अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका
देशात वैचारिक स्वातंत्र्य असले पाहिजे. परंतु आता नवीनच समीकरण समोर येत असून सरकारच्या बाजूने चांगले बोलेल तो देशभक्त, सरकारच्या विरोधात बोलाल तर देशद्रोह, अशी स्थिती आहे. सरकारच्या धोरणाविरोधात बोलणाऱ्याला कायद्याचा बडगा दाखवून मुस्कटदाबी करण्यात येत आहे. ही मुस्कटदाबी निमूटपणे सहन करणार का, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केला. सरकारमध्ये राहून सरकारच्या विरोधात बोलायचे ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. सत्तेबाहेर पडा मगच विरोधात बोला, असे आव्हान चव्हाण यांनी शिवसेनेला या वेळी दिले.
सुरेश वरपुडकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. माजी जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख अध्यक्षस्थानी होते. काँग्रेसचे संपर्कनेते माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजुरकर, प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे, प्रदेश चिटणीस लियाकत अन्सारी व हरिभाऊ शेळके, उपमहापौर भगवान वाघमारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष कुंडलिक नागरे, उपाध्यक्ष पंडित चोखट, जि. प. सदस्या मेघना बोर्डीकर, शहराध्यक्ष नदीम इनामदार आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चव्हाण यांनी, जिल्ह्यातील मातब्बर मंडळी एका विचाराने व्यासपीठावर एकत्र आली, हे महत्त्वाचे आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सामान्य माणसाच्या मदतीला गेले पाहिजे. जमेल तेवढी मदत केली पाहिजे. काँग्रेस पक्ष नेहमीच गरिबांच्या बाजूने राहिला. तीन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असताना आपल्या मनात संवेदना आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. मागे काँग्रेस सरकारने दुष्काळी स्थिती असल्यानेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. या कर्जमाफीमागे शेतकरी कर्ज परतफेड करू शकत नाहीत ही वस्तुस्थिती होती. आज तीच स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसला दुष्काळाचे राजकारण करायचे नाही, असेही त्यांनी सांगितले. अडीअडचणीच्या कामात सरकारला मदत करण्यास आम्ही तयार आहोत. परंतु त्यांना राज्य कारभार कसा चालवायचा हे कळत नाही हे दुर्दैव आहे. दोन वर्षांत, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा जाब विचारण्याची वेळ आली आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.
जिल्हाध्यक्ष वरपुडकर यांनी मराठवाडय़ातील भयावह दुष्काळ स्थिती मांडून, मराठवाडय़ातील जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता कमी आहे. पाण्याची साठवण करण्यासाठी जलसंधारण, शेततळे, धरणातील पाणी साठवण वाढविण्याची आवश्यकता आहे. सरकारने प्रचंड गाजावाजा सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यात केवळ १९ कामे पूर्ण झाली आहेत, असे सांगितले.
सावंत यांनी, भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्याची थाप मारली. धनगर समाजाला आरक्षण तर मिळालेच नाही व आता शेतकऱ्याचा सात-बारा कोरा करण्याचेही सरकार विसरले आहे, अशी टीका केली.
नागरे, मेघना बोर्डीकर, विखार अहमद खान, तुकाराम रेंगे पाटील यांचीही भाषणे झाली. भगवान वाघमारे यांनी प्रास्ताविक, तर बंडू पाचिलग यांनी सूत्रसंचालन केले.