पुरस्कारप्राप्त काकडधरा समस्याग्रस्त; मूलभूत प्रश्नांकडेच दुर्लक्ष

‘गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं’ या पैलूने पूर्णार्थाने नव्हे, पण तसाच अनुभव काकडधरा हे गाव घेत असल्याचे चित्र पुढे आले आहे. पाणी फाऊंडेशनच्या स्पध्रेत ५० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार मिळवीत अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे हे काकडधरा गाव विविध समस्यांनी त्रस्त आहे. गावातील बाळंतिणीला तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत असेल तर हा पुरस्कार काय कामाचा, असा प्रश्न कोणत्याही सुबुद्धास पडावा. मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते गावकऱ्यांना हा पुरस्कार स्वीकारण्यास नेणाऱ्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ मंडळींनी या मूलभूत प्रश्नांकडे डोळेझाक केल्याचे उद्गार आता निघत आहेत.

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका

गांधीवादी जाजू परिवारातर्फे दरवर्षी तपोधन श्रीकृष्णदासजी जाजू स्मृती समारोहात निरलसपणे सेवाभावी कार्य करणाऱ्यांचा सार्वजनिक गौरव केला जातो. या वर्षी जलसंवर्धनाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या काकडधरा ग्रामसभेचा व त्यामागची प्रेरणा असणाऱ्या मधुकर खडसे यांचा गौरव करण्यात आला. त्यापूर्वी निवडक पत्रकारांशी डॉ. उल्हास व डॉ. सुहास जाजू यांनी खडसे व सहकाऱ्यांचा संवाद घडवून आणला.

या चर्चेत काकडधऱ्याचे विदारक चित्र गावकऱ्यांच्याच मुखातून बाहेर पडले. भूदान चळवळीस प्रतिसाद म्हणून मोरे कुटुंबीयांनी दिलेल्या १०० एकर जमिनीवर हे गाव वसले. १०० टक्के कोलाम समूहाची वस्ती राहणाऱ्या या गावास सेवेचा पहिला स्पर्श मधुकर खडसे व त्यांच्या ‘असेफा’ या संघटनेने दिला. त्यावेळी ९० टक्के लोक दारूच्या आहारी होते. सावकारी पाश, अंधश्रद्धा याचा गावाला विळखा पडलेला. त्यातच पाण्याची टंचाई. या पाश्र्वभूमीवर ग्रामसभा घेण्याचे ठरले. प्रथम पाणीटंचाई निवारणाचे कार्य घेण्यात आले. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थबकायला लावा, थबकलेल्या थेंबास जिरायला लावा, असा मंत्र खडसेंनी गावाला दिला. सुपीक मातीचा थर पावसाने रखडला तर पुन्हा निर्माण होणार नाही, म्हणून ‘माती अडवा’ हे शिकविण्यात आले. ढाळीचे बांध बांधले गेले. गावकऱ्यांचे हात कामाला लागले. वर्षभरात गाव टंचाईमुक्त झाले. शासनाचा एक पैसाही न घेता आदिवासींनी ही किमया श्रमदानातून साकारली. ९८ टक्के जमिनीवर बांध-बंदिस्ती झाल्याने शेती बहरू लागली. पण पुढे २०१३ च्या जोरदार वृष्टीत काम मातीमोल झाले. त्यामुळे नव्याने कामाला सुरुवात करावी लागल्याचे माजी सरपंच बेबीताई कुरझडकर सांगतात.

गावात मूलभूत कामे झाली आहेत. केवळ त्याची पुनर्बाधणी व खोलीकरण आवश्यक असल्याचे ‘वॉटर कप’ स्पध्रेनिमित्त दिसून आले. गावाची निवड झाली. ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कामाला लागले. पुढे पुरस्कार वगैरे सगळे झगमगाटात झाले. पण गावाचे काय, या प्रश्नाचे उत्तर कोणीही शोधले नाही. धक्कादायी बाब म्हणजे तीन महिने लोटूनही पुरस्काराची ५० लाख रुपयांची रक्कम अद्याप गावाला मिळाली नाही. ग्रामसभेचे खाते नसल्याचे कारण यावेळी देण्यात आले. पण खाते काढण्याचे मार्गदर्शन का केले गेले नाही, याचे उत्तर स्पर्धा संयोजक मंदार देशपांडे देऊ शकले नाहीत.

कधी काळी गावातील कामाचे स्वरूप विख्यात उद्योगपती रतन टाटा हे कुतूहलापोटी पाहून गेले. पण, याच गावाला तीन दशके लोटूनही पक्की सडक मिळाली नाही. पुरस्कारच्या वेळी गावाचा उदोउदो झाला, तेव्हा या समस्या का मांडल्या नाहीत, या प्रश्नावर ग्रामसभेचे अध्यक्ष नामदेवराव गुंडेवार म्हणाले, रस्त्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण अद्याप कामाचा पत्ता नाही. केवळ ‘छायाचित्रापुरतेच’ गावाचे नाव झाल. एकाही राजकीय नेत्याने या गावाकडे कधी ढुंकूनही पाहिले नाही. एकाही आमदार खासदाराने त्यांचा निधी गावासाठी दिला नाही. दोन वर्षांपूर्वी पाचवा वर्ग सुरू झाला. त्यानंतरचे शिक्षण तीन किलोमीटरची पायपीट करीत घ्यावे लागते. उच्च शिक्षणासाठी आर्वीखेरीच पर्याय नाही. अडीच किलोमीटरवर आरोग्य केंद्र आहे. तिथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. परिणामी हेलपाटे घालत रुग्णाला दाखल करण्याची आपत्ती आहे. जलसंवर्धनाची प्रयोगशाळा व पुढे आदर्श ठरलेल्या काकडधऱ्यावर विकासाची सावली पडलीच नाही. सर्वच शेतकरी आहे. पण त्यावर भागत नसल्याने प्रत्येकालाच मजुरी कामे करावी लागतात. कारण पूरक धंदय़ासाठी कुणीही मदत केली नाही. शिकून सवरून मोठा झालेला युवक गावाने पाहिलाच नाही. तशी प्रेरणा देणारे नव्हतेच. प्रफुल्ल दाभेकर, घनश्याम भिमटे, चंद्रशेखर सयाम, दर्शन टेकाम ही युवक मंडळी म्हणतात, पुरस्कार मिळाला. पण शिक्षण, आरोग्य, रस्ते याविषयी एकाही मान्यवराने शब्द सुध्दा काढला नाही. पाणी हीच एकमेव समस्या असते काय, असा त्यांचा प्रश्न आहे.

गावात ‘गंगा’ आणणारे ‘भगीरथ’ मधुकर खडसे हे वयोवृद्ध झाले आहेत. मध्यस्थामार्फत ते संवाद साधतात. जलसंवर्धनाचे खरे श्रेय त्यांचे. पण तीन दशके या गावाची मशागत करणाऱ्या खडसेंना पुरस्कार मिळाल्यावरच गावाचा स्पध्रेत सहभाग असल्याचे कळले. पण त्याची खंत ते व्यक्त करीत नाही. हसण्यावर नेतात. ‘इव्हेंट मॅनेजमेंट’अंतर्गत गाव झळाळून निघाले. पण गावात विकासवाटेची रुजवात करणारे पडद्याआडच आहे. पुरस्कार स्वीकारणारे गर्तेत तर संपूर्ण गाव विकास वंचित असल्याचे चित्र चर्चेतून पुढे येते. गावातील शिक्षक विकास वाटकर हेच गावकऱ्यांसाठी आशेचा किरण आहेत. तीन वेळा बदली होऊनही त्यांनी याच आदिवासी गावात काम करण्याचा मानस ठेवत बदली रद्द करवून घेतली. किमान पाचवीपर्यंत तरी मुले शाळा वंचित राहू नये याची काळजी ते वाहतात. पुढचे मात्र काही खरे नाही. रोपवाटिका, बालवाडी, सामूहिक विवाह या प्रेरणा गावकऱ्यांनी स्वकष्टातून जिवंत ठेवल्या आहेत. सर्वच गावकरी, शेतकरी, पण गावात एकही आत्महत्या घडली नाही. आम्ही हिंमतबाज आहोत, असा त्यांचा सूर असतो. पुरस्काराची रक्कमच मिळाली नाही, मग त्यातून काय करावे हे ठरणार कसे? हा प्रश्न आहेच.