कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांचे सत्र जोरात सुरू झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील आणि त्यांचे थोरले बंधू आमदार रमेश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्या बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप त्यांचे चुलत बंधू गणेश पाटील यांनी केला. ठाण्यात शिवसेनेच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला आहे. २४ तास.. २४ तासांत..असे बिरुद मिरविणारे राजू पाटील २४ तासांत सातबारा कोरा करण्यात वस्ताद असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला आहे.
रमेश आणि राजू या दोघांना व्यवहारज्ञान जास्त असल्याने त्यांच्यावर विसंबून होतो. मात्र, सात कोटी रुपये बाजारमूल्य असलेली काटई आणि धारवली गावांतील सहा एकर मालकीची जमीन त्यांनी बिल्डरला परस्पर विकली. तसेच दुसऱ्या जमिनीच्या तुकडय़ाचा व्यवहार केल्याचे सांगत ३० लाख रुपये दिले. यासंबंधी सविस्तर माहिती घेतल्यावर मालकीच्या सात एकर जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर बिल्डरचे नाव लागल्याची माहिती समोर आली, अशी माहिती गणेश पाटील यांनी दिली. ही जमीन विकताना आमच्या अन्य चुलत भावंडांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. तसेच बिल्डरकडून आलेली रक्कम आमच्या नावाने बोगस बँक खाते उघडून हडप केल्याचाही आरोप त्यांनी केला.या दोघांसोबत  सदानंद संते, महेश पाटील यांच्यासह अनेक शेतकरी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

कोणाचीही जमीन बळकावली नाही -प्रमोद पाटील
शेतकरी बचाव कृती समितीने केलेले सर्व आरोप फेटाळताना मनसे उमेदवार प्रमोद पाटील यांनी सांगितले, आम्ही कोणाच्याही जमिनी हडप केल्या नाहीत. शिवसेनेकडे विकासाचे मुद्दे राहिले नसल्याने आमच्या बदनामीचे षड्यंत्र  शेतकऱ्यांना हाताशी धरून रचले आहे. टक्केवारीच्या राजकारणात हयात गेलेले राजकारणी काही शेतकऱ्यांना हाताशी धरून बिनबुडाचे आरोप आमच्यावर करीत आहेत. मी कोणावरही गोळीबार केलेला नाही. कल्याणमध्ये विद्याधर भोईर हा नगरसेवक लाच घेताना सापडल्याने त्या विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेनेने केलेली ही खेळी आहे.