जागावाटपाच्या घोळावर पूर्ण मौन पाळून शिवसेनेने विधानसभा निवडणुकीची सेना स्टाईल तयारी सुरू केली असतानाच, भाजपमध्ये मात्र, अन्य पक्षांमधील नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्याच चर्चाचे गुऱ्हाळ कार्यकर्त्यांच्या घोळक्यात सुरू आहे. जागावाटपाचा तिढा कायम ठेवून भाजप व घटकपक्षांना झुलवत ठेवून वेळप्रसंगी सर्व जागा लढविण्यासाठीही तयारी करण्याची व्यूहरचना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
भाजपच्या काही नेत्यांनी स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केल्याने शिवसेनेनेही सर्व २८८ मतदारसंघात तयारी सुरू केली असून अनेक सभा व मेळावे घेतले जात आहेत. आमदार दीपक केसरकर, किशोर कान्हेरे, धवलसिंह मोहिते-पाटील, प्रताप चिखलीकर, डॉ. मोरे, सुभाष मयेकर अशा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांना शिवसेनेने पक्षात घेतले. त्यापैकी काहींनी भाजपचेही दरवाजे ठोठावले होते. मात्र कोणताही निर्णय न झाल्याने ते शिवसेनेत गेले.
मतदारसंघांच्या सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर पक्षप्रवेश सुरू करावेत, असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांचे मत आहे. तर त्याआधीच हे प्रवेश पूर्ण करावेत, अशी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची भूमिका आहे.
भाजपमध्ये जागावाटपाचा तिढा सुटण्याआधीच अनेकांनी तयारीही सुरू केली आहे. भाजपला तो मतदारसंघ मिळाला नाही किंवा भाजपकडच्या मतदारसंघात उमेदवारी मिळाली नाही, तर अपक्ष म्हणूनही निवडणूक लढविण्याची तयारी काही इच्छुकांनी सुरू केली आहे.
निवडणुका ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ाच्या दरम्यान होण्याची शक्यता असून तयारीसाठी केवळ ५०-५५ दिवस मिळणार आहेत. मात्र कोणत्या जागा भाजपला मिळणार आहेत, घटकपक्षांना कोणत्या जागा असतील, युती राहणार की नाही, अशा शंका भाजप नेते व कार्यकर्त्यांच्या मनात आहेत.