पाचगणी रायटर्स र्रिटीट व संजीवन विद्यालय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पाचगणीत शिक्षणाशिवाय नवीन पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. गुरुवार (दि. २९) पर्यत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत माहिती सांगताना संजीवन विद्यालय ट्रस्टच्या अध्यक्षा शशीताई ठकार म्हणाल्या,की पाचगणी हे पर्यटन आणि शिक्षणाचे केंद्र आहे.पाचगणीतील शिक्षणाने समाजाला उद्योगपती, प्रशासकीय अधिकारी, राजकीय क्षेत्रातील जाणकार, अनेक क्षेत्रातील कार्यकत्रे दिले. तसेच नृत्य, नाटय, लेखन, योग, कविता आदी क्षेत्रातील साधना करण्याची संधी दिली. पाचगणीत संजीवन ट्रस्टमध्ये वसंतराव कानिटकर, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, व्यंकटेश माडगूळकर आदींनी अनेक दिवस येथे राहून लेखन साधना केली. पाचगणीचा सुंदर टेकडयांचा प्रदेश नेहमीच नावीन्याला खुणावत असतो. आता पाचगणी रायटर्स र्रिटट आणि संजीवन विद्यालय एकत्र येऊन जगभरातील लेखक, कवी, गायक, योग साधक, नृत्य, नाटक आणि इतर क्षेत्रातील मान्यवर आणि पाचगणीत पर्यटनाच्या माध्यमातून जगभरातून येणारे त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, ज्या द्वारे ज्ञानाचे आदानप्रदान होईल. या उपक्रमात सर्व भाषिकांना, कलाकारांना सामावून घेण्यात येणार आहे.

पाचगणीत जगभरातून विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर पर्यटक येतात. या सवार्ंच्या ज्ञानाचा, बुध्दीचा उपयोग करुन सर्वाना अनुकूल वातावरण उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे.बहुधा असा प्रयत्न भारतात प्रथमच होत आहे. अशा क्रियाशीलतेसाठी पाचगणीचा विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या  पाचगणीत अमेरिका, इंग्लंड आणि देशातील विविध प्रांतांतील अनेक मान्यवर लेखक संजीवन ट्रस्ट परिसरात वास्तव्यास आहेत. त्या अनुषंगाने विविध क्षेत्रांतील कलाकारांना, सर्व भाषिक लेखकांना, कवींना नव्याने व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे शशिताई ठकार यांनी सांगितले. या वेळी शबनम सॅम्युअल, नगरसेवक प्रवीण बोधे, रवींद्र देशमुख, अनघा देवी आदी मान्यवर उपस्थित होते.