भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांना दुसऱ्यांदा संधी देण्यासाठी राज्यभरातील सर्वच भाजप नेत्यांनी अनुकूलता दर्शवली असून, या महिन्याच्या शेवटी मुंबईत होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत या फेरनिवडीवर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या घडामोडींमुळे सलग दुसऱ्यांदा प्रदेश भाजपचे नेतृत्व विदर्भाकडे राहणार आहे.
 बल्लारपूरचे आमदार असलेले सुधीर मुनगंटीवार गेल्या तीन वर्षांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यकाळसुद्धा पूर्ण झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पक्षाची राज्यातील धुरा कुणाकडे सोपवायची, यावर अंतर्गत वर्तुळात बराच खल सुरू होता. मुनगंटीवारांनी सलग दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्षपद सांभाळावे अशी अनेकांची भावना होती. प्रारंभी मुनगंटीवार यासाठी तयार नव्हते. राज्याचा व्याप सांभाळताना मतदारसंघाकडे दुर्लक्ष होते असे मुनगंटीवारांचे मत होते. अखेर यावर सर्वाचे मत जाणून घेण्यासाठी पक्षाचे राज्याचे प्रभारी व्ही. सतीश व राष्ट्रीय नेते व्यंकय्या नायडू यांनी गेल्या एक महिन्यापासून राज्यातील नेत्यांशी चर्चा सुरू केली होती.
राज्याच्या राजकारणाचा विचार करता पक्षात खासदार गोपीनाथ मुंडे व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी अशा दोन शक्ती गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. मुनगंटीवार हे गडकरी समर्थक म्हणून सध्या ओळखले जातात.
 त्यांची पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली तेव्हा मुंडे व गडकरी या दोन्हींच्या गोटातून त्यांच्या नावाला पसंती मिळाली होती. नंतर या पदावर काम करताना मुनगंटीवारांनी हा समतोल बिघडू दिला नव्हता. त्यामुळे यावेळी गोपीनाथ मुंडे नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.
व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही मुनगंटीवार यांच्या नावाला पसंती दिली. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मुंडे हेच पक्षाचे राज्यातील नेते राहणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर मुंडे यांच्यासह विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांनीही मुनगंटीवारांनीच दुसऱ्यांदा पक्षाचे नेतृत्व करावे, असे मत पक्षाच्या प्रभारींकडे व्यक्त केले. त्यामुळे आता मुनगंटीवारांच्या फेरनिवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या २४ व २५ जानेवारीला प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत आयोजित केली जाणार आहे. त्याआधी प्रदेशाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. मुनगंटीवार यांचा एकच अर्ज सादर होणार असल्याने कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्या अविरोध निवडीवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर फेब्रुवारीत मुंबई किंवा पुण्यात पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले जाणार असून, या अधिवेशनात मुनगंटीवार आपल्या दुसऱ्या डावाचा प्रारंभ करतील, असे आज पक्षाच्या गोटातून सांगण्यात आले. मुनगंटीवार यांनी गेल्या तीन वर्षांत गटबाजीला थारा न देता सर्वाना सोबत घेऊन काम केले. त्यामुळे त्यांनाच दुसऱ्यांदा संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पक्षातील एका नेत्याने दिली.