कर्ज पुनर्गठणासाठी बँका अडवणूक करीत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांचा संताप अनावर होत आहे. मंगळवारी याच संतापाचा सेलूमध्ये कडेलोट झाल्याचे पाहावयास मिळाले. राजवाडी येथील ३ शेतकऱ्यांनी सेलू येथे भारतीय स्टेट बँकेत वारंवार पाठपुरावा करूनही कर्ज पुनर्गठण न केल्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी व इतर नागरिकांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.
सध्या पीककर्ज वाटप व पुनर्गठण प्रक्रिया सुरू आहे. मात्र, दत्तक असणाऱ्या बँका शेतकऱ्यांना पुनर्गठणासाठी अडवणूक करीत आहेत. अनेक त्रुटी दाखवून शेतकऱ्यांना परतवून लावत असल्याचे प्रकार होऊ लागले आहेत. बँकेत चकरा मारूनही पुनर्गठण होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या बाबत वरिष्ठांकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकरी बँकेच्या विरोधात संताप व्यक्त करीत आहेत.
स्टेट बँक सेलू शाखेला राजवाडी गाव दत्तक असल्याने गावातील सर्व शेतकऱ्यांची याच बँकेवर भिस्त आहे. राजवाडी येथील शेतकरी नंदकिशोर जैस्वाल यांना २ लाख १० हजार, संजय शेवाळे २ लाख, राजकिशोर जैस्वाल ३ लाख, बंकटलाल जैस्वाल २ लाख ८० हजार, भास्कर शेवाळे ५४ हजार अशा ५ शेतकऱ्यांनी कर्जाचे पुनर्गठण प्रस्ताव दाखल केले होते. यातील शेवाळे यांचे ५४ हजार रुपये मंजूर असूनही त्यांना मिळाले नाहीत. तसेच उर्वरित शेतकऱ्यांनाही रक्कम देण्यास बँकेचे व्यवस्थापक टाळाटाळ करीत आहे.
या पाचही शेतकऱ्यांनी सेलूचे तहसीलदार आसाराम छडीदार यांना बँकेकडून होत असलेल्या विलंबाची माहिती दिली होती. त्यानुसार तहसीलदारांनी बँकेस संबंधित शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत सांगितले होते. मात्र, बँकेने यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे मंगळवारी राजकिशोर जैस्वाल (३५), भास्कर शेवाळे (४५), संजय शेवाळे (४०) या तीन शेतकऱ्यांनी बँकेत धाव घेतली. तेव्हा शाखाधिकारी अरुणकुमार चौधरी गरहजर असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु या वेळी बँकेत उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अशोक काकडे, अॅड. रामेश्वर शेवाळे, गुलाब पौळ, पंजाब पौळ, बापू डख, विठ्ठल कोकड, पोलीस निरीक्षक एस. पी. सिरसाठ यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.