दिवाळीच्या निमित्ताने दारोदारी जाऊन मंगलवाद्य वाजवून पोट भरण्यासाठी आंध्र प्रदेशातील वाजंत्री मोठय़ा प्रमाणावर लातुरात दाखल झाले आहेत.
दिवाळीचा सण हा मांगल्याचा, पावित्र्याचा, आनंदाचा म्हणून परिचित आहे. समाजातील सर्व स्तरात हा सण आपापल्या कुवतीनुसार साजरा केला जातो. लक्ष्मीपूजन या दिवसाला अतिशय महत्त्व असते. घरोघरी व व्यापारी प्रतिष्ठानात अतिशय थाटामाटात पूजा केली जाते. पूजेप्रसंगी मंगलवाद्य वाजवण्याची प्रथा आहे. लग्नसमारंभात बँड, बेंझो वाजवणारा मोठा वर्ग तयार झाला आहे. मात्र पारंपरिक वाद्य वाजवणारी मंडळी कमी झाली आहेत. नेमकी ही गरज लक्षात घेऊन आंध्र प्रदेशातल्या विविध भागातील पारंपरिक वाद्य वाजवण्याची कला जोपासणारी मंडळी गेल्या काही वर्षांपासून लातुरात येतात. या वर्षीही दिवाळीच्या पूर्वसंध्येला ते दाखल झाले. सकाळच्या वेळी शहरातील विविध भागात वाद्य वाजवत एक -एकटी माणसे फिरतात. ज्या ठिकाणी त्यांच्या कलेचा आदर केला जातो, त्या ठिकाणी ते एकत्रितपणे आपली कला सादर करतात. लातूरमध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो. आपुलकीची वागणूक मिळत असल्याचेही आदिलाबाद जिल्हय़ातून आलेल्या व्यंकय्या रेड्डी यांनी सांगितले.