जिल्ह्य़ातील पाच मतदारसंघात ७७ उमेदवार मैदानात उतरले आहेत. १७७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर १०० जणांनी अर्ज मागे घेतले. सर्वच मतदारसंघांत पंचरंगी लढती होत आहेत.
जालना (१७), परतूर (१२), घनसावंगी (१४), बदनापूर (१५) व भोकरदन (१९) या प्रमाणे उमेदवार रिंगणात आहेत. जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर (शिवसेना), अरविंद चव्हाण (भाजप), कैलास गोरंटय़ाल (काँग्रेस), रवींद्र राऊत (मनसे), अब्दुल रशीद (बसप), खुशालसिंग ठाकूर (राष्ट्रवादी) आदी उमेदवार आहेत. घनसावंगीत राजेश टोपे (राष्ट्रवादी), विलास खरात (भाजप), हिकमत उढाण (शिवसेना), सुनील आर्दड (मनसे), संजय लाखे-पाटील (काँग्रेस), परतूरमध्ये सुरेशकुमार जेथलिया (काँग्रेस), बबन लोणीकर (भाजप), सोमनाथ साखरे (शिवसेना), राजेश सरकटे (राष्ट्रवादी), बाबासाहेब आकात (मनसे), बदनापूरमध्ये संतोष सांबरे (शिवसेना), बबलू चौधरी (राष्ट्रवादी), सुभाष मगरे (काँग्रेस), नारायण कुचे (भाजप), तर भोकरदनमध्ये चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी), संतोष दानवे (भाजप), रमेश गव्हाड (शिवसेना), सुरेश गवळी (काँग्रेस) आदी प्रमुख उमेदवार आहेत.
महायुती व आघाडीत फाटाफूट झाल्यामुळे स्पर्धेतील उमेदवारांची संख्या वाढली. बदनापूरमध्ये सुभाष मगरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यामुळे ते काँग्रेसच्या तिकिटावर उभे आहेत. भोकरदनमध्ये भाजपचे जुने कार्यकर्ते रमेश गव्हाड शिवसेनेकडून लढत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अरविंद चव्हाण यांना भाजप व राष्ट्रवादीने जालना मतदारसंघात उमेदवारी देऊ केली होती. चव्हाण यांनी भाजपची उमेदवारी स्वीकारली. परतूरमध्ये ऐनवेळी राष्ट्रवादीने राजेश सरकटे यांना उमेदवारी दिली. घनसावंगी मतदारसंघात शेवटपर्यंत शिवसेनेच्या उमेदवारीचा घोळ चालू होता. अखेर तेथे सेनेने हिकमत उढाण यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे माजी आमदार विलास खरात ऐनवेळी भाजपकडून उभे आहेत.