शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ वादाच्या भोवऱ्यात; तालुक्यात अनेक ठिकाणी बंद व आंदोलने
शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे नवनिर्वाचीत विश्वस्त मंडळ चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्याच स्थानिक कार्यकर्त्यांनी या विश्वस्त मंडळावर जाहीर आक्षेप घेत घरचा आहेर दिला आहे तर, उपाध्यपद न मिळाल्याने शिवसेनेच्या विश्वस्तांनी संस्थानच्या कारभारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे स्थानिक आमदार तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनाही या विश्वस्त मंडळात डावलल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही संताप व्यक्त केला आहे. या विश्वस्त मंडळाचा निषेध करीत परिसरातील अनेक गावांमध्ये शनिवारी विविध स्वरूपाची आंदोलने झाली. रविवारी सर्वच गावांमध्ये बंद पाळण्याचा इशारा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
शिवसेनेला उपाध्यक्षपद न दिल्याने एकीकडे सेना नाराज आहे तर शिवसेनेतील स्थानिक एकाही पदाधिकाऱ्याला विश्वस्त मंडळात संधी न दिल्याने हे कार्यकर्तेही आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. या विश्वस्त मंडळात जिल्ह्य़ातील चौघांना संधी दिली असली तरी निष्ठावानांना डावलल्याने भाजपचे स्थानिक कार्यकर्ते नाराज आहेत. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी शिवाजी गोंदकर, राजेंद्र गोंदकर, नितीन कापसे यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, बिपीन कोल्हे या तिघांच्या निवडीवर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी आक्षेप घेऊन पक्षात आयात केलेल्या व हुजरेगिरी करणाऱ्यांना स्थान दिल्याचा आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पदसिध्द विश्वस्त म्हणून न घेतल्याने त्यांचे कार्यकर्ते सरकारचा सर्व स्तरातून निषेध करत आहेत. शनिवारी शिर्डी, लोणी, कोल्हार, बाभळेश्वर, निमगांव जाळी, अस्तगाव आदी गावांसह तालुक्यात अनेक गावात बंद पाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिर्डीत साई मंदिरासमोर तासभर नगर-मनमाड राज्यमार्ग अडवला.
सायंकाळी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी साईबाबा व जनतेच्या आशिर्वादाने संस्थानच्या विश्वस्तपदापेक्षा मोठे पद आपल्याला मिळाले आहे, असे सांगितले. या विश्वस्त मंडळात आपल्याला डावलल्याचा त्यांनी इन्कार केला. आपल्याला त्यात रस नाही, या राज्य सरकारकडून विश्वस्तपदाची अपेक्षाही आपण ठेवली नव्हती, असे ते म्हणाले. तसेच साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ पदाचा गैरवापर करणार असतील तर आपण ते खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. कार्यकर्त्यांनी संयम ठेवून भावनांना आवर घालावा व साईबाबांच्या ‘श्रध्दा व सबुरी’चे अनुकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.