वाळूमाफियांचा धुडगूस, महाविद्यालयीन युवकांची हत्या, अंतर्गत वादातून गोळीबार, अव्याहतपणे चाललेल्या घरफोडय़ा, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चोऱ्या, महिलांचे दागिने खेचून नेण्याच्या अगणिक घटना, हुंडाबळी, अपहरण, अंधश्रद्धेपोटी महिलेचा दिला गेलेला बळी तसेच पैशांचा पाऊस पाडण्याचे दाखविलेले आमिष, अवैध धंदे बंद केले जात नसल्यामुळे हतबल युवकाने केलेली आत्महत्या, टोळी युद्धातून होणाऱ्या हाणामाऱ्या, योग्य वागणूक न मिळाल्याने लष्करी अधिकारी-जवानांनी थेट पोलीस ठाण्यावर चढविलेला हल्ला..
नाशिक शहर आणि जिल्ह्य़ातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी मागील काही महिन्यांतील ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. काही राजकीय पक्षांनी गुन्हेगारीला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिल्यामुळे काही वर्षांपूर्वी शहरात टिप्पर, पीएल, देवाज् ग्रुप, चांगले, अण्णा गँग आदी टोळ्या उदयास आल्या. त्यांनी इतका धुडगूस घातला होता की, नाशिक हे बिहारमध्ये आहे की काय अशी शंका व्यक्त केली जात असे.
या टोळ्यांच्या अंतर्गत वादातून हत्या, गोळीबार, वाहनांची जाळपोळ असे प्रकार घडत होते. काही महिन्यांपूर्वी भीम पगारे या गुंडाची विरोधी चांगले टोळीने हत्या केली. टिप्पर गँगच्या सदस्यांनी न्यायालयात पोलीस पथकाला धक्काबुक्की करण्याचीही घटना घडली. काही टोळ्यांच्या म्होरक्यांविरुद्ध ‘मोक्का’अंतर्गत तर काहींवर तडीपारीची कारवाई करत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. सध्या टोळीयुद्ध काहीसे शांत असले तरी इतर गुन्ह्य़ांचा आलेख झपाटय़ाने उंचावत आहे. महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याच्या घटना कोणत्याही रस्त्यावर दिवसा-रात्री घडू शकतात.
काही घटनांमध्ये चोरटय़ांनी पोलीस असल्याची बतावणी केल्याचे उघड झाले आहे. बंद घरे फोडणे, मुख्य बाजारपेठेतील दुकाने फोडून मालमोटारीद्वारे माल पळविणे असे गुन्हे घडूनही बहुतांश प्रकरणात तपास पुढे सरकलेला नाही.
नाशिक रोड आणि संदीप फाऊंडेशनच्या आवारात टोळक्याने अचानक हल्ला करून युवकांची हत्या केली. शहरातील अवैध धंदे बंद केले जात नसल्याने नाशिकरोड येथील युवकाने त्र्यंबकेश्वर येथे आत्महत्या केली.

पोलीस अधिकाऱ्याकडून अवमानास्पद वागणूक मिळाल्याने संतप्त लष्करी अधिकाऱ्यांनी उपनगर पोलीस ठाण्यावर हल्ला चढविला होता. रिक्षाचालक प्रवासीच नव्हे तर वाहतूक पोलिसांनाही जुमानत नाही. वाहतूक पोलिसांना त्यांनी मारहाण केल्याच्याही घटना घडल्या आहेत. याशिवाय शहरात अवैध धंद्यांमध्ये अलीकडे झालेली वाढ हा चिंताजनक विषय आहे.
शहराप्रमाणे ग्रामीण भागात वेगळी स्थिती नाही. वाळूमाफियांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे. जप्त केलेल्या वाळूच्या धावत्या मालमोटारीतून तलाठय़ाला फेकून देणे, पाठलाग करणाऱ्या तहसीलदाराच्या अंगावर मालमोटार घालणे, प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ करून पकडलेली मालमोटार वाहन घेऊन जाणे या घटनाक्रमामुळे भयभीत महसूल कर्मचाऱ्यांनी गौण खनिज कारवाईच्या कामावर बहिष्कार टाकला आहे.
अंधश्रद्धेतून बळीचे प्रकार
अंधश्रद्धेचा पगडा कायम असून चांदवडमध्ये पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसविण्याच्या प्रकरणात सात जणांना पोलिसांनी अटक केली. त्यातील दोन संशयित पोलीस कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आहेत. इगतपुरी येथे एका महिलेचा बळी देण्याचा प्रकार उघडकीस आला. गुन्हेगारी घटनांची मालिका सुरू असली तरी संशयित पकडले जात नसल्याने स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र आहे.