ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, जीवनगौरव पुरस्कार विजेते आणि संगमनेर महाविद्यालयाचे शिल्पकार म. वि. तथा मामासाहेब कौंडिण्य (वय ८०) यांचे वृध्दापकाळाने आज सकाळी पुणे येथे निधन झाले. शिक्षणक्षेत्रात राबवलेल्या विविध प्रयोगांमुळे ते राज्यभर सुपरिचित होते. साधी राहणी, निष्कलंक चारित्र्य आणि सतत कर्तव्यमग्नता ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्टय़े होती. त्यांच्या पश्चात मुलगी अर्चना व जावई असा परिवार आहे.
मधुसूदन विष्णू कौंडिण्य यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील नसीराबाद होते. प्रथमपासूनच कुशाग्र बुध्दीमत्तेच्या कौंडिण्य यांनी जळगाव व नंतर नगर येथे आपले शिक्षण पूर्ण केले. ते दोन विषयात एम. ए. होते म्हणून मामा हे टोपण नाव त्यांना मिळाले. वयाच्या २७ व्या वर्षी संगमनेर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा त्यांनी खांद्यावर घेतली. सलग ३३ वर्षे एखाद्या महाविद्यालयाचे प्राचार्यपद सांभाळण्याची कामगिरी करणारे कौंडिण्य हे राज्यातील एकमेव उदाहरण होय.   विद्यार्थ्यांना वैश्विक ज्ञान मिळावे यासाठी त्यांनी साततत्याने विविध उपक्रम व कार्यक्रम महाविद्यालयात राबविले. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई व चंद्रशेखर, मधू दंडवते, राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर, अभिनेते राजकपूर व नर्गिस, क्रिकेटपटू अजित वाडेकर, समाजसेवक बाबा आमटे, साहित्यिक पु. ल. देशपांडे अशी चौफेर व्यक्तिमत्वे त्यांनी विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी महाविद्यालयात आणली होती. त्यातूनच मुक्तांगणच्या विकासासाठी पु.ल.देशपांडे यांनी बारा लाख रुपयांची देणगी महाविद्यालयाला दिली होती. प्रयोगशील प्राचार्य म्हणून त्यांनी महाविद्यालयात केलेले कार्य अनमोल ठरले.  सतत नाविन्याचा ध्यास घेतलेल्या मामांनी पुणे विद्यापीठाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे मुख्य प्रवर्तक म्हणून चोख कामगिरी बजावली. अनेक विद्यार्थी, संस्था, सरकारी अधिकारी, छोटे मोठे उद्योजक, प्राध्यापक घडविणारे मामा म्हणजे केवळ व्यक्ति नव्हते तर चालतेबोलते विद्यापीठच होते. निवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले होते. तेथेही अनेक निवृत्तांना सोबत घेऊन त्यांनी ग्रामविकासाच्या योजना राबविल्या. लोकपंचायत, स्नेहालय अशा अनेक संस्थांना त्यांनी भरभरुन देणग्या दिल्या. डोंगराएवढे काम उभे करतांना त्यांनी कधीही प्रसिध्दीचा हव्यास  केला नाही. त्यांच्या निधनाची वार्ता संगमनेरात येताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली. संगमनेर महाविद्यालयातही दुखवटा पाळण्यात आला.

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान