उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोघांविरुद्ध सिंचन प्रकल्पांतील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल खुली चौकशी करण्याची परवानगी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने राज्य सरकारकडे मागितली आह़े त्यामुळे हे नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्टय़ा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
राज्यातील १२ सिंचन प्रकल्पांची कंत्राटे देताना पक्षपात करून या दोन नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. नियमांनुसार, एखादा कंत्राटदार किंवा संयुक्त उपक्रमातील कंपनीला जास्तीत जास्त तीन कंत्राटे देता येऊ शकतात. तथापि, गेल्या १० वर्षांच्या काळात या नियमांचे उल्लंघन करून एका विशिष्ट समूहातील कंपन्यांना तीनपेक्षा अधिक कंत्राटे देण्यात आली, असा वाटेगावकर यांचा आरोप आहे. या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. या चौकशीला सरकारकडून परवानगी मिळण्याची शक्यता कमी असली, तरी विरोधकांना या निमित्ताने एक मुद्दा मिळणार आहे.
आम्ही वाटेगावकर यांची तक्रार राज्य सरकारकडे पाठवली असून, पवार, तटकरे व शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध खुली चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे, असे एसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.