राज्यात लक्षवेधी ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. भाजप उमेदवार गोपीनाथ मुंडे यांनी नाथ्रा येथे सकाळी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला, तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील जामगाव येथे मतदान केले. मतदारांचा उत्साह आणि प्रेम यामुळे आपल्याला ऐतिहासिक विजय मिळेल, असा दावा दोन्ही उमेदवारांनी केला.
सकाळी सर्वच मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर मतदारांची संख्या रोडावली. दुपारी एकपर्यंत ४० टक्के मतदान झाले होते. मुंडे यांनी सकाळी नऊच्या सुमारास सहकुटुंब नाथ्रा येथील जि. प. शाळेतील केंद्रावर मतदान केले. राष्ट्रवादीचे उमेदवार धस यांनी जामगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सहकुटुंब नवगण राजुरी, तर राष्ट्रवादीचे नेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनीही सकाळी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, बदामराव पंडित यांच्यासह जिल्हय़ातील सर्वच दिग्गजांनी आपापल्या गावात मतदानाचा हक्क बजावला.