महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न संपला असल्याचे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगाव येथे केले असून त्यांच्या या विधानाला मराठी भाषकांनी कडाडून विरोध केला आहे. मातृभाषा असलेल्या प्रांतात जाण्याचा आमचा अधिकार असून त्यासाठी सीमा प्रश्नाच्या माध्यमातून लढत आहोत. कर्नाटकातील आजवरच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी सीमाप्रश्न संपल्याचे तुणतुणे वाजवले असून सिध्दरामय्यासुध्दा तेच करत आहेत, अशी प्रतिक्रिया मराठी एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील यांनी रविवारी व्यक्त केली.  
चिकोडी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या येळ्ळूर येथे मराठी भाषकांवर झालेल्या अत्याचारानंतर प्रथमच बेळगावात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते  म्हणाले, महाराष्ट्र  कर्नाटक सीमाप्रश्न हा विषय संपलेला असून यासंबंधी महाजन आयोगाचा अहवाल हा अंतिम आहे. महाराष्ट्रामधील राजकीय नेते या प्रश्नाचे राजकीय भांडवल करत आहेत. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी हा प्रश्न जिवंत ठेवला आहे. महाराष्ट्र सरकारने सीमाभागासाठी स्वतंत्र पालकमंत्री नेमल्यास त्याला कडाडून विरोध केला जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, कन्नड वेदिका संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर राज्यात बंदी घालण्याची आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
सिध्दरामय्या यांच्या विधानाचा समाचार घेताना आमदार पाटील म्हणाले, सीमाप्रश्न संपला अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असेल तर त्यांनी १२ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी हे वक्तव्य करण्याची हिम्मत दाखवावी. कन्नड रक्षण वेदिका ही संघटना कन्नड भाषेच्या संवर्धनासाठी घटनेच्या अधिकाराप्रमाणे लढत आहे. त्याच अधिकाराने मराठी भाषकही मराठी भाषेच्या हितासाठी लढा देत आहेत. राज्य पुनर्रचनेनंतर सीमाभागातील चार पिढय़ा संघर्ष करीत असून न्याय मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही.
शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची मागणी करणारे हे कोण लागून गेले अशा शब्दांत प्रहार करून आमदार पाटील यांनी मराठी भाषेसाठी लढणाऱ्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. मराठी भाषक वेगळा देश मागत नाहीत तर मातृभाषा असलेल्या आपल्या मूळ प्रांतात जाण्याची धडपड करीत आहेत.