सरत्या वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात लाच घेताना प्रशासकीय सेवेतील तब्बल ५३ अधिकारी, कर्मचारी जेरबंद झाले. लाचखोरीत पोलीस विभागच आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. पोलीस निरीक्षकासह तब्बल १३ कर्मचारी अडकले तर महसूल व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी लाचखोरीत बरोबरी साधली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात चाळीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले. यात पोलिसांची संख्या सर्वाधिक आहे. पोलीस निरीक्षक चांगदेव तांबडे, साहेबराव नरवाडे यांच्यासह तब्बल १३ पोलीस कर्मचारी लाच घेताना पकडले गेले. महसूल विभागात सुहास कट्टे या मंडळ अधिकाऱ्यासह तब्बल १० कर्मचारी अडकले. यात बहुतांश तलाठी आणि लिपीक या पदावर कार्यरत होते. जिल्हा परिषदही लाचखोरीत मागे नसल्याचे दिसून आले. जिल्हा आरोग्य अधिकारी गोवर्धन डोईफोडे, प्रभारी समाजकल्याण अधिकारी सच्चिदानंद बांगर यांच्यासह १० कर्मचारी अडकल्याने महसूल व जिल्हा परिषदेने लाचखोरीत बरोबरी साधली. त्यानंतर यावेळी पहिल्यांदाच सहाय्यक सरकारी वकील शेख मोहम्मद अस्लम रहेमशामियाँ यांना आष्टी येथे लाच घेताना पकडण्यात आले. तर राज्य उत्पादन शुल्क विभागातील कार्यालयीन अधीक्षक शौकतजहाँ महेमुद अलीखाँ पठाण आणि  सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक दादासाहेब मोरे तर कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी शिरीष भारती यांना तब्बल १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर यांनी या कारवाया यशस्वी केल्या.