जिल्ह्य़ात आतापर्यंत सरासरी १४३ मिमी म्हणजे अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ४७ टक्केच पाऊस झाला आहे. जवळपास महिनाभराच्या खंडानंतर जिल्ह्य़ाच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. परंतु ती समाधानकारक नव्हती. काही भागात झालेला पावसाचा शिडकावा खरीप पिकांसाठी फारसा उपयुक्त नसून, सध्या पेरणी झालेल्यापैकी जवळपास निम्मे पीक पूर्णपणे धोक्यात आले आहे.
जिल्ह्य़ाचे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ६१ हजार हेक्टर आहे. पैकी जवळपास ८० हजार हेक्टरमध्ये पेरणीच झाली नाही. जवळपास ३० ते ४० टक्के क्षेत्रातील पिकांची वखरणी झाली असल्याचा अंदाज कृषी अधिकाऱ्याने व्यक्त केला. जिल्ह्य़ात २८ हजारपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर मूग, तर जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्रावर उडदाच्या पेरण्या झाल्या आहेत. १२ हजार हेक्टर क्षेत्र बाजरीखाली आहे. सोयाबीन, मूग, उडीद व बाजरी ही पिके आता पूर्ण धोक्यात आहेत. हलक्या रानातील ही पिके वखरणी करण्याकडे शेतक ऱ्यांचा कल आहे.
अलीकडच्या काळात सोयाबीनकडे शेतक ऱ्यांचा कल वाढला असून हलक्या जमिनीतही हे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जात आहे. परंतु कमी पावसाचा मोठा फटका या पिकास बसत आहे. जवळपास ४६ हजार हेक्टरवरील मका पीकही अडचणीत आहे. जिल्ह्य़ात या वर्षी ३ लाखपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पीक घेतले जाईल, असा कृषी विभागाचा अंदाज होता. प्रत्यक्षात कमी पावसामुळे २ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रच या पिकाखाली असून यातील ४० टक्के जमीन हलक्या स्वरूपाची आहे. या जमिनीतील पिके अडचणीत आहेत. दुबार पेरणी करायची, तर त्यासाठी पाऊसही नसल्याने शेतक ऱ्यांची चिंता वाढली आहे. आभाळ भरून येते. परंतु पाऊस पडत नाही, असे चित्र मागील आठवडाभरापासून जिल्ह्य़ात आहे.
जिल्ह्य़ात आतापर्यंत तालुकानिहाय झालेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे, कंसातील आकडे संबंधित तालुक्यातील आतापर्यंतच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत टक्केवारीचे : जालना १४३ (४५), बदनापूर १४६ (४१), मंठा १६६ (५६), जाफराबाद ११६ (४०), भोकरदन १९० (५८), परतूर १६४ (५४), अंबड १३३ (४६), घनसावंगी ९५ (३५).