मध्य प्रदेशातील बॉम्बस्फोटात अडकलेल्या झाकीर हुसेन या सिमीच्या अतिरेक्याला नांदेडमधून आधार कार्ड काढून देण्यासाठी शेख मुखीर नावाच्या नगरसेवकाने मदत केल्याचे प्रकरण मराठवाडय़ात ताजे आहे. अधूनमधून देशभरात महत्त्वाच्या शहरांतील अतिरेकी हल्ल्याचे मराठवाडा कनेक्शन दिसून येतच असते. मात्र, अलीकडच्या काळात काही किरकोळ गुन्ह्य़ांची व्याप्ती वाढली आहे. औरंगाबादसारख्या महत्त्वाच्या शहरात २०० हून अधिक मोटारसायकली अज्ञात चोरटा जाळत सुटला आहे. दर आठवडय़ाला कोठे ना कोठे दुचाकी जाळल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होते. त्यावरून ओरडही होते. मध्येच आम्हाला धागेदोरे मिळाले आहेत, असे पोलीस सांगतात. पण चोर काही पकडला जात नाही. नुकतेच बजाजनगर भागात पहाटेच्या वेळी तो चोर पोलिसांना दिसला. एका पोलीस निरीक्षकाने चोराच्या दिशेने गोळीबारही केला, पण तो पकडला मात्र गेला नाही. अशा अनेक घटना शहर-वस्तीमध्ये घडत आहेत. अलीकडेच शहरातील बेकरी मालकाच्या घरावर दरोडा टाकण्याचाही प्रयत्न झाला. त्यातील काही गुन्हेगारांना पोलिसांनी तातडीने पकडले. मात्र, अशी हिंमत करण्याची दरोडेखोरांची मानसिकता पोलिसांच्या निष्क्रियेतूनच जन्माला येते. मराठवाडय़ातील खेडय़ा-पाडय़ांमध्येही सामाजिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढच आहे.
लातूर तालुक्यातील काटगाव येथे सानेगुरूजी आश्रमशाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या मुलीचा बलात्कार करून खून केल्याप्रकरणी दोन शिक्षकांनाच अटक झाली. आश्रमशाळेतील ही घटना व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांमध्ये महिला अधीक्षकांच्या नियुक्तया रखडल्या आहेत. परिणामी तेथील गुन्हेही वाढले आहेत. नांदेड जिल्ह्य़ातील माजरम गावच्या ऊसतोड कामगाराच्या कुटुंबाने त्यांची तीनही मुले काटगाव येथील आश्रमशाळेत दाखल केली होती. त्यातील सहावीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकांनीच बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले. मराठवाडय़ात बलात्कारांच्या घटनांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतेच आहे. पोलीस दलात घडलेल्या गुन्ह्य़ातील आरोपींना शिक्षा व्हावी, या साठी सातत्याने बैठका होत असतात, मात्र, शिक्षा होण्याच्या प्रमाणात काहीसा फरक पडला असला तरी गुन्हे करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक राहिला नाही.