मंठा तालुक्यातील हेलस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोकसहभागातून ‘डिजिटल’ करण्यात आली आहे. जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या हस्ते या शाळेतील ई-क्लासचे उद्घाटन झाले.
जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती ए. जे. बोराडे अध्यक्षस्थानी होते. सध्याच्या स्पर्धेच्या तसेच, माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण ई-क्लासच्या माध्यमातूनच देता येऊ शकेल. मंठा तालुक्यातील १०० प्राथमिक शाळा वर्षभरात डिजिटल करण्यात येतील. त्यासाठी या शाळांमधील शिक्षक एप्रिलमध्ये ठाणे जिल्ह्य़ातील पष्टेपाडा येथील शाळेतील ई-क्लासला भेट देणार आहेत. हेलस येथील शाळेसाठी डिजिटल बोर्ड व विद्यार्थ्यांसाठी तीन टॅब्लेट देण्याची घोषणा बोराडे यांनी या वेळी केली.
देशभ्रतार म्हणाल्या की, ई-क्लास ही संकल्पना लोकचळवळ झाली पाहिजे. प्रत्येक शिक्षकाने त्यासाठी प्रयत्न करावेत. मानव विकास निर्देशांकात खालच्या क्रमांकावर असलेल्या जालना जिल्ह्य़ाच्या विकासासाठी शिक्षणाचा विकास महत्त्वाचा आहे. नवीन संकल्पना मांडणारे शिक्षक व शाळांना पुरस्कार देण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याकडे, त्यांना चार भिंतीच्या बाहेरील शिक्षण देण्याकडे लक्ष देण्यात येणार आहे. शैक्षणिक विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. जनतेचे आर्थिक सहकार्य महत्त्वाचे असले, तरी त्यांचा वेळही महत्त्वाचा आहे.
प्रा. डॉ. अचला जडे, शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांचीही भाषणे झाली. गटशिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी, ई-क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण व आनंददायी शिक्षण मिळेल, असे सांगितले. मुख्याध्यापक आर. बी. कुडे यांनी लोकसहभागातून शाळेत ई-क्लास सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून ग्रामस्थांना धन्यवाद दिले. सरपंच शारदा प्रधान, उपसरपंच यमुनाबाई खराबे, ग्रामस्थ उपस्थित होते.