ठाणे जिल्हा विभाजनाची घोषणा होण्याची तारीख लांबवीत चालविल्यामुळे व या जिल्हा विभाजनाच्या महत्त्वाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते वेगवेगळी भूमिका मांडून जिल्हा विभाजनाच्या प्रश्नात खोडा घालत असल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी वाडा तहसील कार्यालयासमोर काँग्रेस, भाजपा, शिवसेना, कुणबी सेना, मनसे व अन्य कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.
ठाणे जिल्ह्य़ाचा भौगोलिक विस्तार प्रचंड असून या जिल्ह्य़ाची लोकसंख्या एक कोटीपेक्षा जास्त झाली आहे. येथील रस्ते, वीज, पाणी, रोजगार, कुपोषण, बालमृत्यू, शिक्षण यासारख्या समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चालल्या आहेत. दुर्गम व आदिवासी भागाच्या विकासासाठी ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन ही काळाची गरज निर्माण झाली आहे. या जिल्ह्य़ाच्या विभाजनाबाबत शासनानेही सकारात्मक भूमिका घेतली असताना काही स्वार्थी राजकारणी या जिल्हा विभाजनाला सातत्याने खोडा घालत असल्याचा आरोप जिल्हा विभाजन कृती समितीच्या वाडा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या जिल्ह्य़ाचे दोन जिल्हे करण्याची भूमिका घेतली असताना पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रथम विभाजन व नंतर चौभाजन करण्याची मागणी केली. वाडा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर विभाजनानंतर वाडा तालुका ठाणे जिल्ह्य़ातच ठेवावा अशी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी नेते व कार्यकर्ते सातत्याने नवनवीन मुद्दे पुढे करून जिल्हा विभाजनाच्या प्रश्नात खोडा घालत असल्याचा आरोप जिल्हा विभाजन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या धरणे आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे.
जिल्हा विभाजनाच्या प्रश्नावर कोणतेही राजकारण न करता या जिल्ह्य़ाचे तातडीने विभाजन करून जिल्हा मुख्यालय मध्यवर्ती ठिकाणी करावे, अशी मागणी वाडा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, कुणबी सेनेचे जिल्हा संघटक प्रफुल्ल पाटील, जिल्हा विभाजन कृती समितीचे निमंत्रक वैभव पालवे, कुंदन पाटील यांनी केली आहे.