल्या वैचारिकतेकडे झुकलेल्या ललित लेखनातून ते तन्मयतेने करतात.
आपल्या बहुतांशी वैचारिक आणि ललित लेखनातून वाघ यांनी निसर्ग आणि समाज, निसर्ग आणि शासन यांचे परस्परसंबंध अधोरेखित केले आहेत. मात्र, त्यासाठी केवळ चार भिंतींच्या आतले ग्रांथिक वाचन कारणीभूत नाही; तर त्यांच्या परिश्रमपूर्वक केलेल्या भ्रमंतीतील निष्कर्षांना सूक्ष्म निरीक्षणांचा आणि अनुभवांचा आधार आहे. त्यामुळेच दूरवरच्या डोंगरदऱ्यांत वसलेल्या आदिवासींपासून चंगळवादी महानगरीय जीवन जगणाऱ्या व्यक्ती-समूहाच्या मानसिकतेचा व्यामिश्र पट ते आपल्या शब्दकळेतून ते मांडू शकले आहेत. यानिमित्ताने भारतीय पुराणकथेपासून जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या विचारवंतांच्या विचारधारेचे जे संदर्भ येतात, तेही आपल्याला दिपवून टाकतात. वैचारिकतेची डूब आणि सौंदर्यानुभूतीच्या अभिव्यक्तीची कलात्मक वीण या लेखनाला प्राप्त झाल्याने ते संस्मरणीय आणि वाचनीय होते यात शंका नाही.
वाघ यांनी ‘विचारांच्या सावल्या’ या सदरातून चिंतनगर्भ लेखन केले आहे. तरुणवर्ग त्यांच्या या सदराने भारावून गेला होता. हे विचारधन लवकरच कॉन्टिनेन्टल प्रकाशनाकडून ‘चिंतनधारा’ या शीर्षकाने पुस्तकरूपाने उपलब्ध होत आहे.
आत्मसंवाद करताना अनेक समर्पक दृष्टान्त, उपमा, प्रतिमा, रूपके यांच्या माध्यमातून त्यांनी चिंतन केले आहे. कधी या चिंतनाला उमलत्या फुलांचं सौंदर्य प्राप्त होते, तर कधी वास्तवाची धग! इथली जातीयता, विषमता, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, धर्माधता, स्वार्थलोलुपता, माणसाने केलेल्या हत्या अशा वर्तमान समाजजीवनाला ग्रासणाऱ्या सगळ्या विरूपतेचं ते वर्णन करतात. त्याने संवेदनशील वाचक अस्वस्थ होतो. भुईवर वाढलेल्या झाडांचा विस्तार आपण वरच्या अंगाने मापू शकतो, पण वरच्या अंगाने महावृक्ष उभा करताना या भुईने आपल्या उदरात त्याच्या सर्वदूर घनघोर, विस्तारशील मुळांना आधार दिलेला असतो. तसाच वाघ यांच्या लेखनातील मुळांच्या आशयाचा विस्तार आपल्या काळजात होत जातो.
निसर्गचिंतनाकडून वैज्ञानिक सत्याकडे त्यांचा प्रवास सुरू आहे. सत्याच्या विविध रूपांगांविषयी त्यांनी जितके लिहिले आहे तितके मराठीत दुसऱ्या कुणीही लिहिले नसावे असे मला वाटते. वाघ यांचे ललित लेखनसुद्धा धर्म, तत्त्वज्ञान आणि अध्यात्माकडेच वळते. त्यांच्या लेखनातून आध्यात्मिकतेचे एक गूढ विश्व आपल्या भेटीस येते. सॉक्रेटिसपासून बटरड्र रसेलपर्यंतच्या विचारधारेचे त्यांनी जे चिंतन-मनन केले आहे, ते याकामी त्यांना दिशादर्शक ठरले आहे. म्हणूनच बी. जी. वाघ हे समकालीन लेखकांतील एक महत्त्वाचे व वैशिष्टय़पूर्ण लेखक ठरतात. त्यांच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे लवकरच प्रकाशित होणाऱ्या ‘चिंतनधारा’ या पुस्तकातूनही याची प्रचीती येईल.