जनधन खात्यात अवघे १४० कोटी, विषमतेचे वास्तव

निश्चलनीकरणानंतर नगर जिल्ह्यतील विविध बँकांच्या ६५० शाखांमधून रद्द केलेल्या पाचशे व हजारांच्या सुमारे २१०० कोटीच्या नोटा जमा झाल्या आहेत. मात्र जनधनच्या सुमारे साडेसहा लाख खात्यात अवघे १४० कोटी रुपये जमा झाले असून रोकडरहित व्यवस्थेपासून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लोक वंचित आहेत. विषमतेचे एक वास्तव यानिमित्ताने पुढे आले आहे.

जिल्ह्यत जनधनची ६ लाख ४२ हजार खाती असून त्यामध्ये १४० कोटी जमा झाले. या खात्यांवर रोकडरहित व्यवहार करता येत नाही. कारण एटीएम कार्ड, डेबिटकार्ड तसेच धनादेश दिले जात नाहीत. महिन्यातून केवळ १० हजार रुपये काढता येतात. तसेच एकावेळी ५० हजारांच्यावर पसे भरता येत नाहीत. ऑनलाईन पध्दतीने पसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पाठविता येत नाहीत. त्यामुळे हे खातेदार रोकडरहित व्यवहारापासून वंचित आहेत. त्यांना १०० ते २०० रुपये काढण्यासाठीही बँकांमध्ये रांगा लावाव्या लागतात. सरकारने रोकडरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून विविध यंत्रणा कार्यान्वित आहेत. भूमिहीन, मजूर, लहान शेतकरी तसेच असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर हे मात्र मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांचा रोकडरहित व्यवहाराला प्रतिसाद चांगला मिळाला आहे. जिल्ह्यात रोकडरहित व्यवहाराचे प्रमाण ३० टक्के असले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे व्यवहार ५० टक्क्यांपर्यंत गेले आहेत. धनादेशाच्या माध्यमातून शेतकरी अधिक प्रमाणात व्यवहार करत आहेत.

[jwplayer ABBOOhmF]

पालिका निवडणुकीत जुन्या नोटांचे वाटप मोठय़ा प्रमाणात करण्यात आले. एका कुटुंबाकडे पाचशे ते पाच हजार रुपये त्यामुळे आले. साहजिकच कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, शिर्डी, राहुरी, देवळालीप्रवरा, पाथर्डी या शहरात राहणाऱ्या लोकांच्या जनधनच्या खात्यावर जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. जनधन खात्याच्या माध्यमातून काळा पसा पांढरा केला जाईल ही भीतीदेखील अनाठायी ठरली आहे. ग्रामीण भागातील अनेक खात्यांवर जुन्या नोटा जमा झाल्या नाहीत, हे विशेष आहे.

नगर जिल्हा सहकारी बँकेकडे सुमारे ३१९ कोटीच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. त्यांच्या २८६ शाखेतील १६ लाख खातेदारांनी त्या जमा केल्या आहेत. बँकेकडे ४ लाख शेतकऱ्यांची खाती आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यातही शेतमाल विकून जमा झालेली रक्कम भरणा करण्यात आली. सोयाबिन, मका, तूर, कापूस, कांदा या शेतमालाच्या विक्रीचे पसे व्यापाऱ्यांनी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून दिले. त्यामुळे ही रक्कम बँकेत आली. जिल्ह्यातील पतसंस्थांचा २२ कोटींचा भरणा आला. बँकेचे बंद असलेले कर्जवितरण सुरु झाले असून यंदा रब्बी हंगामात पाचशे कोटीचे उद्दिष्ट होते. त्यापकी १४२२ कोटींचे कर्जवितरण करण्यात आले आहे. आता हे कर्जवितरण पूर्वपदावर आले आहे. राज्यातील काही जिल्हा बँकामध्ये काळा पसा पांढरा करण्यात आला. त्यामुळे सर्वच सहकारी बँकांची नाबार्डच्या मार्फत तपासणी करण्यात आली. मात्र नगर जिल्हा बँकेच्या तपासणीत काहीही आढळून आले नाही, असे काही सूत्रांनी सांगितले.

नगर जिल्ह्यत रोकडरहित व्यवहारात ३० टक्के वाढ झाली आहे. आता नोटा बदलून देण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या टप्प्यावर असून सर्व एटीएम सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातही रोकडरहित व्यवहाराला चालना मिळत आहे. जनधनचे खातेदार मात्र काही नियमांमुळे हे व्यवहार करु शकत नाहीत.

आर.एम.दायमा, व्यवस्थापक, नगर जिल्हा अग्रणी बँक

नगर जिल्हा सहकारी बँकेने यापूर्वीच कोअर बँकिंग प्रणालीचा स्वीकार केला होता. त्यामुळे रोकडरहित व्यवहार करणे शक्य झाले. नाबार्ड व बँकेने रोकडरहित व्यवहारासाठी गावोगाव प्रशिक्षण दिले. आत्तापर्यंत ३ एटिएम सुरु केले असून ४५ एटीएम लवकरच सुरु होतील. ३०० स्वाईप मशिनही मागणी प्रमाणे देण्यात येतील. शेतकरी धनादेशाच्या माध्यमातून व्यवहार करु लागले आहेत. ५० टक्के रोकडरहित व्यवहार सुरु झाले आहेत. शेतकरीही त्यात अग्रेसर आहेत. बँकेने रुपेकार्डचे वाटपही सुरु केले आहे.

रावसाहेब वप्रे, कार्यकारी संचालक, नगर जिल्हा सहकारी बँक[jwplayer siBod4cy]