राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. ऑनलाईन शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी समाजकल्याण विभागाने सुरू केलेले संकेतस्थळ सतत तांत्रिक अडचणीत सापडत आहे. ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तर हे संकेतस्थळच बंद असल्याने, जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. या पाश्र्वभूमीवर समाजकल्याण विभाग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित ठेवण्यात अव्वल असल्याचा आरोप विद्यार्थ्यांमधून केला जात आहे. 

चालू शैक्षणिक वर्षांसाठी ई-शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज व नूतनीकरण प्रक्रिया समाजकल्याण विभागाच्या संकेतस्थळात सतत दोष निर्माण होत असल्यामुळे अर्ज भरण्यासाठी शनिवापर्यंत मुदतवाढ दिली होती. यापूर्वी १५ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील २३३ महाविद्यालयांमधील फक्त २० हजार ८१९ विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरणे शक्य झाले. राजर्षी शाहूमहाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यावेतन आणि परराज्यात शिक्षण घेणारे विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेस पात्र असूनही, समाजकल्याण विभागाच्या संकेतस्थळ आणि महाविद्यालयांचे मॅिपग झाले नसल्याने शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. डिसेंबरअखेपर्यंतची शिष्यवृत्ती एव्हाना विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. परंतु महाविद्यालयांचे मॅिपगचे काम आणि समाजकल्याण विभागाचा आळशीपणा यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
महाविद्यालयांना तंबी
शिष्यवृत्तीचा ऑफलाईन अर्ज भरून घेणाऱ्या महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती योजनेस पात्र असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सतत सूचना देऊन ऑनलाईन अर्ज भरण्यास सांगावे. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास प्राचार्य त्यास जबाबदार राहतील, अशी तंबी समाजकल्याण विभागाकडून दिली जात आहे. महाविद्यालयांचे मॅिपग होऊनही ऑनलाईन अर्जातील ‘अभ्यासक्रम’, ‘महाविद्यालयाचे नाव’, ‘प्रवेश घेतल्याचा दिनांक’ व इतर भरावयाची माहिती अपडेट केली नाही. त्यामुळे सायबर कॅफेवर जाऊन शिष्यवृत्ती अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालय आणि समाजकल्याण विभागाबाबत संताप पसरला आहे.
‘तक्रारींची दखल घेणार नाही’!
ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ३१ जानेवारीची होती. ज्या वेळेस मुदत संपत येते, त्यावेळेस अनेक विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रयत्न करतात. परिणामी संकेतस्थळ संथ चालते व अर्ज भरण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अंतिम तारखेची वाट न पाहता मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्वरित ऑनलाईन अर्ज भरावेत. नंतर ऑनलाईन अर्ज भरताना आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती समाजकल्याण विभागाने दिली आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागाची चूक असतानाही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी संघटनांचेही दुर्लक्ष
महाविद्यालयांमध्ये विविध पक्ष, संघटनांच्या विद्यार्थी शाखा काढून विद्यार्थ्यांच्या समस्या, सोयी-सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनांचे समाजकल्याण विभागाच्या ढिसाळपणाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी संघटनांबाबत नाराजी व्यक्त होत आहे.