सांगलीतील शामरावनगरमध्ये अलिना मलिक अमनगी या १४ महिन्यांच्या बालिकेचा पाण्याच्या बादलीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. अलिना ही आईने दिलेलं कणीस खात बाहेर अंगणात खेळत होती. तिच्या हातातील कणीस अंगणात ठेवलेल्या पाण्याने भरलेल्या बादलीत पडले. हे कणीस  बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना अलिना पाण्याच्या बादलीत पडली. ती नेहमी जवळच असणाऱ्या दुकानातील एका आजींकडे खेळायला जात असल्यामुळे घरच्यांनी सुरुवातीला ती शेजारीच असेल, असे वाटले. पण बराच वेळ आलीना दिसेनाशी झाल्यामुळे सर्वांची धावपळ सुरु झाली. यावेळी ती बादलीत पडल्याचे लक्षात आले. नाका तोंडात पाणी गेल्याने तिचा श्वास गुदमरला होता.

तिला तात्काळ बादलीतून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र खूप उशीर झाल्याचे सांगत डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. अलिनाचे वडील प्लंबिगचे काम करतात. तिच्याशिवाय त्याना एक मुलागा आहे.