लोकसभेच्या यशामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजप-शिवसेनेत जागावाटपावरून घोळ सुरू असतानाच जास्त जागा मिळविण्यासाठी राष्ट्रवादीने दबावाचे राजकारण सुरू केले आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला नमते घेण्यास भाग पाडल्यावर विधानसभेसाठी जास्त जागा मिळाव्यात, अन्यथा स्वतंत्रपणे लढण्याचा पर्याय खुला असल्याचा इशाराच राष्ट्रवादीने शनिवारी काँग्रेसला दिला.
जागावाटपासाठी २००९चे सूत्र राष्ट्रवादीला मान्य नाही. जास्त जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी पक्षाची ठाम भूमिका असल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीने स्वंतत्रपणे लढावे, अशा पक्षात जोरदार मतप्रवाह आहे. आघाडी केल्यावर मिळतात तेवढय़ाच किंबहुना जास्त जागा स्वतंत्रपणे लढल्यास मिळू शकतात, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. आघाडी केल्याने राष्ट्रवादीच्या वाढीवर मर्यादा येतात, असा अनुभव राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आला आहे. आघाडीत जागावाटपाचा घोळ नेहमीच सुरू राहतो. काँग्रेसच्या नवी दिल्लीतील नेत्यांबरोबर चर्चेची पहिली फेरी पार पडली आहे. योग्य तोडगा निघाल्यास ठिक, अन्यथा राष्ट्रवादीपुढे स्वंतत्रपणे लढण्याचा पर्याय असल्याचे पटेल यांनी सूचित केले.  
२००४ मध्ये राष्ट्रवादीच्या वाटय़ाला १२४ जागा आल्या होत्या. तेवढय़ाच किंवा त्यापेक्षा दोन-तीन जागा जास्त देण्याची काँग्रेसची तयारी आहे. मात्र, चर्चेतूनच तोडगा निघू शकतो, असे पटेल यांचे म्हणणे होते. विधानसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिल, पण निकालानंतर भाजप-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात सत्तेत येईल, अशी चर्चा आहे.