दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्रप्रकरणी सोमवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे याप्रकरणात साक्ष देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत सुनावणीदरम्यान उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्रावरुन वाद सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या इच्छापत्राला आव्हान दिले आहे. त्यांनी उलटतपासणीदरम्यान बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा घेत उद्धव यांनी हे इच्छापत्र आपल्याला हवे तसे तयार केल्याचा आरोप केला होता. सुनावणी दरम्यान जयदेव यांनी मालमत्तेवरुन ठाकरे कुटुंबीयातील वादही समोर आणला होता. सामना या वृत्तपत्रातून बाळासाहेब आणि आपले नातेसंबंध किती जिव्हाळ्याचे होते याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाल्याचा दावा त्यांनी केला होता. यासंदर्भात वृत्तपत्राचे संपादक किंवा कार्यकारी संपादकांना साक्षीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्याची मागणी जयदेव यांनी केली होती. त्यांची मागणी मान्य करत हायकोर्टाने सामनाचे संपादक उद्धव ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांना समन्स बजावले होते.

गेल्या दोन सुनावणी दरम्यान संजय राऊत न्यायालयात साक्ष नोंदवण्यासाठी आले नव्हते. अखेर हायकोर्टाने राऊत यांना चपराक लगावली होती. साक्ष देण्यासाठी नाही आले तर त्यांना आणावे लागेल असा इशाराच हायकोर्टाने दिला होता.  शेवटी सोमवारी संजय राऊत साक्ष देण्यासाठी हायकोर्टात हजर झाले. त्यांनी काय साक्ष दिली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

बाळासाहेबांचे इच्छापत्र प्रमाणित करून घेण्यासाठी अनिल परब यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर जयदेव ठाकरे यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर मृत्युपत्राबाबत न्या. गौतम पटेल यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत इच्छापत्रावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करणारे डॉ. जलील परकार, शिवसेना नेते अनिल परब यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. जयदेव यांनी याप्रकरणात ३४ जणांची यादी दिली आहे. या सर्वांची उलटतपासणी घेण्याची त्यांची मागणी आहे.