अलिबाग तालुक्यातील तीनवीरा येथे कोकणातील पहिला जैवविविधता प्रकल्प उभारण्यात आला आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीने रायगड जिल्हा परिषदेने हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. कोकणातील नसíगक अधिवासाचे जतन व्हावे हा या प्रकल्पामागचा उद्देश आहे. कोकणात रासायनिक प्रकल्प, खाण उद्योग आणि वाढते शहरीकरण यामुळे वनसंपदा धोक्यात आली आहे. बेसुमार वृक्षतोड आणि खोदकामांमुळे नसíगक साधनसंपत्तीचा ऱ्हास होत आहे. काळाच्या ओघात नामशेष होत जाणाऱ्या या प्रजातींच्या संवर्धनासाठी तीनवीरा धरणाजवळ हा जैवविविधता प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. शापुरजी पालनजी समूहाच्या सामाजिक दायित्वावर उपक्रमातून दोन एकर जागेवर साकारण्यात आलेल्या या प्रकल्पात तब्बल ६०० प्रजातींची सहा हजार झाडे लावण्यात आली आहेत. त्यात फुलझाडे, औषधी वनस्पती, भाजीपाला, फळझाडे यांचा समावेश आहे. एकूण १७ विभागांत झाडे लावण्यात आली असून वेगवेगळे प्राणी, पक्षी, कीटक यांच्यासाठी हे उद्यान म्हणजे हक्काचे घर ठरले आहे. पाण्याची बचत व्हावी यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला आहे. सौरऊर्जेवर चालणारी एलईडी दीपमाळ इथल्या पर्यावरणाचे सौंदर्य अधिक खुलवते. या प्रकल्पाला निसर्गाचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे या उद्यानात फुलपाखरांचा नसíगक अधिवास वाढावा यासाठी एका विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी विविध प्रकारची फुलझाडांची लागवड करून येथे फुलपाखरांना आकर्षति केले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सकाळ-संध्याकाळी या ठिकाणी फुलपाखरांची जत्रा भरलेली पाहायला मिळते. कोकणातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, आजची नवी पिढी निसर्गापासून दूर चालली आहे. त्यांना निसर्गाकडे वळविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. उद्यानाच्या उभारणीनंतर आता येथे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहलीदेखील आयोजित केल्या जाणार आहेत. लवकरच दृकश्राव्य माध्यमातून माहिती केंद्र सुरू करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा परिषदेचा हा उपक्रम निसर्ग आणि वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासकांसाठी चांगली संधी उपलब्ध करून देणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम अन्यत्र राबविल्यास पर्यावरणविषयक जनजागृती होण्यास फलदायी ठरेल.

कृषी पर्यटन प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषदेने सामाजिक संस्थांच्या मदतीने हा प्रकल्प उभारला आहे. आगामी काळात जिल्ह्य़ातील इतर भागांतही असे जैवविविधता प्रकल्प राबविण्याचा मानस आहे. पर्यावरण संवर्धन आणि पर्यटन यांचा मेळ घालणारे हे प्रकल्प पथदर्शी ठरतील.
– आस्वाद पाटील,,
प्रकल्प समन्वयक, रायगड जिल्हा परिषद.

काळाच्या ओघात कोकणातील अनेक वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या वनस्पतींचे येथील निसर्गात एक स्थान आहे. त्यांचे महत्त्व आहे, पण याची जाणिव नव्या पिढीला नाही, ही बाब लक्षात घेऊन हा आगळावेगळा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे.
– जरीना कमिसरीयत, प्रकल्पप्रमुख.
हर्षद कशाळकर – meharshad07@gmail.com